माझ्या काही मित्राना जपानमध्ये आलेले अनुभव येथे कथन करीत आहे.आणि मग दुसऱ्या महायुद्धात पूर्ण बेचिराख झालेले हे छोटेसे राष्ट्र प्रत्येक क्षेत्रात का आघाडीवर आहे याचे आश्चर्य वाटत नाही.
हे मित्र एका कॉन्फरन्ससाठी एका हॉटेलात उतरले,तेथून कॉन्फरन्सच्या ठिकाणी जाण्यासाठी त्यानी टॅक्सी केली.वाटेत काही कारणामुळे टॅक्सीवाला रस्ता थोडासा चुकला पण मग त्याने चूक सुधारली,आणि योग्य वेळात कॉन्फरन्सच्या जागी आणून सोडले.टॅक्सीचे भाडे २७०० येन झाले माझ्या मित्राने ३००० येन दिले आणि ३०० येन परत घेण्यासाठी थांबला,कारण जपानमध्ये टिप घेणे कमीपणाचे समजतात,तर टॅक्सीचालकाने ६०० येन परत केले.माझ्या मित्राने त्याला हे लक्षात आणून दिल्यावर त्याने उत्तर दिले की तो रस्ता चुकल्यामुळे जी भाड्यात वाढ झाली होती ती ३०० येन इतकी होती त्यामुळे तेवढी जादा रक्कम त्याने परत केली होती.
एकदा त्यानी रस्त्यावरच्या टपरीवजा दुकानातून एक वस्तू खरेदी केली ,त्या विक्रेत्याला इंग्रजी येत नव्हते आणि मित्राला जपानी !त्यामुळे त्या वस्तूची किंमत कशी द्यायची याचा पेच पडला शेवटी मित्राने आपल्या खिशात असलेली नाणी त्या विक्रेत्याच्या समोर धरली त्यातील बरोबर त्या वस्तूच्या किंमतीयेवढी नाणी त्या विक्रेत्याने उचलून घेतली.
या मित्राची पत्नी आपल्या छोट्या मुलीला घेऊन पदपथावरून चालत होती.तिच्यामागून एक जपानी मुलगा सायकलवर बसून येत होता.(तेथे सायकल पदपथावरूनच चालवतात म्हणे)त्याच्याकडे या दोघींचे लक्षच नव्ते जेव्हा गेले तेव्हा हा मुलगा खाली उतरून सायकल हातात धरून चालत होता,त्यांचे लक्ष गेल्यावर त्यानी त्याला वाट दिली तेव्हा तोच त्याना सॉरी असे म्हणून सायकलवर बसून निघून गेला.
हा शेवटचा अनुभव माझ्या मुलाने सांगितला आहे. जपानी उद्योजक आपल्या मालाच्या निर्मितीच्या बाबतीत फारच काटेकोर असतात आणि जास्तीत जास्त निर्दोष निर्मिती करण्याचा प्रयत्न करतात त्याविषयीचा हा किस्सा सांगण्यात येतो.एका अमेरिकन कंपनीने एका जपानी कंपनीला एका यंत्राच्या काही विशिष्ट भागांची मागणी नोंदवली आणि नेहमीप्रमाणे ५% भाग सदोष चालतील असे नमूद केले जेव्हा त्यांच्या मागणीची पूर्तता करणारे मालाचे खोके अमेरिकन कंपनीत उघडले गेले त्यात त्याना मागणी केलेल्या भागांच्या बरोबरच एक छोटे खोके मिळाले आणि सोबत पाठवलेल्या पत्रात लिहिले होते की आपण मागणी केल्याप्रमाणे माल पाठवत आहोत,आमच्याकडे सदोष भाग करण्याची पद्धत नसल्यामुळे ५% सदोष भाग मुद्दाम तयार करून वेगळे पाठवत आहोत.या गोष्टीत कदाचित थोडी अतिशयोक्ती असण्याची शक्यता आहे तरीही मालाच्या दर्जाविषयी ते अतिशय जागरूक असतात हे खरेच.