हातावर तुरी देणे

लहानपणी वाचलेली चिमणरावाची एक गोष्ट आठवली. तीत चिमणराव स्काऊटच्या मुलांना घेऊन जवळच्या गावात जातात. तेंव्हा "शेजारच्या बागेतून लिंबे आण आणि माळी आला, तर त्याच्या हातावर तुरी देऊन ये" असे सांगतात. मुलगा खरेच स्काऊटच्या सामानातली 'तुर' घेऊन जातो आणि माळ्याच्या हातावर ठेवतो......अशी काहीशी गोष्ट आहे. ह्या हातावर द्यायच्या तुरीचा काय अर्थ असावा? असा माझ्या मनात विचार सुरू झाला.


बर्‍याच वेळा वरवर विचार करता निरर्थक वाटणारा एखादा शब्द जसजसे अधिकाधिक खोलवर विचार करीत जावे, तसतसा अधिकाधिक अर्थवाही वाटू लागतो.  ह्यावेळीही असेच झाले. ...


संस्कृतात तुरग, तुरंग, तुरंगम ह्या सगळ्या शब्दांचा अर्थ घोडा. तुर (की तुरु? की तुरा?) म्हणजे घाई की काय? म्हणजे तुरग म्हणजे घाईने जाणारा वेगात जाणारा.


तुरंत म्हणजे हिंदीत लगेच. तुरंत म्हणजे मग संस्कृतात घाई असणारा वेग असणारा. (जसे ज्वलंत= जळणारा)


ह्याप्रमाणेच त्वरा म्हणजे घाई. आपण त्वरा करा म्हणजे एखादी गोष्ट लवकर लवकर करा म्हणतो. त्वरित करा म्हणातो. शिवाय ऍक्सिलरेशन् ह्यासाठी वापरलेला 'त्वरण' हा शब्द आपल्याला माहीत आहेच. त्वरण म्हणजे घाई करणे, वेग वाढवणे.


तसेच आतुर हा शब्द पाहा. आतुर म्हणजे घाईला आलेला. वेळ नसलेला. आतुर हा शब्द रोगी ह्या अर्थानेही वापरतात. उदा. कामातुर, प्रेमातुर (म्हणजे प्रेमरोगी!) इथे आतुर म्हणजे जो उपचाराची वाट पाहू शकणार नाही, तशी घाई असलेला असा घेता येईल. इथे गंमत पाहा कशी...


मराठी/संस्कृतात रोगी = आतुर = इम्पेशण्ट
पण इंग्रजीत रोगी = पेशण्ट !!


तुरुतुरु म्हणजे वेगाने, घाईने. तो अगदी अर्थवाही शब्द आहे, तुरुतुर चालणे म्हणजे घाईने चालणे.


तेंव्हा 'पळून जा' ह्या अर्थी 'हातावर तुरी दे' असे म्हणतात त्यावेळी त्याचा अर्थे "हातापेक्षा जास्त अंतर राहील इतका वेग ठेव" असा घ्यायला हवा !


तुम्हाला काय वाटते?


 टीप : हे सारे माझे स्वैर आणि मुक्त विचार आहेत. त्यांना शास्त्रशुद्ध बैठक किंवा पुष्टी असेलच असे नाही. चूक भूल द्यावी घ्यावी.