'मनोगत' वरील मक्तेदारी

'मनोगत' चे बदलते स्वरूप बहुतेक मनोगतींच्या लक्षात आले असेलच. चर्चेचे खुले व्यासपीठ ते आपली भांडणाची खुमखुमी जिरवण्याचे मैदान हा बदल अस्वस्थ करणारा आहे. वस्तुतः कुठलेही मतभेद चर्चेच्या पातळीवर सोडवता येतात. शंभर टक्के विरोधी मते असणारेही भांड भांड भांडून 'ठीक आहे, यावर एकमत होणे शक्य नाही. तू तुझ्या जागी बरोबर, मी माझ्या जागी' या निष्कर्षाप्रत येतात. हे तर वास्तवातले झाले. 'मनोगत' हे बोलूनचालून भासमय माध्यम. यावर कंपूबाजी, मक्तेदारी आणि न्यायनिवाडा करण्याची भूमिका घेऊन येणे हे उथळ मनोप्रवृतीचे द्योतक आहे. एका वादातले संदर्भ दुसरीकडे देऊन वैयक्तिक पातळीवर टोलेबाजी करणे हा तर स्वस्त लोकप्रियता मिळवण्याचा प्रकार आहे. तितकाच बटबटीत वाटणारा प्रकार म्हणजे ' तू माझी पाठ खाजव, मी तुझी' (इंग्रजी म्हणीचे स्वैर भाषांतर). 'मनोगत' वर प्रसिद्ध होणारे सगळेच साहित्य काही दर्जेदार असते असे नाही. तसे ते असणे शक्यही नाही. सगळेच मनोगती हे हौशी लेखक आहेत, व्यवसायिक नव्हेत. पण उठसूट कुठल्याही लिखाणाला 'वा, छान, अप्रतिम' असे म्हणत सुटायचे आणि त्याहूनही वाईट म्हणजे 'माझ्या कुठल्याच लिखाणाला तू चांगला प्रतिसाद देत नाहीस..' म्हणून कुढत बसायचे याला तर हलकी मनोवृत्ती याशिवाय दुसरा शब्द सापडत नाही. यातून मनाचा मोठेपणा नव्हे तर कोतेपणा दिसून येतो.
दुसरा भाग मनोगत वरील गंभीर लिखाणाचा. नुसते हलकेफुलकेच वाचायचे झाले तर केवळ विनोदाची कितीतरी संकेतस्थळे आहेत. माणूस मग मनोगत वर कशासाठी येईल? मनोगत वरील गंभीर लिखाणही लोक तितक्याच आवडीने वाचतात हे मला एक वाचक म्हणून आणि एक लेखक म्हणूनही कळाले आहे. बरे, हे सगळ्यांनी वाचलेच पाहिजे आणि सगळ्यांना आवडलेच पाहिजे असा काही आग्रह आहे का? पण जे आपल्याला कळत / आवडत नाही त्याविषयी तिरकसपणा कशासाठी?
एक अस्सल मराठी माणूस म्हणून मला हे प्रकार त्रासदायक वाटतात. 'मनोगत' चे संकेतस्थळ मी न उघडणे हा काही यावरचा उपाय नाही. 'काही लोक मनोगती झाल्यानंतरच हे होऊ लागले आहे. पूर्वी पहा आमचे कसे छान चालले होते' असा ( अपेक्षित) कांगावाही खोटा आहे. (पहाः शिवश्री यांचे वाद). मनोगत वरचे गढूळ वातावरण निवळावे यासाठी (मी धरून) सर्वांनी काय करावे याविषयी मंथन व्हावे म्हणून हे लिखाण.