स्त्रियांना मंदिर प्रवेश निषिद्धः एक नवी फॅशन

आजच लोकसत्तामध्ये एक लेख वाचला. त्यानुसार अलिकडच्या काळात बऱ्याच मंदिरातून स्त्रियांना प्रवेश नाकारला गेला. सध्या केरळमधील एका अभिनेत्रीने अशा मंदिरात प्रवेश केल्याची बातमी गाजते आहे. लोकसत्ताच्या त्या लेखात पुरीच्या मंदिरात इंदिरा गांधींनाही त्यांच्या आंतरजातीय विवाहामुळे प्रवेश नाकारल्याचा संदर्भ आला आहे. या सर्व घटनांमागील कारण मीमांसा काय असावी? माझे एक मत देऊन मनोगतींची मते अपेक्षित आहे.


मला असे वाटते, की काही शतकांपूर्वी भारतात शाक्त संप्रदायाच्या अनुयायांनी मदिरा, मदिराक्षीच्या भोगाचा पुरस्कार केला होता. (अनेक साधू-संन्याशी भांग पितात वा चिलीम ओढतात हे याच गोष्टीचे अवशेष आहेत.मध्यंतरी गजानन महाराजांविषयी मनोगतात चर्चा झाली होती.त्या वेळी या बाबीची चर्चा करण्याचा विचार होता, पण ती चर्चा वेगळ्या मार्गाने गेल्याने या मुद्याला फारसा उठाव आला नसता.) परंतु या भोग-संस्कृतीचा अतिरेक होऊन माणूस अनाचारी बनत गेला. यातून समाजाला तारण्यासाठी भारतात दत्त संप्रदायाची व नाथ संप्रदायाची निर्मिती होत गेली. या संप्रदायाने आपल्या अनुयायांना स्त्री,इ.इ. गोष्टींपासून दूर राहण्याचा उपदेश केला. त्यामुळे या दोन्ही संप्रदायाच्या अनुयायांनी ब्रह्मचर्य पाळले. याचाही अतिरेक होऊन तत्त्वविस्मृतीमुळे  त्याला निव्वळ कर्मकांडाचे स्थान प्राप्त झाले. आजही दत्त संप्रदायाचा उपास्यग्रंथ (गुरूचरित्र) वाचण्यास माझ्या माहितीप्रमाणे स्त्रियांना परवानगी नाही. नाथ सांप्रदायिकांच्या मंदिरात आजही स्त्रियांना प्रवेश नसतो असे ऐकून आहे. थोडक्यात बदलत्या परिस्थितीनुसार आपल्या तत्त्वज्ञानाचा मेळ न घालता केवळ पूर्वीपासून चालत आले म्हणून पाळण्याचा तो एक उपचार ठरला आहे. पण यातूनच अशा चुकीच्या घटना घडतात असे  मला वाटते.


या सर्वच प्रकाराविषयी मनोगतींना काय सांगावे वाटते?  


अवधूत.