नावात काय आहे?

काल मुलीला पार्क मधे घेऊन गेले होते, थोडया वेळाने एक अमेरिकन बाई बाजूला येऊन बसल्या. या अमेरिकनांना बोलण भारी पटकन सुरु करता येत, फार कौतुकास्पद गोष्ट आहे. अगदी साता जन्मापासूनची ओळख असल्यासारख्या गप्पा मारतील हे लोक. पण बाकावर असे पर्यंतच, एकदा का बाक सोडला की आत्ताचा जन्म ही तिथेच विसरायचा.


असो. थोडयावेळाने त्यांनी बोलण काढलं. मग बोलण्या बोलण्यात आम्हा सगळ्यांची नावं विचारुन घेतली. नंतर म्हणाल्या, "तुम्हा भारतीयांना अर्थपूर्ण नाव ठेवायची सवय असते नाही. मी मला भेटणाया प्रत्येक भारतीयाला त्याच्या नावाचा अर्थ विचारते. नाहीतर आमची नाव बघा, James, George, Nancy कसल्याही अर्थाचा पत्ता नाही. आजी, आजोबा, आत्या, काकांची नाव होती तिच फिरुन फिरुन पुन्हा लावतो."


"खरयं तुमचं," म्हणून मी हसले. पण मनात विचित्र नावांचे एक दोन किस्से येऊन गेले.


किस्सा पहिला:


मला मुलगी झाली तेव्हा हॉस्पिटल मधे असताना बाजूच्या खोलीत एक गुजराथी बाई भरती झाली होती. दुसऱ्या दिवशी तिलाही मुलगी झाली. तिची सासू आनंदाने आम्हाला बातमी सांगायला आली. काही कारणास्तव तिच्या पाठोपाठ नव्याने बाप झालेला तिचा मुलगाही घुसला. बोलता बोलता कळल की त्यांना मुलीच नाव राशीवरुन ठेवायच होत आणि अक्षर आल होतं "य". तेव्हा "य" वरुन सुरु होणारी काही नाव सुचताहेत का अशी माय-लेकांनी पृच्छा केली.


माझ्या आईने त्यांना लागोलाग "यशदा" नाव सुचवलं. त्याबरोबर हे फार मराठी नाव झाल, आम्हा गुजराथ्यांत खपणार नाही असं त्या बाई म्हणाल्या.


दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा मुलगा मिठाई घेऊन आला. स्वारी खुशीत होती...म्हणाला नाव ठरवल. मला आणि माझ्या बायकोला दोघांनाही अतिशय आवडलं.


"अस का? काय नाव ठेवणार मग तुम्ही," मी उत्सुकतेने विचारलं.


"याशिका," तो उत्तरला.


"काय? अहो ते जपानी कंपनीच नाव आहे," मी किंचाळायची बाकी होते.


"तर काय झाल? ऐकायला गोड वाटत की नाही?" त्याने आम्हाला साफ थंड करुन सोडले. "तुम्ही तुमच्या मुलीच नाव काय ठेवणार?"


"अजून ठरवलं नाही. पण शिकागो ठेवावस वाटतय," मीही माझा स्वर खाली आणून थंड उत्तर दिले.


किस्सा दुसरा:


ही थोडी पूर्वीची गोष्ट. अदमासे १९८० च्या दरम्यानची. आमच्या एका ओळखीच्या कुटुंबात मुलाचा जन्म झाला. कुटूंबातील गृहस्थ क्रिकेटचे भारी शौकिन, तेव्हा  मुलाचे नाव क्रिकेटपटू वरुन ठेवण्याचा त्यांचा मनोदय होता. अर्थातच सुनिल, दिलीप, कपिल ई. नावांचा विचार झाला. परंतु सदा हरणाऱ्या भारतीय संघातील खेळाडूचे नाव नको म्हणून आपल्या मुलाचे नाव त्यांनी "व्हीव्ह रिचर्डस" ठेवले. म्हणजे "व्हिव्हरिचर्डस दाभोळकर" (आडनाव बदलले आहे). पुढे दोन-तीन वर्षांनी त्यांना कसलीशी उपरती झाली आणि शाळेत जाण्या पूर्वी मुलाचे नाव बदलून त्यांनी "रवी" केले. (पुढे "शास्त्री" लावले नाही)


(दोन्ही सत्य घटना आहेत. पी. जे. नाहीत)


मनोगतींनो,


असली भन्नाट नावे तुमच्या ऐकिवात आली असल्यास, जरुर कळवा.


विशेष टीप:


१. नाव हे ओळख दाखवण्याच केवळ एक चिन्ह आहे अस मानणाऱ्या लोकांवर हसण्याचा उद्देश नाही. नाव काय असाव हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. इथे हेतू केवळ मनोरंजन इतकाच आहे. त्यामुळे केवळ "विक्षिप्त" किंवा "मजेदार" वाटणाऱ्या नावांची चर्चा करुया, कदाचित अशा नावांमागे सुरस कथा दडली असायची (उदा. कमल हसन). इथे कुणाला दुखवण्याचा हेतू नाही.


२. टोपण नावे जमेत धरली नव्हती. पण काही टोपण नावे फार "कल्पक" असतात. तेव्हा ती यायला हरकत नाही. उदा. (मनोगतींची तोकोंबडी ही नावे मला आवडतात)


तो : त्याला, त्याचे, त्याने चे उल्लेख. (ज्युलिअस सीझरचे उदा. एका प्रतिसादात वाचले)


कोंबडी : दाणे टिपणे, बर्ड फ्लू, पिल्ले, पराची कोंबडी यांचा समर्पक वापर.


त्यांची व इतर मनोगतींची इच्छा असल्यास आपल्या टोपण नावाची निवड का केली ते कळवावे.


३. ही चर्चा मनोगतावर पूर्वी येऊन गेली असल्यास तो दुवा जरुर द्यावा.


कळावे,


प्रियाली