तिसरा अंक (१)

"ओ कम ऑन अक्षय, अकेला क्या बाहर बैठा है यार!!! डान्सवान्स करते हैं यार, चल अंदर"


"छोड ना यार, पहले इसके साथ का रोमान्स तो खत्म कर लूं" म्हणत अक्षयने वर न बघता आणखी एक सिगारेट शिलगावली. पण डान्ससाठी येण्याचे आमंत्रण देण्याच्या सौजन्याबद्दल, तेच ठरलेलं हसू फ़ेकण्यासाठी अक्षय वर बघेस्तोवर "जो तेरी मर्ज़ी!", म्हणून डान्ससाठी बोलवायला आलेला हिमांशू आतल्या 'कैसा जादू डाला रेऽऽ'च्या ढणढणाटात मिसळूनही गेला होता. घटकेघटकेगणिक रात्र तरुण होत चालली होती, आणि तिच्याबरोबरच हेमंतची ग्रॅज्युएशन पार्टीसुद्धा. नुसत्या हेमंतचा तो आज़ डॉ. हेमंत झाला होता आणि चिप्स आणि पिझा स्लाईसेसने चालू झालेल्या त्याच्या पदव्योत्सवाची गाडी बिअर, वाईन, टकिला शॉट्सची स्टेशने घेत, रमतगमत मार्गक्रमणा करत होती. स्वतःलाच स्वतःपेक्षाही जास्त झालेला आनंद दारूचे पेले रिचवण्यातून आणि सिगारेटची पाकिटेच्या पाकिटे संपवण्यातून कसा साज़रा करता येतो, हे अक्षय आज पुन्हा बघत होता. जन्मापासूनची तेवीसएक वर्षे मुंबईतच काढल्यानंतर 'पार्टी कल्चर'त्याला अगदीच नवीन नसले, तरीसुद्धा भारताबाहेर अमेरिकेत राहूनच ते जास्त फुलते, यावर त्याच्या मनाने कधीच शिक्कामोर्तब केले होते. आजची पार्टी ही त्या सिद्धांताची एक 'कन्फ़र्मेटरी टेस्ट'च होती. कविता आणि गझलांबरोबरच्या प्रणयात स्वतःचं भान हरवणाऱ्या अक्षयला, त्यांच्या नशेपुढे पार्ट्यांमधली कडवट चवीची, मिठ्या मारून नि पापे घेऊन हसण्याखिदळण्याची नि त्या ओळखीच्या धुराची नशा नेहमीच कृत्रिम, निरर्थक वाटत आलेली. पण आज तो स्वतःच एका वेगळ्या रोमान्समध्ये गुंतला होता. त्याची नजर निर्विकारपणे आतल्या काळोखावरून फ़िरली. मदमस्त हातवारे करणाऱ्या आकृत्या, फ़ुल्ल व्हॉल्युमवरचं आणि तरीही काही ऐकू न येणारं म्युझिक, 'चीअर्स'च्या किंकाळ्या आपापलं काम प्रामाणिकपणे,चोख बजावत होत्या. खिडकीजवळच्या मंद उजेडात राहुलचे ओठ भावनाच्या ओठांना भिडले, आणि अक्षयचे त्याच्या सिगारेटला. ओळखीच्या अनेक पार्ट्यांसारखीच ही पार्टीसुद्धा त्यानं  डोळेभरून श्वासांत कोंबली. पण आज दुसऱ्याच क्षणी तो तिचा सारांश धुराच्या वलयांमध्ये पाहत होता. त्याच वलयांमध्ये त्याला आता कुणाचीतरी ओळख पटू लागली होती.


******


 "अक्षय, प्लीज हां!! सगळं कॉलेज मला अमेयवरून उगीचच चिडवतंय. आमच्यात तसं काही नसताना. अँड यू नो इट. मग तू सुद्धा का त्रास देतोय्‌स?" भैरवीची नेहमीच्याच खट्याळ लाडिकपणे पण तरीही नाटकी, लटक्या रागाने फुरंगटून जाऊन केलेली तक्रार.


"भै, तू खरोखरंच कुणावर तरी प्रेम करशील आणि तेव्हा तुला कोणी चिडवलं ना की कळेल"


"हो क्का??!! थांब सांगते संहिताला. ए संहि..."


तिने पुढचं काही बोलायच्या आत अक्षयने तिचं तोंड दाबलं आणि उसळलेल्या हशात ती तरुणाई पुन्हा नाचू लागली. कॉलेजच्या शेवटच्या वर्षीचं इन्फॉर्मल्स. आता जूनमध्ये सगळे इंजिनिअर्स होणार. मग कोणी इन्फ़ोसिस किंवा टी सी एस् किंवा अजून कुठेतरी. कुणी एम् बी ए, एम् टेक, तर कुणी एम् एस करायला अमेरिकेत. संवेदनशील, कवीमनाचा अक्षय बराचसा आठवणींमध्ये आणि मित्रमैत्रिणींमध्ये रमणारा. कॉलेजात आणि वर्गातसुद्धा बरेच मित्रमैत्रिणी आणि शाळेपासूनचाच एकूणच मोठा मित्रपरिवार. माणसं जोडणं हा त्याचा छंद नसला किंवा त्याने ती कला मेहनतपूर्वक विकसित केली नसली, तरीसुद्धा जिवापाड मैत्री आणि सगळ्यांना हवाहवासा वाटणारा स्वभाव त्याच्यासाठी निसर्गदत्त होता. जणू रक्तातच! वर्षावर्षांचे स्नेहबंध आता काही महिन्यांतच तुटणार नसले तरी दुरावणार मात्र नक्कीच होते. ती जाणीव झाली, की सगळेच खट्टू व्हायचे. मग संहिता म्हणायची, "अरे वेड्यांनो, ही तर नुसती सुरुवातच आहे. खरं तर, हा दुरावाच आपल्याला जास्तीत जास्त जवळ आणणार आहे. आणि मला खात्री आहे, की तुम्हाला ते लवकरच समजेल आणि पटेलसुद्धा. आतापर्यंतच्या आपल्या दोस्तीची नियतीने कधी आणि कशी परीक्षा घेतली आपल्याला कळली पण नाही. पण आता एकमेकांबरोबर बागडायला काय, साधा एक फोन करून बोलायलासुद्धा मिळणार नाही ना, ती खरी परीक्षा असणार आहे आपल्या मैत्रीची. आणि मला खात्री आहे या परीक्षेतसुद्धा आपल्याला फ़र्स्ट क्लास येणार आहे !"


अक्षयला संहिताच्या या समजूतदारपणाचं खूप कौतुक वाटायचं. एक तर पाहताक्षणीच जणू काही तो तिच्या प्रेमात पडला होता. अगदी धपकन्!!! 'ती पाहताच बाला, कलिजा खलास झाला' हे लग्नाच्या बेडीतलं गाणं आज प्रशांत दामलेऐवजी अक्षय मनात गात होता. बसस्टॉपवर कॉलेजच्या पहिल्याच दिवशी बसची वाट पाहणारी, पोपटी रंगाचा टॉप घातलेली संहिता. लेक्चर चुकू नये म्हणून बस नि घड्याळाकडे आलटूनपालटून लागलेले तिचे ते बोलके डोळे. कपाळावर 'शी बुवा, काय ही बस येत नाही' छापाची आठी. खांद्यावर दप्तर. छोट्या चणीची, टवटवीत, जेमतेम पाच फुटी आकृती. कोणाला अजून ओळखतच नाही, तर रिक्षासाठी तरी कसं विचारायचं असे बावरलेले भाव.


तेव्हढ्यात बस आली आणि "अरे चल ना यार आगे. गार्डन में खडा है क्या!"च्या मागच्या 'पब्लिक'च्या प्रेमळ हाकेने अक्षय भानावर आला. अक्षय आत चढला नि मागोमाग संहितासुद्धा. दहा मिनिटाच्या प्रवासात एकमेकांशेजारी उभे असूनही अक्षयला तिच्याशी एक चकार शब्दही बोलता आला नाही, पण ही परी आपल्याच वर्गात आहे हे कॉलेजात वर्ग शोधताना जेव्हा त्याला कळलं, तेव्हा बसस्टॉपवरच्या नि नंतर बसमधल्या त्या ताटकळण्याचं सार्थक झाल्याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर झळकून गेलं. आपण तिच्याकडे ओढले गेलोय हे समजायला त्याला मुळीच वेळ लागला नाही. पण त्याचवेळी हे आकर्षण प्रेमात रुपांतरीत झालंय, हे समजण्यासाठी मात्र दोन वर्षे जावी लागली.


मध्यंतरीच्या काळात या ना त्या निमित्ताने अक्षय आणि संहिता एकमेकांचे मित्र म्हणून जवळ आले. त्याचबरोबर अमर, अमेय, भैरवी, प्राची, आशिष आणि इतरही काही. अक्षयच्या मित्रवर्तुळाचा परीघ विस्तारला. नाटकाच्या तालमीच्या वेळी, कॉलेजच्या मासिकाचे काम करताना, ऑर्केस्ट्राच्या तालमीच्या वेळी किंवा वर्गात लेक्चर चालू असताना, मधल्या सुटीत किंवा फ़ावल्या वेळात कँटीनमध्ये बसून टेबलं वाजवताना नि गाणी म्हणताना, परीक्षेच्या वेळी रात्ररात्र जागून चाललेला अभ्यास नि त्यासाठीची वेळी-अवेळीची फ़ोनाफ़ोनी यांतून मैत्रीची वीण अधिकाधिक पक्की होत चालली होती. कदाचित आयुष्यभरासाठी!!


मैत्रीच्या या विणेत अक्षयनेही आपल्या नि संहितेच्या आयुष्यभराच्या कायमच्या सोबतीचे टाके घातले. अर्थात तिच्या नकळतच. तिला आपल्या मनातल्या गोष्टींपासून पूर्णपणे अनभिज्ञ ठेवून अक्षय एकटाच त्या दोघांची स्वप्नं आपल्या रंगात रंगवू लागला. पळसदरीच्या सहलीच्या वेळी गायलेलं 'कहना है, कहना है, आज तुमसे ये पहली बार...', रोझ डे च्या दिवशी संहिताला दिलेलं गुलाबाचं फूल नि तिच्यावर केलेली कविता, तिनंही ते नाजूकसं हसून, थोडं लाजून स्वीकारणं, त्याच्या गाण्यावर टाळ्या पिटणं त्याने आपल्या स्वप्नांमध्ये सामील केलं. अभ्यास करताना एकत्र प्यायलेली कॉफ़ी, रात्रभर जागून, वाचून दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये केलेली उजळणी नि सोडवलेली गणितं, अडलेल्या प्रश्नांबद्दल चर्चा, सगळं काही. आयुष्याच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर तो आपल्या उर्वरीत जीवनाची संहिता स्वतःच लिहायला बसला होता.


******


आज़ हेमंतकडे पार्टीला येताना गाडीतल्या डेकवरच्या 'वो लम्हे वो यादें' नं त्याला वांद्र्याच्या बसस्टॉपपासून पळसदरीच्या धबधब्यापर्यंत सगळीकडे फिरवून आणलं होतं.


(क्रमशः)