मम स्वप्नांच्या स्वामिनी कधी येशिल तू ?

मम स्वप्नांच्या स्वामिनी कधी येशिल तू
ऋतु जाई धुंद करुनी कधी येशिल तू
आयुष्य जात उलटुनी कधी येशिल तू ।ध्रु।
चल ये तू, चल चल ये तू, चल चल ये तू

ह्या उपवनकलिका, ह्या प्रीतीच्या वाटा
हे रंगोत्सव लागले विचारू आता
पाणवठ्यावरती गीत कधी गाशिल तू ।१।
मम स्वप्नांच्या स्वामिनी कधी येशिल तू  ...

ये फुलून पुष्पासम तू हृदयाजवळी
हे दुरून भेटुन मिळे स्वस्थता न मुळी
यातना अधिक कुठवरती मज देशिल तू ।२।
मम स्वप्नांच्या स्वामिनी कधी येशिल तू  ...

अनुरक्त मनाचा देई का नेम कुणी?
हे उद्या दुज्या कोणावर जाइल जडुनी!
जडले तर मग पश्चात्ताप पावशिल तू ।३।
मम स्वप्नांच्या स्वामिनी कधी येशिल तू ...

हे गाणे मला जसे ऐकू आले आणि उमजले आणि त्याचे शब्द जसे जालावर मिळाले (आणि ते उमजले  ) त्याप्रमाणे मी भाषांतराचा प्रयत्न केलेला आहे.

चाल : गा गागा गागा गागा गागा गागा   (भाषांतर मूळ गाण्याच्या चालीत नाही.)

विनंती :

१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.

२. फक्त गाणे ओळखू नका.  (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )

३. ध्रुवपदाचे भाषांतर सुचत असेल तर तेही सुचवा. यमक ...   शिल तू  असे जमवा बरका!  यमकाची जागा ठळक केलेली आहे.
ध्रुवपदाच्या ओळींत एक आणखी यमक आतमध्ये आहे ते अधोरेखित करून दाखवलेले आहे. तेही जमले तर जमवा!