अहेर

झेलले मी वार कैक, हा जरा फसवाच होता
मोडला ज्याने कणा अहेर तो घरचाच होता


पांगले सारे वर्‍हाड, चौघडा शमला अखेरी
मूक साक्षीदार मी, तुझ्यासवे दुसराच होता


गाळले हे हातपाय, कोठले अवसान आणू
आणला ताठा उधार, धीरही उसनाच होता


मानभावी स्वागतास आज मी भुलणार नाही
वास जो आला तुझ्या शब्दांस तो कुजकाच होता


सोवळी तू राहिलीस आणि मी ठरलो विकारी
फास का माझ्या गळ्यास, न्याय हा उलटाच होता


सांग तू केलीस का विटंबना मम भावनांची
आज ज्याला लिंपतेस काल तो परकाच होता


ही गजल यापूर्वी 'मायबोली' या संकेतस्थळावर टाकली होती.त्याचा दुवा आहे http://www.maayboli.com/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=75&post=551664#POST551664 ‍.