वर्तमानपत्रे की व्यापाऱ्यांची प्रचारपत्रे?

नुकत्याच झालेल्या इंधन दरवाढीबद्दल प्रतिक्रिया म्हणून वर्तमान पत्रांनी रंगीत चित्रांसह जोरदार बातम्या पहिल्या पानावर झळकवल्या -'भाज्यांचे भाव इंधनाच्या भाववाढीमुळे ३ ते २० रु. प्रती किलो वाढणार.' यावर जरा खोलात शिरले असता असे लक्षात आले की.


समजा सरासरी भाजीपाला शेतापासून बाजारपेठेपर्यंत ३०० किमी. कमाल प्रवास करतो. एका लघु क्षमतेच्या मालमोटारीत एक टन म्हणजेच १००० किलो भाजीपाला येतो. या वाहनाची इंधनक्षमता प्रती लीटर ४ किमी असे धरले तर एकूण ७५ लीटर इंधन जळेल. डिझेल चे भाव सुमारे २.५० रु लीटरमागे वाढले, तर इंधनभाववाढीमुळे २.५० रु. गुणिले ७५ लीटर प्रमाणे रु. १८७.५ रुपये बोजा पडला. इंधना वर आधारीत देखभाल, रबरी धावा, सुटे भाग, वंगण वगरेचाही कमाल बोजा आणखी रु. १८७.५ धरूया. म्हणजे या भाववाढीमुळे एकूण ३७५ रुपये प्रती एक हजार किलो, म्हणजेच अडतीस पैसे किलो असा परिणाम झाला. आता १००० किलो पालक आणा वा बटाटे आणा वा कारली आणा, वरील हिशेब कायम आहे.


मग वर्तमानपत्रांतून ३रू ते २०रू भाववाढीची हाकाटी कशासाठी? जी आकडेमोड माझ्या सारख्या सामान्य माणसाला येते ती विद्वान पत्रकारांना येत नसावी हे पटणारे नाही. मग सामान्य माणसाला स्वाभाविकता अशी शंका येते की ही वर्तमानपत्रे आहेत की व्यापाऱ्यांची प्रचारपत्रे आहेत? ही बातमी आहे की व्यापाऱ्यांना भाववाढ करण्यास केलेली भरघोस मदत आहे?


यावर आपले मत समजून घ्यायला आवडेल.