माझा मराठाचि

         अलिकडे मराठी भाषेतील बरेच शब्द नष्टच झालेत की काय असे वाटू लागले आहे अर्थात जेथे मराठी भाषाच आचके देऊ लागली आहे तेथे एक दोन शब्दांचे काय येवढे?
         आता माडी हा एक शब्द कुठे दिसतो का?नाहीतर पूर्वी कसा 'माडीवर चल ग गडे जाऊ झडकरी 'असा ठुमकत यायचा.किंवा 'माड्या चढणे 'याला एक गहन अर्थ असायचा.आता पुण्यात एक माडीवाले कॉलनी सोडली तर माडीचा पत्ताच नाही .सगळीकडे सदनिका झाल्याचा हा परिणाम की काय? माडी पिणारेही नीरा (किंवा दुसरे काही)पिऊ लागले आहेत.त्यामुळे बिचारी माडी बेघर झालीय.
      दुसरा असाच माझा आवडता आणि गायब झालेला शब्द म्हणजे चाणाक्ष.पूर्वी प्रत्येक कादंबरीत प्रत्येक पानावर एकदा तरी चाणाक्ष वाचक भेटायचे.आता वाचकच कमी झालेत हे खरे पण चाणाक्षपणाचा तर कळस झालाय पण तरी त्या शब्दाला मात्र वनवासी व्हाव लागलय हे खर!
        काही काही मराठी वाक्यप्रचारही असेच वापरातून लुप्त होत चाललेत.माझ्या आईच्या बोलण्यात काही गमतिशीर वाक्यप्रयोग होते.महत्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून उगीचच बारीक गोष्टीकडे लक्ष देणाऱ्याला ती म्हणे 'मोरीला बोळा आणि दरवाजा मोकळा'.तर सगळ्याना काम करायला बोलावून काम मात्र नीट पार न पाडणाऱ्याला ती म्हणे 'ये ग साळू दोघ लोळू.'मी कधीच कुठल्या कामात अडकत नाही असा तिचा दावा होता त्यामुळे ती मला 'लोण्यातला पावटा' म्हणे.
         . अगदी अलिकडे एका बड्या मराठी दैनिकाच्या अग्रलेखाचे शीर्षक होते 'गाभण गाईला खंडीभर दूध.'ते चुकीचे होते म्हणून मी वाचकाच्या पत्रव्यवहारात कळवणार होतो तेवढ्यात आणखी एका जागृत वाचकाने दुरुस्ती सुचवली की खंडी हे परिमाण दुधाला वापरत नव्हते म्हणून ते शंभर शेर दूध असे हवे,शेवटी मी त्याना पत्र लिहून कळवले की तो वाक्यप्रयोग 'मेल्या म्हशीला मणभर दूध' असा आहे.
         शब्दांच्या लुप्त होण्यासंदर्भात मी सहज म्हटले किती शब्दांचा वापर आपण करत नाही पाहूया आणि ढवळ्यानी प्रकाशित केलेल्या दि न्यू स्टंडर्ड डिक्शनरी घेऊन बसलो तर त्यातील ६०,००० शब्दापैकी निम्मे शब्द तरी वापरात नाहीत असे दिसले. 
        काही मराठी शब्द वापरणाऱ्याची पंचाईत करून टाकतात.परवाच माझ्या मुलाच्या कंपनीतून फोन आला आणि मुलगा घरात नसल्याने मी तो घेतला.मी तो बाहेर गेला म्हणून सांगितले,त्यावर फोन करणाऱ्याने आपण कोण असे विचारल्यावर मी गडबडलो,म्हणजे प्रश्नाचे उत्तर देता येत नव्हते म्हणून नाही पण 'मी त्याचा बाप' असे उत्तर दिल्यावर फोन करणाऱ्याला त्याचाच बाप काढल्यासारखे वाटेल आणि मग तो फोन दाणकन आपटेल की काय अशी भीती वाटून मी आपले गुळमुळीत "मी त्याचा वडील" असे उत्तर दिले पण माझे समाधान नाही झाले कारण वडील म्हटल्यावर वडील भाऊ असा पण अर्थ निघतो.इतरत्र मात्र हाच बाप अगदी बापुडवाणा होऊन बसतो.उदा.'बापरखुमादेवीवरी गोविन्दु रे' किंवा 'आइबाप हे दैवत माझे असता माझ्या घरी.' पण अशा एकाद्याच ठिकाणी त्याला का जोर चढतो कुणास ठाऊक. बापाऐवजी 'बा 'असा त्रास देत नाही उदा.खेड्यातील मुलांचे पालक माझ्या मित्राकडे आले की "गोंद्याला म्हणाव त्याचा बा आलाय."अस शुद्ध मराठीत सांगायचे आणि त्यात कुणाला काही बोचायचे नाही.कदाचित आजच्या नागर संस्कृतीचाही हा परिणाम असेल.
       बा म्हटले की मला स्वतःस शाळेत आलेला अनुभव हटकून आठवतो.आमचे एक शिक्षक जरा कवी वगैरे होते,म्हणजे वर्गातील सर्व मुलांची नावे एकत्र गुंफून त्यानी एक कविता केली होती त्यामुळे त्याना तसे वाटायचे.तर एकदा महात्मा गांधींच्या आत्मकथेतील एक अनुवादित उतारा मराठी पाठ्यपुस्तकात होता तो ते शिकवीत होते.त्यात एक वाक्य 'बापूजीनी बांना विचारले " असे होते.  त्या शिक्षकानी त्या वाक्याचा अर्थ "गांधीनी आपल्या बापाला विचारले"असा सांगितला .आता मी वर्गात त्यातल्या त्यात हुषार आणि थोडेफार वाचन केलेला ,त्यामुळे मला राहवेना आणि मी लगेच उठून त्याना म्हटले "अहो गुरुजी,बा म्हणजे बाप नाही तर ते कस्तुरबांना  उद्देशून म्हटले आहे "त्यावर शिक्षकांचा पारा चढला आणि ते माझ्याच अंगावर ओरडले," गप बस बा म्हणजे   बाSSप"
       माझा मुलगा शाळेत जात असताना मी फारसा जागरुक पालक नसल्यामुळे त्याला अभ्यासाला वगैरे बसवत नव्हतो(ज्याबद्दल तो अजून मला धन्यवाद देतो) पण मधून मधून मधून त्याचा अभ्यास कसा चालला आहे हे  कळण्यासाठी त्याच्या वह्या  पहायचो .एकदा त्याची वही पहाताना एका ठिकाणी लाल शाईने दुरुस्ती केलेली दिसली म्हणून पाहिले तर शुभं करोति हे त्याने लिहिलेले त्याच्या शिक्षकानी शुभंग करोती असे दुरुस्त केलेले आढळले.
        थोडक्यात मराठी भाषेच्या प्रगतीचे कार्य असे मुळापासून चालू आहे.त्यात शासनाला धोरण हे फक्त नावापुरतेच असल्याने आणखीच भर पडली आहे.एके काळी मोठा गाजावाजा करून शासनाने महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथ निर्मिती मंडळ स्थापन करून तज्ञ व्यक्तींकडून निरनिराळ्या विषयांवर मराठी भाषेत पुस्तके लिहून घेतली.त्यानी प्रकाशित केलेल्या प्रत्येक पुस्तकाच्या प्रस्तावनेतील पहिले वाक्य 'मातृभाषेतून शिक्षण दिल्यास विषय समजणे अधिक सुलभ होईल या उद्देशाने शासनाने अशी पुस्तके लिहून घेण्याचे महत्वाचे पाऊल उचलले आहे.' हे आहे.त्यानंतर मात्र कुठे माशी शिंकली कळत नाही आणि ते उचललेले मराठी पाऊल पुढे पडण्याऐवजी मागेच पडले .आता त्या सर्व पुस्तकांचे गठ्ठे वाळवीच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत(त्या गठ्ठ्यात माझेही एक पुस्तक आहे.)आता बहुतेक दुसरे ग्रंथनिर्मिति मंडळ बनवून या पुस्तकांची इंग्रजीत भाषांतरे करण्याचा सरकारचा विचार असेल.
           पहिल्यावेळी अमेरिकेतून परत गेल्यावर सहार विमानतळावरून घरी जाताना मी पत्नीला म्हणालो " अजून आपण अमेरिकेतच आहोत असे वाटतेय."ती चमकून माझ्याकडे पहायला लागल्यावर मी तिला म्हटले,"रस्त्यावरच्या पाट्या बघ शुद्ध इन्ग्रजीत लिहिल्या आहेत कोणाही अमेरिकन माणसाची गैरसोय होऊ नये म्हणून किती ही दक्षता!"राज्यस्थापनेनंतर पन्नास वर्षानी पाट्यांचे मराठीकरण करण्याची मोहीम पुन्हा सुरू केली आहे म्हणे ती केव्हा यशस्वी होते पहायचे. तोपर्यंत माझा मराठाचि बोल जिवंत राहो अशी आशा करत राहू या!