५०. उत्सव!

विषयात उतरण्यापूर्वी एक सांगावंस वाटतं की तुम्ही लेखनातली तरलता समजून घ्या. मी सत्य वेगळ्या पद्धतीनं मांडतोय, एकदम सोपं, ओघवतं आणि तुम्हाला स्पर्श करेल असं. शब्दांच्या योजनेत मी प्रवाहीपणा आणतोय, साध्या, सोप्या, रोजच्यातल्या शब्दांची निवड केलीये कारण शब्द गौण आहे, अर्थ महत्त्वाचायं, तुम्ही ओपन राहा तुम्हाला मजा येईल.

उत्सव हा एक मूड आहे तो तनमनात भिनवावा लागतो. सभोवतालची परिस्थिती तितकिशी साथ देत नाही पण तुम्हाला लावून धरावं लागतं. आपण उत्सवपूर्ण होतो तेव्हा कुणाच्या विरुद्ध नसतो पण जनमानसाची स्थिती दारुण आहे त्यामुळे आनंदी माणूस ऑड वाटतो. लोक ठरवून ठरवून प्रसंग गंभीर करतात, काहीही प्रसंग नसेल तर गंभीर विषय आणि भेदक चर्चा छेडतात आणि तशात तुम्ही मूड लाइट करण्याचा प्रयत्न केलात तर सगळे तुमच्यावर उसळतात पण उत्सव हा सत्याप्रत जाण्याचा मार्गही आहे आणि ती सत्य गवसल्याची अभिव्यक्ती पण आहे, त्यामुळे सेलिब्रेशन काय आहे आणि तो रंग आयुष्यात कसा उतरवायचा हे समजून घेणं एकदम अगत्याचं आहे.
______________________________

मला विचाराल तर जगातल्या सर्व दु:खाचं फक्त एकच कारण आहे ते म्हणजे ‘जोडलं जाणं’! दॅटस ऑल! द होल ट्रबल इन लाईफ इज जस्ट अ जॉईंट-पेन! सर्व भवताप हा केवळ संधिवात आहे. या एकमेव कारणापलीकडे दु:ख नाही मग ते कोणतंही असो, शारीरिक, मानसिक, भावनिक किंवा आध्यात्मिक.

शारीरिक दु:खाला जरा तरी वास्तविकता आहे आणि त्या दुःखाला वैद्यकीय इलाज आहे पण मानसिक आणि भावनिक दु:ख निव्वळ जोडामुळे निर्माण झालेलंय आणि कितीही साधना केली आणि जोड सुटला नाही तर त्याची परिणिती दारुण आध्यात्मिक दु:खात आहे.

आता हे अफलातून महत्त्वाचंय, एकदम लक्षपूर्वक वाचा.

कुठायत हे जोडबिंदू? तर तीन ठिकाणी, तीन बिंदूंमुळे आपण जोडले गेल्यासारखे वाटतो. पाठ टेकून एकदम रिलॅक्स्ड बसा, वेळ रात्रीची असेल तर उत्तम, पहिला बिंदू तुमचे ओठ आणि जीभ यांच्या मध्ये आहे, हे शब्दाचं जन्मस्थान आहे. या बिंदूवर तुमचं अवधान केंद्रित करा, तुम्हाला पहिल्यांदा आजूबाजूला काय  चाललंय ते स्पष्ट ऐकू यायला लागेल, सगळं अचानक शांत झाल्यासारखं वाटेल.

 काय असेल या शांत वाटण्याचं कारण? तर तुम्ही मनाच्या एका फॅकल्टीतून, ‘म्हणजे आत सतत चालू असलेल्या बोलण्यातून’, मुक्त झालात.

आत मध्ये जी सदैव बडबड चालू होती आणि जीनं तुमचं लक्ष संपूर्णपणे वेधून घेतलं होतं ती थांबली. जे बोलणं अनावर झालं होतं, या आयुष्यात कधी थांबणार नाही असं वाटत होतं ते थांबलं.

आशा भोसलेनी म्हटलंय   :

माझीया मना जरा थांबना
पाऊली तुझ्या या माझिया खुणा
तुझे धावणे अन मला वेदना

ही वेदना संपली, शांतता प्रस्थापित झाली! का थांबला हा अविरत सुरू असलेला लक्षवेधी संवाद? तर तुम्हाला जे वाटत होतं की ‘आपणच बोलतोय’ तो भ्रम संपला, जर आपणच बोलत असू तर थांबवणार कोण? मन बोलत होतं, आपल्याला ऐकू येत होतं पण आपल्याला वाटत होतं आपणच बोलतोय, हा पहिला जोडबिंदू निखळला, तीन पैकी एका परिमाणातून तुम्ही मुक्त झालात!

दुसरा जोडबिंदू कपाळात आहे, कपाळ हा मनाच्या विडीओचा स्क्रीन आहे. जसा ओठ आणि जीभ यात मनाच्या ऑडिओचा माइक आहे तसा त्याचा दुसरा भाग, दृश्य दाखवणारा पडदा, कपाळात आहे. प्रत्येक संवेदनेसरशी कपाळाच्या पडद्यावर तदनुषंगिक दृश्य प्रकट होतंय. ही प्रक्रिया आत्यंतिक वेगानं घडतेय, सरळ प्रसंगच अंत:चक्षू (म्हणजे बंद केलेल्या डोळ्यां) समोर  सरकतोय. आणि तुम्ही अत्यंत सावधपणे बघितलंत तर भर दिवसा असे प्रसंग तुमच्या डोळ्यांसमोरून सरकतायत.

या दृश्य दर्शवणाऱ्या जोडबिंदूचा वेध अत्यंत साकल्यानं घ्यायला हवा कारण आपली नजर स्थिर नाहीये, ती पटकन दृश्यात गुंतून जाते आणि आपण मन:चक्षूं समोर चाललेल्या प्रसंगात हरवून जातो, इतके की आपल्याला वाटतं खरंच तो प्रसंग घडतोय, आपल्याला वास्तवाचा, सद्य स्थितीचा संपूर्ण विसर पडतो. कोणतीही संवेदना झाल्या क्षणी तुम्ही सावध व्हा आणि ज्या क्षणी तुम्हाला कपाळात प्रकट झालेलं दृश्य दिसेल त्या क्षणी तुम्ही दुसऱ्या जोडबिंदू पासून मुक्त झालेले असाल, वर्तमानात आलेले असाल, आयुष्यात पहिल्यांदा संपूर्ण शरीराचा एकसंध बोध तुम्हाला होईल, तुम्ही शरीरापासून वेगळे झालेले असाल, विदेह झालेले असाल!

आता हे अत्युच्च आहे, एकदम नीट वाचा. हा दुसरा जोडबिंदू एकदम मजेशीर आहे, या बिंदूमुळे, म्हणजे या बिंदूशी जोडलं गेल्यामुळे आपल्याला दुहेरी भास होत असतो, एक, आपण शरीर आहोत आणि दोन, आपण प्रसंगात सापडलेली व्यक्ती आहोत!   अँड माइंड यू, हा भास एकदा नाही, दोनदा नाही तर सतत होत असतो. जागेपणी तर होतच असतो पण स्वप्नात सुद्धा होतो, आपण सदैव दृश्यानं घेरल्यासारखे वाटतो.

ईलही जमादारच्या ओळी आहेत:

माथ्यावरी नभाचे ओझे सदा ईलही
दाही दिशा कशाच्या, हा पिंजरा असावा

अशी आपली स्थिती झाल्यासारखी वाटते, कुठेही जा सुटका नाही पण हा बिंदू  गवसता क्षणी तुम्ही एकदम मोकळे होता, तरल होता, आकाश होता. काय कारण असेल या मुक्ततेचं? या हलकं वाटण्याचं? तर आपण निराकार आहोत, केवळ या दृश्य दर्शवणाऱ्या जोडबिंदूनी आपलं लक्ष सतत वेधून घेतल्यानं आपल्याला आपण आकार झाल्याचा भास होत होता, तो भास संपला म्हणून ही तरलता आहे, आपण निर्भार झालेलो आहोत.

संपूर्ण शरीराची जाणीव हा तिसरा जोडबिंदू आहे, पहिल्या दोन जोडबिंदूंसारखं त्याचं ठराविक स्थान नाहीये, इट इज अ ‘फिल’! हे जरा समजून घेण्यासारखं आहे, एकदम नजाकतीचं आहे, लक्षपूर्वक वाचा.

तुम्ही कधी गाणं म्हणत असाल किंवा ऐकत असाल तर तुम्हाला संगीताची शास्त्रीय माहिती  नसली (म्हणजे लय, ताल, स्वर, सम) तरी गाणं चुकलंय हे लगेच लक्षात येतं. काय असेल याचं कारण? त्याचं कारण असंय की स्वर, लय, ताल आणि सम हे सगळं मिळून एक फिल आहे. तुम्हाला लय सांगता येईल, स्वर गाऊन दाखवता येईल, ताल हातानं धरता येईल, सम थोड्या प्रयत्नानं समजेल पण हा फिल जाम दाखवता येणार नाही कारण हा फिल म्हणजे खुद्द आपण आहोत! लय, ताल, स्वर, सम सर्व जाणणारी निराकार जाणीव आहोत, म्हणजे ‘आहोत’ नक्की पण ‘नक्की असे’ कुठे नाही आहोत, किंवा इतके सर्वत्र आहोत की त्यामुळे नक्की कुठे आहोत हे सांगता येत नाहीये.

हा तिसरा जोडबिंदू दोन परिमाणांचा बनलाय, एक म्हणजे आपल्याला संपूर्ण शरीराची जाणीव आहे त्यामुळे आपण कुठे तरी आहोत असं वाटतंय, (थोडक्यात जिथे शरीर आहे तिथे आहोत असं वाटतंय) आणि ‘कुठे तरी आहोत’ म्हणून ‘कुणी तरी’ आहोत असं वाटतंय (म्हणजे व्यक्ती आहोत असं वाटतंय). ज्या क्षणी हा तिसरा जोडबिंदू किंवा हा भार-बिंदू तुमच्या लक्षात येतो, तुमच्या जाणीवेच्या कक्षेत येतो त्या क्षणी तुम्ही त्यापासून मुक्त होऊन फक्त एक तरलता होता, एक निर्भार उपस्थिती होता! आपण कुणीही नाही आणि कुठेही नाही अशा अत्यंत तरल स्थितीला तुम्ही येता, आणि तुमच्या जीवनात उत्सव सुरू होतो!
____________________________

उत्सवाला तीन परिमाणं आहेत, ती नुसती लक्षात आली की काम झालं!

पहिलं परिमाण म्हणजे आपण अस्तित्वाशी समरूप आहोत, वी आर वन विथ द एक्झिसटन्स. याची नुसती दखल घ्या, म्हणजे ज्याप्रमाणे इतर सजीव आणि निर्जीवांची काळजी अस्तित्व घेतंय त्याचप्रमाणे आपणही  अस्तित्वाच्या छत्रछाये खाली आहोत, आपण इथे उपरे नाही, आपल्याला निराकार अंतर्बाह्य घेरून आहे.

दुसरी महत्त्वाची आणि या एकरूपतेतून येणारी गोष्ट म्हणजे, ज्या बुद्धिमत्तेनं हे अस्तित्व सक्रिय आहे तीच बुद्धिमत्ता आपल्याला देखील क्षणोक्षणी उपलब्ध आहे, काय करावं, कोणती दिशा घ्यावी, काय सुखाचं, सहज आणि आनंदाचं होईल हे जसं पशुपक्ष्यानां समजतंय तसं आपल्यालाही समजू शकतं कारण आपल्या जाणीवेशी अस्तित्वाची बुद्धिमत्ता एकरूप आहे.

तिसरी गोष्ट, आपण आणि अस्तित्व यात कुठेही भेद नाही त्यामुळे आपल्याला मृत्यू नाही कारण अस्तित्व लयाला जाऊ शकत नाही, म्हणजे प्रकट जग ज्याप्रमाणे एखादं शरीर लयाला जातं तसं लयाला जाईल पण ज्यात ते प्रकट झालंय तो निराकार तसाच राहील. आपण अस्तित्वाशी समरूप आहोत म्हणजे निराकाराशी एकसंध आहोत आणि आकारातून प्रकट झालोत त्यामुळे शरीर लयाला जाईल पण आपण तसेच राहू, सध्या आपल्या उपस्थितीला शरीराचं आवरण आहे, मृत्यूनंतर ती उपस्थिती निराकार होईल इतकंच.

या तीन गोष्टी लक्षात आल्या की जीवनात उत्सव सुरू होतो कारण आपण आकारात असूनही आकाराशी जोडलेलो नसतो, कुठेही जोडलेलो नसल्यानं सदैव तरल असतो आणि ही तरलता अस्तित्वागत बुद्धिमत्तेशी संलग्न असल्यानं क्षणोक्षणी नवे स्वच्छंद विकल्प आपल्याला उपलब्ध होतात आणि आपण अस्तित्वासमवेत त्या उत्सवात रंगून जातो.

संजय

पूर्वप्रकाशन : दुवा क्र. १

 मेल : sanjayunlimited@yahoo.com


उत्सव या लेखानं माझ्या लेखमालेची अर्धशताब्दी होतेय. तुमच्या
सर्वांच्या प्रतिसादांमुळे मला लिहीत राहावंस वाटलं, तुम्हा सर्वांना
मन:पूर्वक धन्यवाद!