हे शशिसम उज्ज्वल आनन - कुंतल चमकत जणु कांचन

हे शशिसम उज्ज्वल आनन - कुंतल चमकत जणु कांचन
हे पुष्करवत नीलनयन - जणू गुपित
दडे त्यांत गहन५,६
करु काय प्रशंसा त्याची - ज्याने तुला घडविले
।ध्रु।

'कल्पान्त' म्हणुन काहीसे - मम कानी आले होते
बघताच तुला मज पटले - मज सत्य कळाले होते
चालीत तुझ्या जिवघेण्या - ही असे भयंकर किमया
आवरले मनास शतदा - पण ते कुठले ऐकाया ।१।
करु काय प्रशंसा त्याची - ज्याने तुला घडविले

रविकिरणे घेउन आली - तुझिया गालांची लाली
शालू म्हणुनी दर संध्या - तव कुंतलछाया ल्याली
तू खळखळती जणु सरिता - ऊर्मीवत तव अंग वळे
त्या ऊर्मीमधे बुडे जो - त्याला जग लाभे सगळे ।२।
करु काय प्रशंसा त्याची - ज्याने तुला घडविले

मी शोधत राहे जगती - अन् साध्य समीपच आहे
कर दूर पदर मुख दिसुदे - मिटतील तिमिर सारे हे
मज कळते की तव दीप्ती - मज करील वेडे नक्की
मादक लालित्य तुझे हे - मज मनसोक्त बघू दे की ।३।
करु काय प्रशंसा त्याची - ज्याने तुला घडविले

टीपा :

१. ह्या संकल्पनेचा अर्थ मला कळूनही वृत्तात, चालीत, लयीत आणि यमके वगैरे व्याकरण सांभाळून मी शक्य तसे भाषांतर केलेले आहे. वृत्त, चाल, यमक सांभाळणाऱ्या सुचवणी स्वागतार्ह आहेत. नुसता अर्थ नको

२. ह्या दोन ओळी वरच्यापेक्षा मस्त वाटतातः

'कल्पान्त' म्हणून काहीसे - मी बरेच ऐकुन होतो
बघताच तुला मज पटले - मी खरेच ऐकुन होतो

वृत्तात बसायला अडचण नव्हती, पण लय गा - गागा - गागा - गागा अशी असल्याने बरेच, खरेच येथील लघु अक्षरे गाताना ताणायला लागतात म्हणून नको वाटले. अर्थात थोडी मुरड घालून कुणाला गाता येईल म्हणा.

३. टीप क्र १ प्रमाणे इथेही.

४. ह्या ओळीचे दोन भाग मूळ गाण्याच्या उलट क्रमाने घेतले आहेत. अर्थामधे, वृत्तामध्ये चालीमध्ये काही अडचण नाही.

५. आनन कांचन नयन गहन असा उच्चार करावा. (अर्थात चालीत म्हणताना हे लक्षात
येईलच म्हणा)

६. या ओळींत लघू अक्षरे खूप आहेत म्हणून एखादवेळेस म्हणायला अवघड वाटेल. तसे
झाले तर ह्या सोप्या ओळी बघाव्या.

चंद्रासम उज्ज्वल आनन - केसांचा रंगही कांचन
हे निळे तळ्यासम डोळे - जणू गूज
दडे त्यांत गहन...

हे गाणे मला जसे ऐकू आले आणि उमजले आणि त्याचे शब्द जसे जालावर मिळाले (आणि ते उमजले  ) त्याप्रमाणे मी भाषांतराचा प्रयत्न केलेला आहे.

चाल : मूळ गाण्याप्रमाणेच! गा गागागागा गागा - गा गागागागा गागा (उद्धव? )) ध्रुवपदाच्या पहिल्या दोन ओळी आणि प्रत्येक कडव्याच्या शेवटच्या दोन ओळी द्रुत लयीत आहे आणि त्या गा - गागागागा - गागा अशाच आहेत. बाकी ओळी निमपट लयीत आहेत आणि त्या गा - गागा - गागा - गागा  अशा अंतराअंतराने म्हटल्या आहेत. ध्रुवपदाच्या दुसऱ्या ओळीतल्या शेवटच्या तुकड्यात गा - गाऽ - गागा -गागा असे करून एक गा गाळलेला आहे. (मी भाषांतरातही तो गाळलाच आहे )

विनंती :

१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.
२. फक्त गाणे ओळखू नका.  (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )

३. ध्रुवपदाचे भाषांतर सुचत असेल तर तेही सुचवा. यमक ..  हो यावेळी यमक जुळवण्याची भानगडच नाही! ध्रुवपदाची ओळ सुटीच आहे.
४. टीप १ आणि ३ मधील ओळींसाठी पर्याय सुचवा.