जगा! तुझी सारी तऱ्हा

संसदेत बाँब स्फोट करून बटुकेश्वर दत्त आणि भगतसिंग यानी स्वतः:ला अटक करून घेतली व ते अभियोगाला सामोरे गेले. परिणाम माहीत असूनही. कारण अभियोग ही त्यांच्यासाठी इंग्रजांचा जुलूम जगापुढे मांडायची व सरकारचे वाभाडे काढायची सुवर्णसंधी होती. भगतसिंग तर लाहोर अभियोगासाठीही सरकारला हवेच होते. अभियोगाचा निकाल लागला.  भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना फाशीची शिक्षा सुनावली गेली. ते भाग्यवान. देशासाठी हौतात्म्य पत्करल्याच्या अतीव समाधानात ते हसतमुखाने फासावर गेले व अजरामर झाले. बटुकेश्वर दत्त मात्र इतके नशीबवान नव्हते, त्यांना जन्मठेप झाली व त्यांची आपल्या प्राणप्रिय साथीदारापासून ताटातूट झाली. आपले साथीदार आपल्याला सोडून जाणार हे दु:ख जन्मठेपे पेक्षा अधिक होते.


१५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. बटुकेश्वर दत्त यांना प्यारा तिरंगा फडकलेला पाहायला मिळाला खरा, पण लवकरच त्यांना भीषण वास्तवाला सामोरे जावे लागले. आता त्यांची दखल घ्यायला कुणालाच वेळ नव्हता आणि गरज तर अजिबात नव्हती, उलट असे लोक अंधारात राहिले तर बरे असा दृष्टिकोन नेत्यांचा होता. बटुकेश्वर दत्त यांचे सगळे साथीदार एकतर फासावर गेले होते वा पोलिसांच्या गोळ्यांना बळी पडले होते, कुणी आमरण उपोषणाने स्वर्गस्थ झाले होते. इतर अंदमानला गेलेले सर्वत्र विखुरले गेले होते, कुणाला कुणाचा थांगपत्ता नव्हता.


२३ मार्च १९६३ रोजी भगतसिंगांच्या खडकंटला गावी भगतसिंहांच्या पुतळ्याचे अनावरण भगतसिंगांच्या मातोश्री विद्यावतीदेवी यांच्या हस्ते झाल्याचे त्यांना एक माहितीपटामुळे समजले आणि त्यांना आपली आई हयात असल्याचा आनंद झाला. त्यांनी तिचा कसून शोध घेतला, व हुतात्मा जतिनदासचा बंधू किरण याच्या मदतीने तिची भेट घेतली. त्या वीरमातेला साक्षात आपला पुत्र भेटल्याचा आनंद झाला. जाताना भगतसिंग आपल्या आईला सांगून गेले होते की माझ्याच देहाचा एक भाग म्हणून बटुकेश्वराला तुझा दुसरा पुत्र म्हणून ठेवून जात आहे. पुढे काही दिवस दत्त  आपल्या मातेसमवेत राहिले. मग ते दिल्लीला गेले. सगळे आयुष्य देशकार्यासाठी वाहिलेले, आयुष्याचे ध्येय एकच - 'स्वतंत्र हिंदुस्थान'. मात्र स्वातंत्र्य मिळाल्यावर काय? आपले काय होणार हा 'व्यवहारी' विचार त्या महात्म्यांपैकी कुणीच कधी केला नव्हता. शिक्षणही अर्धवट सोडलेले. आता केवळ हलाखीचे जिणे आणि उपेक्षा नशिबी होत्या. संभावित हुशार लोक वेळीच काळाची पावले ओळखून पद, स्थान वगरे बळकावून बसले होते. त्यांना तमाम स्वातंत्र्यवीर व त्यांचे कार्य याचा सोयिस्कर विसर पडला होता. हे महात्मे तसेही जनसामान्यांना फारसे ज्ञात नव्हते, आणि त्यांची महती लोकांना ठाउक होणे हे राज्यकर्त्यांना परवडणारे नव्हते.


बटुकेश्वरांना आजारपणाने गाठले. ते दिल्लीच्या इस्पितळात दाखल झाले. मात्र उपचारासाठी पैसा कोण देणार? उपचार आखडले. अखेर त्या मातेला हे समजताच तिने इंदोर व उज्जैन येथील सत्कारात मिळालेली दोन-अडीच हजाराची रक्कम देऊन टाकली आणि आपल्या मुलाचे उपचार चालू केले. मात्र पारतंत्र्यात असताना इंग्रजांनी केलेले हाल व स्वातंत्र्यानंतर आपल्यांनीच केलेली उपेक्षा यामुळे झिजलेले शरीर दाद देईन. हाल अपेष्टा सोसत जिवंत राहिलेला तो पुत्र बहुतेक केवळ आईची भेट घेण्यासाठी जिवंत होता. २० ऑगस्ट १९६५ ला बटुकेश्वर दत्त यांनी देह ठेवला. मातेला आणखी एक पुत्रवियोगाचे दु:ख सहन करावे लागले. आईच्या मांडीवर डोके ठेवून मरताना त्यांनी अखेरची इच्छा प्रकट केली ती त्यांचे अंत्यसंस्कार फिरोजपूर येथे भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या स्मारकाजवळ करण्याची.


आयुष्यभर उपेक्षिलेल्या या वीराचा मृत्यू ही मात्र नेत्यांना पर्वणी वाटली. त्यांना श्रद्धांजली देत आपले नाव व छबी झळकवून 'देशभक्त' होण्याची संधी हे नेते सोडणार नव्हते. मात्र त्या मातेने आपल्या पुत्राचे अंत्यसंस्कार त्याच्या अखेरच्या इच्छेनुसार करण्याचे ठरविले. मग सरकारनेही साथ दिली. गेली सोळा वर्षे मूग गिळून बसलेल्या नभोवाणीला वाचा फुटली आणि तिने आपले काम चोख बजावले. नभोवाणीवरून बटुकेश्वर दत्त यांचे पार्थिव आगगाडीने दिल्लीहून पंजाबात नेले जाणार असल्याची बातमी व गाडीचा तपशील दिला गेला. अखेरचा प्रवास सुरू झाला. जनता काही नेत्यांसारखी कृतघ्न नव्हती. गाडी स्थानकांत शिरताच प्रत्येक स्थानकात त्या पार्थिवावर हार पडत होते, लोक पायावर पैसे ठेवत होते. रात्रभरात २५००० रुपये जमले! अंत्यसंस्कारासाठी पंजाबचे अनेक पोलिस अधिकारी व मंत्री हजर होते. सरकारी इतमामाने अंत्यसंस्कार पार पडले. पंजाबचे तत्कालीन शिक्षणमंत्री प्रबोधकुमार यांनी दत्त यांच्या कुटुंबीयासाठी ५००० ची रक्कम देऊ केली. आपल्या भाषणात ते म्हणाले की हे पैसे जर त्या महान राष्ट्रभक्ताला त्याच्या हयातीत मिळाले असते तर आज त्याच्यावर झिजून मरायची वेळ आली नसती.


अशा महान विभूतीची ही हकिकत वाचताना मला नेहमी यशवंतांच्या ओळी आठवतात:


एक तरी बागेतील
फूल कौतुके देशील
बाळगिली आशा फोल
अता पुष्पराशीमाजी बुडे मात्र ताटी


जगा ! तुझी सारी तहा सदा उफराटी


 

b dutt