जास्तीत जास्त प्रतिसादः हमखास युक्त्या-२

(भाग १ ला आलेल्या प्रतिसादांवरून प्रेरणा घेऊन हा भाग २. प्रस्तुत लेखिका कोणती युक्ती वापरते हे  गोपनीय आहे. प्रस्तुत लेखाचे आणि कविता खपल्या! आणि तुम्हाला प्रसिद्ध व्हायचेय? आणि माझी साहित्यविषयक महत्त्वाकांक्षा या लिखाणांशी साम्य व भाग १ मधील प्रतिसादांशी साम्य आढळल्यास हा निव्वळ योगायोग समजावा. (कशाचीतरी सन्माननीय नक्कल  करायची असल्यास ही ओळ न चुकता वापरावी.)))
८. कोडीबहाद्दरः
याही प्रकारात बरेच प्रतिसाद मिळतात. पण उत्तरे व्य. नि. नेच पाठवावी असे  लिखाणाच्या शेवटी लिहिले तरच. सर्वात उच्च मार्ग म्हणजे कोणत्यातरी नोकरीच्या मुलाखतीच्या परीक्षेत आपली दांडी उडवणारे कोडे निवडून ते विचारणे, उत्तरे व्य. नि. ने पाठवण्याची सूचना करणे आणि 'निकाल ५ जुलै २००६ ला (कोडे लिहिल्यापासून २ आठवड्याने) जाहीर करण्यात येईल' असे लिहिणे. या प्रकारात व्य. नि. ने उत्तरे पाठवली तरी 'आपल्याला उत्तर येते' या आनंदात 'उत्तर व्य. नि. ने पाठवले आहे ' असा प्रतिसाद लिहून प्रतिसादसंख्या चांगली वाढते. अधुनमधुन 'पाठवलेल्या उत्तरांपैकी क्ष,य, व ज्ञ यांची उत्तरे अचूक आहेत' असे लिहून प्रतिसादसंख्येत भर घालता येते. उत्तर स्वतःला माहीत नसल्यास काळजी करू नये,व्य. नि. मधून चांगली उत्तरे येतात त्यातले सर्वात अचूक वाटणारे उत्तर निवडावे.


९. गज़लबहाद्दरः
कविता लिहिणे चांगलेच, पण भरपूर प्रतिसाद हवे असतील तर शक्यतो गज़ला लिहाव्यात. यासाठीही भरपूर प्रतिभा लागते. ग़ालिब आदी उर्दू कवी, सानी मिसरा, मतला, माफिया(अरे, काफ़िया ना? माझ्यासारख्यांना माफिया आणि काफ़िया दोघेही सारखेच अगम्य!), रदीफ,शेर,एखादी सखी किंवा सखा,तिने/त्याने ढाळलेले अश्रू, एकांतात मारलेली मिठी(मिठी बास! जास्त पुढे गेल्यास सेन्सॉरची कात्री करकरते.) यांची सुरेख खिचडी करावी व शेवटी बरेच दुःख आणि विरह गुंफून गरम गरम वाढावी. या प्रकाराला मिळणारे प्रतिसाद गज़लांतील निष्णात व्यक्तींचे असतात किंवा 'म्हाराज काय बोलतात गावत नाय पन म्हाराजांची लीला म्हान हाय' वाल्या  गज़लेतले फारसे न कळणाऱ्यांचे असतात(मी त्यातली.). अधिक प्रतिसाद हवे असल्यास गज़लेला (किंवा जे काही असेल त्याला) चुकीच्या वर्गीकरणात टाकावे. उदा. गज़लेला 'रुबाई', मुक्तकाला 'सुनीत', सुनीताला 'गज़ल',  रुबाईला 'बालगीत' म्हणावे. म्हणजे आणखी जास्त प्रतिसाद येतात. 


१०.मनोगतस्तुती आणि मनोगतावरील प्रतिसाद कसे असावेत?नसावेत?
हा अजरामर विषय आहे. या विषयावर चर्चा सुरू करण्यासाठी एकच पात्रता पुरेशी आहेः दिसेल त्या झाडाची पानं खाणाऱ्या बकरीप्रमाणे मनोगतावर येणारे अक्षर न अक्षर वाचून काढणे. यातून 'कोण कोणाला कधी आणि काय म्हणाले' हा इतिहास पक्का होतो आणि त्यावर लिहिता येते. प्रत्येक वादग्रस्त आणि हमरीतुमरीवर गेलेल्या लिखाणाचे दुवे उकरून काढून लेखात दिल्यास रंगत आणखी चांगली वाढते. प्रतिसाद मिळून हा लेख जुना होऊन दुसऱ्या तिसऱ्या पानात हरवला की आपण स्वतः परत एखादी मनोगतावरील वादग्रस्त घटना शोधून प्रतिसाद द्यावा. म्हणजे हरदासाची कथा परत चालू राहते.


११. विडंबनेः
गज़लांची/कवितांची विडंबने करायला आवश्यक पात्रता गज़लबहाद्दरांसारख्याच. पण चांगले आणि उस्फूर्तपणे प्रतिसाद मिळवणारे विडंबन लिहायचे असल्यास स्वतःच्या बायकोचे निरीक्षण करून तिच्यावर विनोद करणारे किमान दोन शेर विडंबनात येणे 'म्यांडेटरी' आहे  हे कृपया लक्षात ठेवावे. स्वतः; स्त्री(स्त्री मुक्ती वादी) असल्यास पुरुषजातीची निंदा करणारे जहाल विडंबन लिहावे. 'पुरुष की स्त्री? कोण चूक?' हा विषयही अजरामर चर्चाविषय आहे त्यामुळे प्रतिसाद हमखास. न मिळाल्यास प्रस्तुत लेखिकेकडून एक पुरुषमुक्तीवादी कविता मोबदला म्हणून मिळेल व ती आपल्या नावावर खपवण्याची परवानगीही.  


तर मंडळी, यापुढे लेखन करताना हे सर्व मुद्दे विचारात घ्या आणि प्रतिसाद झेलायला मोठी झोळी घेऊन तयार रहा!(योग्य सल्ल्याबद्दल प्रस्तुत लेखिकेला प्रत्येक ५ प्रतिसादांमागे १० रु. पाठवणे आवश्यक. कृपया १० रु. ची नोट त्या लिखाणाच्या मुद्रित आवृत्तीत घालून कुरियरनेच पाठवावी.अन्य मार्गाने पाठवल्यास नोट ठेवून घेऊन लिखाणाला मिळालेले जास्तीचे प्रतिसाद प्रशासकांमार्फत उडवून टाकले जातील.)