ह्यासोबत
वातावरणीय अभिसरण -३
मध्ययुगीन अभिसरणविचार
मध्ययुगातील ऍरिस्टॉटल (इ. स. पूर्व ४८३ ते ४२०) हा एक प्रसिद्ध हवामानशास्त्रज्ञ. त्याने लिहिलेला 'हवामानशास्त्र' (Meteorology) हा ग्रंथ तत्कालीन हवामानशास्त्रातील प्रगतीवर प्रकाश टाकतो. ऍरिस्टॉटल च्या मते हवामानीय घटनांची व्याख्या 'सर्वसाधारणपणे हवा आणि पाण्याशी निगडीत असलेल्या व पृथ्वीवरील विविध प्रदेशांमधे अनुभवास येणाऱ्या घटना म्हणजे हवामानीय घटना होत' अशी होती. वातावरणातील घडामोडींसाठी सूर्यशक्ती कारणीभूत असते असे त्याचे मत होते, तर 'हवा थंड प्रदेशाकडून उष्ण प्रदेशाकडे वाहते' असे ऍरिस्टॉटलने सर्वप्रथम प्रतिपादन केले.
सूर्यामुळे पृथ्वी आणि वातावरण तापते, परंतु ते सर्वत्र सारख्या प्रमाणात तापत नाही, ज्यामुळे थंड व उष्ण प्रदेश निर्माण होऊन वारे वाहण्यास चालना मिळते, ह्याची ऍरिस्टॉटलला जाणिव होती. ह्या सिद्धांतामागील शास्त्रीय कारणांची माहिती त्याला होती अथवा नाही ह्याची माहिती त्याच्या लेखनातून मिळत नाही. ऍरिस्टॉटलच्या मते वाऱ्याचा उगम जरी भूपृष्ठावरून होत असला तरी वाऱ्याची दिशा मात्र अवकाशातील हालचालींवर (उदाहरणार्थ सूर्याची हालचाल) अवलंबून असते. विविध ऋतूतील सूर्याच्या अवकाशातील स्थानावर आणि सूर्योदय व सूर्यास्ताच्या स्थानिक वेळांवर आधारीत वाऱ्याची दिशा ठरवणारे एक चक्र त्याने आखले होते (आकृती १). ह्या चक्रानुसार विविध ऋतूंमधे वाऱ्यांची सर्वसाधारण दिशा कोणती असेल ह्याची माहिती मिळणे शक्य होत असे.
ऍरिस्टॉटलने लिहिलेल्या 'कॉसमॉस' ह्या ग्रंथामधे वारा हा भूकंपास कारणीभूत असतो असे म्हटले आहे.
![]() |
आकृती १ - ऍरिस्टॉटल च्या वाराविषयक माहितीवर आधारित आधुनिक वाराचक्र. मूळ संदर्भ-‘Meteorologica’, trans, H.D.P. Lee (1952) Cambridge, MA, Harvard University Press, Loeb Classical Library, 187. साभार संदर्भ- Taub (2003)* |
इ. स. पूर्व ४थ्या शतकाच्या सुमारास रोमन पंडित 'सेनेका' याने लिहिलेल्या 'नैसर्गिक प्रश्न' ह्या ग्रंथामधे हवामानीय घटनांचे विवेचन आढळते. मात्र आज ह्या ग्रंथाचा काही भागच केवळ उपलब्ध आहे. ह्या ग्रंथामधे सेनेका ने गारा कशा तयार होतात ह्याविषयी अनेक सिद्धांत मांडले आहेत. तसेच ह्या ग्रंथामधे संधिप्रकाश, खगोलीय घटनांचे हवामानशास्त्रातील महत्व, आणि सेनेकाचे वाऱ्यांविषयक विचार यांचेही विवेचन आहे. सेनेकानेही वाऱ्यांच्या वर्गीकरणाचे काही प्रकार मांडले आहेत ऍरिस्टॉटलप्रमाणे सेनेकाचेही वारा हा भूकंपास कारणीभूत असल्याचे मत होते. आरिस्टॉटलच्या 'हवामानशास्त्र' ह्या ग्रंथाचा प्रभाव पुढील अनेक वर्षे रोम, ग्रीस आणि इजिप्त मधील लोकांवर होता. दीर्घकाळ त्याच्या मतांच्या विरोधी मते मांडली गेली नाहीत.
मध्ययुगामधे हवामानीय घडामोडींवर असलेला 'दैवी'पणाचा शिक्का बराच पुसट झाला होता. ह्या घडामोडी नैसर्गिक असून त्यांचे नियमन देवतांद्वारे होत नाही हे लोकांना पटले होते. वाऱ्याच्या तीव्रतेचे, तापमानाचे वा इतर हवामान घटकांचे मापन करण्यासाठी उपकरणांचा अभाव व असे मापन करण्याच्या पद्धतीचा अभाव असल्याने हवामानाचा अंदाज मात्र हवामानशास्त्राच्या आधाराशिवाय आणि आकाशातील ग्रहस्थिती पाहूनच केला जात असे.
उन्हाळी कालखंडात अरबी समुद्राकडून भारतीय भूखंडाकडे तर हिवाळ्यात विरूद्ध दिशेने वाहणाऱ्या मौसमी वाऱ्यांची माहिती अरबस्तानातून भारताशी व्यापार करणाऱ्या आणि नियमितपणे भारतभेटीला जाणाऱ्या अरबी दर्यावर्दी व्यापाऱ्यांना फार पूर्वीपासून होती. हे दर्यावर्दी भारतात येण्यासाठी उन्हाळ्यात प्रवास करत. त्यावेळी भारताच्या दिशेने वाहणाऱ्या मौसमी वाऱ्यांचा त्यांना उपयोग होई, तर अरबस्तानात परतण्यासाठी हिवाळ्यात प्रवास करत, ज्यावेळी मौसमी वाऱ्यांनी दिशा बदललेली असे. अरबी व्यापाऱ्यांच्या नोंदींमधे भारतीय मौसमी वाऱ्यांबद्दल महत्वाची माहिती आढळली आहे. मौसमी वारे हे वातावरणीय अभिसरणाचाच एक भाग आहेत.
दक्षिण अमेरिकेच्या विषुववृत्तानजिकच्या प्रशांत महासागराचे पाणी अकालीच नेहमीपेक्षा गरम अथवा थंड असण्याचे उल्लेख काही मच्छीमारांच्या नोंदींमधे आढळतात. दक्षिण अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर गेलेल्या पर्यटकांनीही ह्या समुद्रपाण्याच्या तापमानातील विचित्र बदलांच्या नोंदी ठेवल्या आहेत. विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान मधेच वाढण्याच्या घटनेला आज आपण एल निन्यो (El Niño) आणि तापमान कमी होण्याच्या घटनेला ला निन्या (La Niña) असे म्हणतो. ह्या दोन्ही घटना मध्ययुगातील लोकांना माहित असल्याचे जुन्या नोंदींवरून लक्षात येते. ह्या दोन्ही घटनांचा आणि जगभरातील हवामानाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष असलेला संबंध आता शास्त्रज्ञांच्या लक्षात आलेला आहे. हा संबंध असण्यामागचे कारण अर्थातच वातावरणीय अभिसरण हे आहे. एल निन्यो आणि ला निन्या बद्दल थोडक्यात माहिती पुढील भागांपैकी एकामधे पाहूच.
पंधराव्या ते अठराव्या शतकादरम्यान झालेली प्रगती पुढच्या लेखात पाहू.
*Taub, L., 2003, ‘Ancient Meteorology’, Routledge Publishers, Taylor and Francis Group.