तुझ्या अंगणातील प्राजक्त मी!

गझल
तुझ्या अंगणातील प्राजक्त मी!
पुजारी तुझा एक संन्यस्त मी!!

न पैसा, प्रसिद्धी, न सत्ता हवी!
कधीचाच झालो अनासक्त मी!!

तुझी बंधने गैरलागू मला.....
विसरलास तू काय? स्वायत्त मी!

धुरा सर्व माझी तुझ्यावर अता!
तुझा एक आहे परमभक्त मी!!

करा क्षूद्र कावे हवे ते तुम्ही!
कधीही न होणार उध्वस्त मी!!

गझल...विश्व माझे असे जाहले!
जणू त्यातला मुख्य विश्वस्त मी!!

तुझ्या आडवाटा, तुला माहिती!
असे एक सामान्य नेमस्त मी!!

असे काय त्यांनी दिलासे दिले......
मनातून संपूर्ण आश्वस्त मी!

उसळतात ओठांवरी शेर या....
अरे, शायरीतील अभ्यस्त मी!

तुझी गौरकांती, तुझा लालिमा!
तुला पाहुनी होय आरक्त मी!!

तुला पाहण्याची न तृष्णा मिटे!
तुला न्याहळायास आसक्त मी!!

लळा लागलेला न माझा बरा!
पथा! शेवटी एक पांथस्त मी!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१