दुःख माझे हासरे


दुःख माझे हासरे


सोयऱ्याहून वैरी बरे!..
आडुनी मारती सोयरे!


संकटा पाहिले मी जगी
सोयऱ्यांचे नवे चेहरे!

रूप भासे निराळे तुझे...
आरशालाच होते चरे!


काय काट्यासही टोचले?
शब्द माझेच का बोचरे?


श्वापदांना हवी का घरे?
पिंजरे माणसांना बरे!


वादळामागुनी राहिले
आठवांचे खुळे कोपरे!

नाच कान्हा फण्यावर अता
कालियाला भरे कापरे


 लागले ना रडावे कधी
ठेवले दुःख मी हासरे


 -सोनाली जोशी