मनोगती संमेलन - एक कल्पनाविलास - भाग २

संमेलनाच्या पहिल्या भागाला मिळालेल्या उदंड प्रतिसादाने हुरळून जाऊन ( आणि 'मनोगतीं'ना 'झक मारली आणि प्रतिसाद दिले' असे वाटण्यापूर्वी! ) संमेलनाच्या वृत्तांताचा दुसरा भाग सादर करत आहे. खेळाचे सगळे नियम पहिल्या भागाप्रमाणेच. तर
मनोगती संमेलन - एक कल्पनाविलास - भाग २

'मनोगत' संमेलनाचा आज दुसरा दिवस. या दिवसाच्या आरंभीच संमेलनाला वादाचे गालबोट लागणार काय अशी शंका येण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. संमेलनाच्या निमंत्रणपत्रिकेत आपले नाव डॉ. माधवी गाडगीळ असे न छापता नुसते माधवी गाडगीळ असे छापल्याबद्दल डॉ. माधवी गाडगीळ यांनी तीव्र शब्दांत ( का कुणास ठाऊक पण) भोमेकाकांकडे निषेध नोंदवला. ( त्यांचे हे आरोपपत्र पूर्ण व्हायच्या आतच मागचा रांगेत विनायकने महेशला खाजगी आवाजात 'निमंत्रण कधी म्हणायचे आणि आमंत्रण कधी म्हणायचे' हे विचारले. महेशच्या 'काहीकाही वेळा निमंत्रण आणि उरलेल्या वेळा आमंत्रण' या खुलाशाने काही विनायकचे समाधान झाले नाही. त्यामुळे तो अस्वस्थपणे काहीतरी पुटपुटत बसून राहिला.)त्यांचा हा आरोप 'जबरा' असला तरी अस्थानी आहे असे म्हणून भोमेकाकांनी प्रभाकर पेठकरांकडे बोट दाखवले. पेठकरांनी 'निमंत्रणपत्रिका छापल्या तेंव्हा मी मस्कतमध्ये होतो' असे म्हणून हात झटकले. त्यावर पुरावा म्हणून डॉ. माधवी गाडगीळ  यांनी पत्रिकेवर छापलेले ' प्रिंटेड इन मस्कत, सुल्तनेत ऑफ ओमान' हे पेठकरांना दाखवले. त्यावर ' हां, हां, तेंव्हा होय, तेंव्हा मी भारतात होतो' असे म्हणून स्वतःची सुटका करून घेतली. पण त्यानिमित्ताने 'मनोगत' वर वावरताना स्वतःच्या नावापुढे आपल्या पदव्या, विशेषतः डॉक्टर ही पदवी लावावी की नाही हा एक आयत्या वेळी उपस्थित झालेला परिसंवाद सुरु झाला. 
आपण जर डॉक्टर आहोत तर मग ते तसे लोकांना सांगायला नको का असे डॉ. माधवी गाडगीळ यांनी कळवळून विचारले. डॉक्टर दिलीप बिरुटे यांनी त्याला अनुमोदन दिले. असे असेल तर मग इंजीनिअर लोकांनी काय घोडे मारले आहे असा प्रश्न समूहस्वरात विचारला गेला.
'थांबा, थांबा.. विषय डॉक्टरांचा चालला आहे. मी डॉक्टर आहे.मला बोलू द्या...' साती पुढे आली. 'मला नाही वाटत असे करण्याची काही गरज आहे. 'मनोगत' हे एक वैचारिक व्यासपीठ असून..'
'का, सातीताई' डॉक्टर दिलीप बिरुटेंनी सातीला मध्येच आडवले ' तुम्हाला डॉक्टर असण्याची लाज वाटते की इतरांना?' त्यांनी खवचटपणाने विचारले. कधी न संतापणारी सातीही चिडली. आपले वाक्य अर्धवट टाकून ती तरातरा आपल्या जागेकडे निघाली. जाताजाता डॉ. माधवी गाडगीळांकडे बघून ती 'माकां घालूनपाडून बोलतंय...ना निन्न बिडलारे..' असे काहीसे म्हणाली. 'ना निन्न बिडलारे' चा अर्थ काय असे परत विनायकने महेशला खाजगी आवाजात विचारले. महेशने त्याचा अर्थ ' तेरा मेरा साथ रहे' असा सांगितला. विनायकच्या सततच्या प्रश्नांनी तो जरा त्रासल्यासारखा झाला होता. महेशच्या याही खुलाशाने काही विनायकचे समाधान झाले नाही. तो पुन्हा अस्वस्थपणे काहीतरी पुटपुटत बसून राहिला. दरम्यान सर्व 'मनोगतीं'नी आपापल्या पत्रिकेवर पेन्सिलीने 'माधवी गाडगीळ' च्या ठिकाणी 'डॉ.माधवी गाडगीळ' अशी दुरुस्ती करून घ्यावी हा या संमेलनातील पहिला ठराव संमत झाला.
दुसरा ठराव मांडण्यासाठी शिवश्री उभा राहिला
' मित्रांनो' गहिवरलेल्या आवाजात त्यांने सुरुवात केली... '
याच्याकडे 'गहिवरलेला' हा एकच रिंगटोन आहे काय?' आतल्या आवाजात एकलव्याने शनीला विचारले.
'मित्रांनो..' इकडे शिवश्री सुटला होता..' आज आषाढ शुक्ल त्रितीया. वाकुडणे खुर्द ग्रामपंचायतीच्या गलिच्छ वस्ती निर्मूलन समितीचे माजी हंगामी सहायक उपाध्यक्ष पोपटराव उर्फ चंद्या डावखुरे यांचा आज पहिला स्मृतिदिन. चंद्या डावखुरे हे आपल्या पंचक्रोशीत 'भुरटा चंद्या उर्फ डॉन' या नावाने सुपरिचित होते'. शिवश्रीचा गळा दाटून आला होता. 'शेवटचा पेग जास्त झाल्याने अंधारात एमेटी घसरून झालेल्या अपघातात त्यांचे अकाली निधन झाले नसते तर उस्मानाबाद जिल्ह्याने राष्ट्राला दिलेला पहिला पंतप्रधान म्हणून त्यांचे नाव सुवर्णाक्षरात लिहिले गेले असते. असो. आज त्यांचा स्मृतीदिन त्यांना उधार देणाऱ्या आठ हातभट्टीवाल्यांशिवाय कुणाच्याही लक्षात नाही हे भारतवर्षाचे दुर्दैव. 'मनोगत' तर्फे आणि समग्र शिवधर्मातर्फे मी चंद्याजींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो...'
'चंद्याजी साहेबांच्या स्मृतीला माझे कोटी कोटी प्रणाम' विसोबांना प्रणामासाठी परिचयाची गरज भासत नाही.
तेवढ्यात मागच्या बाजूने गदारोळ ऐकू आला.
'निषेध, निषेध...'
'गप्प बसा...'
'हा साला ब्राम्हणविरोधी आहे...'
'चंद्रकांत ब्रिगेडचा हस्तक आहे..'
'तू ब्राम्हणविरोधी, तुझा बाप ब्राम्हणविरोधी...'
'श्शूऽऽऽऽ'
'हाणा साल्याला...'
'पाकिस्तान मुर्दाबाद....'
'बोलू द्या त्याला..'
'अबे चूप..'
'शडाप..'
'यू शडाप..'


यातले टीकाराम, नीलकांत, भोमेकाका, शैल्य आणि माधवचे आवाज लोकांनी ओळखले. तेवढ्यात टेपवरचे गाणे संपले आणि नुसतीच रिकामी टेप फिरत राहिली की जसा 'हम्म्म्म्म..' असा आवाज होतो तसा आवाज ऐकू आला. लोकांना आधी वाटले की ध्वनीवर्धकच बिघडला.
'ध्वनीवर्धक साहेबांना माझे लक्ष लक्ष प्रणाम....'  विसोबा.
पण नंतर असे दिसले की 'हम्म..' हा 'तो' ने दिलेला प्रतिसाद होता. एखाद्या विषयावर आपले नक्की मत काय आहे हे ठरले नसेल आणि एकंदरीत लोकमताचा नूर पाहून आपली गुळणी सोडायची असेल तर'हम्म्म्म..' असा  प्रतिसाद द्यावा हे 'तो' नेच कुठल्यातरी 'दुव्या' त देऊन ठेवलेले काही 'चाणाक्ष' मनोगतींना आठवले. 


शिवश्री विजयी मुद्रेने खाली बसला. 'गहिवरलेला' या स्वराप्रमाणे याच्या चेहऱ्यावर कायम 'विजयी' एवढा एकच भाव उमटू शकतो की काय अशी शंका येऊन काही मनोगती चिंतीत झाले.


''पडलो तरी नाक वर..' हे याच्याकडून शिकून घे म्हणावं तुझ्या सन्जोपला...' वात्रट विसोबाला म्हणाला.
वात्रटाने का होईना, पण सन्जोपला 'तुझा' म्हणावे हे काही विसोबाला पटले नाही. 'माय**....' त्याने सुरुवात तर केली, पण अचानक भानावर येऊन त्याने स्वतःला आवरले. वात्रटाचे तिकडे लक्षच नव्हते. निमंत्रणपत्रिकेची बारीक सुरळी करून त्याने कानात आतपर्यंत घातली होती आणि तिचा कानातल्या विवक्षित सुखबिंदूंवरचा स्पर्श त्याच्या चेहऱ्यावर निखळ कैवल्यस्वरूपी आनंदाच्या रूपात झळकत होता. आपल्या पाठीवर काहीतरी गरम पडल्याचा विसोबाला भास झाला आणि त्याने वळून पाहिले, तर डॉ. माधवी गाडगीळ साक्षात महिषासुरमर्दिनीच्या रागाने वात्रटाकडे पहात होत्या!


इकडे शीला ७१२ लाजत लाजत व्यासपीठावर आली होती.
' ही सात बाराची काय भानगड आहे रे?' विश्वमोहिनीने टग्याला विचारले. 'मला तर तलाठी काढून देतो तो सात-बाराचा उतारा माहिती आहे.'
'होय, एक तो उतारा, आणि एक रात्री जास्त झाली की सक्काळीसकाळी लावायचा एक पेग तो उतारा.. खि..खि..खि..' हा टग्या म्हणजे कठीण प्रकार आहे.


'नमस्कार मंडळी' शीला ७१२ म्हणाली. ' मी इथे नवीन आहे. मी नवीननवीनच कविता लिहायला लागल्येय...'
'मग नवीन याच नावाने का लिहीत नाही? नवीन निश्चल.. खि...खि...खि....' विश्वमोहिनीच्या कानात पुन्हा टग्या.


'तर माझी एक नवीन कविता मी वाचून दाखवत्येय. कवितेचं नाव आहे ' ओल्ड एज लव्ह''

'हें इंग्रजीं नांव बरें चांलते तुम्हांस?' विसोबा भोमेकाकांना.

इकडे शीला ७१२


ओल्ड एज लव्ह म्हंजे
असतं तरी काय
यानी तिचे, तिने याचे
चेपायचे पाय


ओल्ड एज लव्ह म्हंजे
सीनीयर्सचा हब
कधी अमृतांजन कधी
व्हिक्स वेपोरब


ती म्हणते कधीतरी
जवळी ये ना राया
'थांब झाला रिलॅप्स वाटतं
माझा हर्निया'


तो म्हणतो आज तरी
जमतंय का राणी
'मेली शुगर वाढली वाटतं
द्या गोळ्या आणि पाणी'


टाळ्यांचा प्रचंड कडकडाट!


(अद्याप अपूर्ण)