जीएकथांमधले भाषासौंदर्य -१

जी. एं. वरील माझ्या याआधीच्या लेखानंतर जी.एं. चे साहित्य आंतरराष्ट्रीय पातळीवर का गेले नाही असा एक मुद्दा उपस्थित झाला होता. मला वाटते जी.एं. ची विलक्षण शब्दकळा हेसुद्धा त्यामागचे एक कारण असावे. जी.एं. ची पात्रे जितकी अस्सल मराठी मातीतली आहेत, तितकीच त्यांची भाषाही झपाटून टाकणारी आणि अनुकरण किंवा अनुवाद करता न येण्यासारखी आहे. जी.एं. च्या कथांचे अनुवाद करणे हे (अनुवादकर्त्याच्या कुवतीविषयी शंका न घेताही) जवळजवळ अशक्यच आहे.


जी.एं. च्या कथांमधील भाषा ही उपमा-उत्प्रेक्षांनी खच्चून भरलेली तरीही घरगुती साधी आणि नैसर्गिक आहे. बऱ्याच वेळा त्यांनी वापरलेल्या उपमा वाचताना वाचक थबकतो, थोडेसे मागे जाऊन ते वाक्य परत वाचतो आणि 'या माणसाला हे कसे सुचले असेल?' असा विचार करू लागतो.


'अमुकसारखे' किंवा 'तमुकप्रमाणे' याशिवाय जी.एं. ची कथा पुढे सरकतच नाही. ही मानली तर जी.एं. ची मर्यादाही आहे, पण जी.एं. च्या या उपमा यज्ञात हात घालून जळता निखारा बाहेर काढावा तशा अति तेजस्वी जळजळीत असतात. मग त्यांच्या कथेत कधी 'गाव एका कुशीवर घेऊन पसरलेली वाळू आणि तिच्यावर वाळत घातलेल्या निळसर चुणीदार वस्त्राप्रमाणे दिसणारा' समुद्र असतो, 'कुत्सित, कपटी डोळ्यांप्रमाणे दिसणाऱ्या खिडक्या असलेले एखाद्या अजस्त्र जबड्यासारखे दिसणारे जुने घर' असते, 'भिंतीला हात लावताच मोगरा फुलवणारी आणि एका मृदू शब्दाने ऐकणाऱ्याच्या मनावर कशिदा काढणारी बहिण' असते, 'भरतीच्या वेळी मोठमोठे हिरवे फणे काढून वाढणारे पाणी' असते, 'प्रदर्शनातील काकडीप्रमाणे जाड, निबर दिसणारी मुलगी' असते आणि 'मुठी घट्ट आवळून सोवळ्याच्या काठीप्रमाणे ताठ, निर्जिव उभी असलेली' रुक्मिणी असते.


एखाद्याने महिनाभर विचार करून शोधाव्या अशा या उपमा जी.एं. च्या 'पराभव' या एका कथेत येतात. 'रक्तचंदन' या कथासंग्रहातील 'सोडवण' या पुढच्या कथेत जुनेऱ्याची घडी करून त्यावर स्वच्छ धुतलेले तांदळाचे दाणे रांगेने मांडावेत तसे टाके घालणारी डॉ. फाटकांची आई आहे, एखाद्या फळावर अळी बसावी तसे उभट, ठिपक्यांसारखे डोळे घेऊन बसलेले डॉक्टर दाते आहेत, चेहऱ्याच्या कडा मोडून बाहेर पडणार असे वाटण्यासारखा टवटवीतपणा असलेली वृंदा आहे, डॉक्टर पाठकांवर दुपारी येऊन आदळणारा काळ्या, जळजळीत लाटेसारखा त्यांचा भूतकाळ आहे, जमिनीवर फोड उठावेत तशी त्यांच्या आसपास विखुरलेली सिगारेटीची थोटके आहेत, स्वतःच्या लालसर, गुळगुळीत चेहऱ्याच्या जागी आपल्या आयुष्याचा तसलाच कंद बाळगणारा दिवगी आहे, अंगात मॅग्नेशियमची तार जळाल्याप्रमाणे भाजत उजळून डॉक्टरांची 'सोडवण' करणारा मृत्यू आहे...


जी.एं. च्या कथांमधील उपरोध हा कमालीचा टोकदार आणि उकळत्या तेलासारखा तप्त आहे. 'जन्म' या कथेत भाबड्या आदर्शवादाची टिंगल करताना ते लिहितात की ' व्यंक्याच्या खाटेतील ढेकणांप्रमाणे भारतात सुपुत्रांचा नुसता बुजबुजाट झाला आहे...' पोलिसाच्या अंगावरील न शोभणाऱ्या खाकी कपड्यांचे वर्णन ते 'अंगावर पातळ शाडू ओतल्याप्रमाणे दिसणारे खाकी कपडे' असे करतात. 'राधी' त्यांच्या या कथेतला गणेशवाडीभट हा तर सगळ्या भटाब्राह्मणांना पोचवून आलेला खराखुरा विद्रोही भट. दत्तजयंतीला गावातली मंडळी पूजेसाठी वाट बघत बसलेली असताना शेजारच्या गावी कुस्तीच्या फडात कुस्ती खेळून त्यांना संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ताटकळवणारा. त्यावर भुकेने कळवळून 'भटजी, दत्तजन्म करण्याची ही वेळ आहे, की काय आहे?' या परशाच्या प्रश्नावर गणेशवाडी भटाने दिलेले उत्तर मुळातून वाचण्यासारखे आहे. तो खवळून म्हणतो,
"अरे जा रे जा फुसकीच्या! मला आलाय विचारायला! दत्तारामाचा जन्म अमुक वेळी झाला अशी त्याच्या आयांनी काय येऊन तुमच्या कानात कुजबुज केली होती काय रे भडव्यांनो? दत्त जन्मतही नाही, संपतही नाही. संपतो तो दिवस. तुम्हाला लेको खादीला उशीर झाला, म्हणून तुमची ही ओरड! जा आता घरी आणि पिंडाएवढे गोळे गिळून पडा मढ्यासारखे! म्हणे ही वेळ की काय!" हाच गणेशवाडी भट पुढे कथानायकाला डॉक्टरनी खायला सांगितलेली पण त्याच्या घरी निषिद्ध असलेली अंडी आणून देतो. तीपण कशी? तर पूजेहून येताना एका ताम्हनात फोडलेला नारळ, दोनचार फुले, पळी पंचपात्र याच्या जोडीला तीन शुभ्र अंडी! त्यावर आबांनी कुरकुर करताच तो पुन्हा गरजतो,
"आब्या, याद राख हं! मला अक्कल शिकवशील तर हाडं सैल करून देईन बघ एक दिवस! हाडं आहेत की नाहीत कुणास ठाऊक म्हणा! पण असा यमासारखा एक दणका देईन की कापडानं जमिनीवरचा तुझा डाग तेवढा पुसावा लागेल बघ! लोकांची भीती तुला! परसात तांब्या घेऊन जाताना चोरी करायला निघाल्यासारखा लपूनछपून जातोस तू बेट्या! आणि मला शिकवायला आलाय! फुलं, नारळ देवानं उत्पन्न केली आणि अंडी मात्र कुणी उपटसुंभानं तयार केली होय?"
हाच गणेशवाडी भट कथानायकाने 'एकसमयावच्छेदेकरून' या शब्दाचा चुकीचा उच्चार केला म्हणून दम भरतो " ही मराठी भाषा, या तुझ्या आबानं चहा पिता पिता कणीक मळून ठेवावी तशी खाजगी मळून ठेवली होय रे तुझासाठी?...."
राधीच्या काळ्या कुत्र्याला फिरायला कशाला घेऊन जाता असे नाकखुपशा गणू शिंप्याने विचारताच हा गणेशवाडीभट त्याच्या रानवट भाषेत उत्तरतो,
"तू चिंधीचोर तेवढा उपटसुंभासारखा मला शिकवायचा बाकी राहिला होतास बघ! अरे, त्या कुत्र्याला काही खायला दिलं तर ते जाणेल तरी. मी मरायला लागलो तर एकदा येऊन जाईल, घसा ताणून ओरडेल तरी. पण तुमच्यासारख्यांची ढुंगणं धूत जन्म काढला तर करंगळीवर तुम्ही मुतायला तयार होणार नाही, डुक्करचंदानो! अरे लडदू, चार कुत्री भोवती ठेऊन फोटो काढून घ्यायला दत्ताला लाज वाटत नाही. एक कुत्रं बरोबर घेऊन हिंडायला मला सोट्या रे कसली लाज?"
या गणेशवाडीभटाचा नाऱ्या म्हणजे गावावरून ओवाळून टाकलेले, आडदांड, होळीत अर्धवट जळालेल्या ओंडक्यासारखे पोर असते. गंगव्वाच्या फुलाच्या पुड्यात दोन मोठ्या बेडक्या घालून तो पुडा तिच्या खिडकीतून आत फेकणारा, भास्कराचार्य ज्योतिष्याच्या घरावरील 'येथे रमल सांगितले जाईल' ही पाठी काढून तेथे 'सदरे-चोळ्या शिवणार' ही पाटी लावणारा. त्याचे वर्णन करतानाही जी.एं. ची लेखणी अशीच फुलून आली आहे. वास्तविक 'राधी' ही अत्यंत करूण आणि काळजाला हात घालणारी कथा, पण तीवर जी.एं. नी विनोदाची आणि उपरोधाची अशी काही लाजवाब पखरण केली आहे की ज्याचे नाव ते!
जी.एं या च्या चार कथांमधील भाषासौंदर्य असे भूल पाडणारे आहे.