काल चाखली तेव्हा मजला अर्थ कळाला डुलण्याचा!

प्रोफ़ेसर ह्यांची एक सुंदर गझल आणि काही नवीन विडंबने वाचली, आणि आमच्या मनात आले की आपणही एखादे विडंबन करून (पक्षी: पाडून) पाहावे. त्याचाच हा धडपडता प्रयत्न.

काल चाखली तेव्हा मजला अर्थ कळाला डुलण्याचा!
घोट घोट मी सारी प्यालो, स्वाद समजला चकण्याचा!!

सोबत करण्या तुला नेमका हवाच होता कुणी तरी;
सोस  हिला ही रुसण्याचा अन् सोस तुला ही 'बसण्याचा'!!

द्रव्य मिळाले खोऱ्याने; पण...हाय, काल मी गमावले!
किंगफिशरच्या प्याल्यामध्ये शाप मिळाला हरण्याचा!!

एकच प्याला, स्थान परंतू कितीक वेळा पालटतो!
प्रयत्न अमुचा फुकाचि, त्याला एका जागी धरण्याचा!!

स्वच्छ करू ह्या कसे मुखाला? 'मामा' पुढती उभा दिसे;
यंत्रावरती वास पकडला, बेत बिनसला पळण्याचा!!

टल्ली होउनि अडवा पडलो, बलाढ्य ठरली वामांगी!
वाया गेला प्रयत्न अमुचा गृहखात्याशी लढण्याचा!!

हरेक बुक्क्यासरशी माझी फुटू पाहते किंकाळी.....
कुणी तरी ऐकणार का हो टाहो अमुच्या रडण्याचा?

शुद्धीमध्ये करायचा तो पूर्वी बंडल विता!
म्हणून कोणी करीत नाही विचार इकडे बघण्याचा!!

.............श्री.चैत रे चैत
थूःशास्त्र व बंडलकाव्यतंत्रज्ञान विभाग,   
'नवरोजींची काढूया' महाविद्यालय.
फोन नंबर: ००१२४५१५४६२७०