साठ वर्षानंतर

साठ वर्षानंतर जन्मतिथि व जन्मतारीख एकाच दिवशी येते कां? असा प्रश्न मनोगतावर विचारला गेला होता. तर दर १९ वर्षाने असे होते अशी माहिती दुस-या मनोगतीने दिली होती. या प्रश्नाचे उत्तर शोधणे इतके सोपे नाही. इंग्रजी महिने २८, २९, ३० किंवा ३१ दिवसांचे व वर्ष ३६५ किंवा ३६६ दिवसांचे असते तर मराठी पंचांगाचा महिना २९ किंवा ३० दिवसांचा असतो व वर्ष ३५४ किंवा ३५५ दिवसांचे असते. यांतील ११-१२ दिवसांची तूट सुमारे दर बत्तीस महिन्यांत येणा-या अधिक महिन्याने भरून निघते. या गुंतागुंतीच्या हिशोबांत तारीख व तिथि यांची साध्या सोप्या अंकगणिताने सांगड घालणे शक्य नाही.  


गुरु, शनि व मंगळ या ग्रहांच्या भ्रमणकालाचा ल.सा.वि. साठ इतका येतो त्यामुळे साठ वर्षानंतर सारे ग्रह पुन्हा एकदा आपापल्या स्थानावर येतात म्हणून साठ संवत्सरानंतर पुन्हा त्याच नांवाच्या संवत्सरांचे चक्र सुरू होते असेही कुठे तरी वाचले होते. साठी पूर्ण केलेल्या व्यक्तींच्या वाढदिवसाची तिथि व तारीख यांत फरक असल्याचे ऐकले होते. या सर्वांची शहानिशा करावी असे अनेकदा वाटले होते पण इथे तर मागच्या वर्षीचे पंचांग सापडत नव्हते, मग इतकी जुनी माहिती कुठून मिळणार? यासाठी मग इंटरनेटवर थोडी शोधाशोध केली व त्यावरून मिळालेली माहिती घेऊन सोपी गणिते मांडली. त्या आकडेमोडीवरून खालील गोष्टी दिसतात.


इंग्रजी कॅलेंडरमधील एक वर्ष पृथ्वीच्या सूर्याभोवती  भ्रमणाच्या कालावधीएवढे असते हे सर्वश्रुत आहे. हा काल ३६५ दिवस, ५ तास, ४८ मिनिटे, ४६ सेकंद एवढा असतो. मराठी पंचांगातील महिना अमावास्या ते अमावास्या एवढा असतो. दर महिन्याला चंद्र ज्या वेळी सूर्याच्या मागून येऊन त्याच्या पुढे जातो तेंव्हा नवीन महिना सुरू होतो. आणि त्या वेळी सूर्य कोणत्या राशीमध्ये असेल त्य़ावरून त्या महिन्याचे नांव ठरते. कधी कधी सूर्याने एका राशीत प्रवेश केल्या केल्या महिना बदलतो व तीमधून बाहेर पडण्याच्या थोडे आधीच पुन्हा एकदा महिना बदलतो. अशा वेळी अधिकमास येतो. चंद्राच्या या  महिन्याचा काळ २९ दिवस, १२ तास, ४४ मिनिटे एवढा आहे. यावरून हिशोब केला तर १९ वर्षाच्या कालावधीत सात अधिक महिन्यासह २३५ महिने येतात त्याचे ६९३९.६८ दिवस भरतात तर पाश्चात्यांच्या १९ सौर वर्षांचा कालावधी ६९३९.५६ दिवस इतका भरतो.  यावरून जवळ जवळ दीडशे वर्षे दर १९ वर्षांनी तिथि व तारीख पुन्हा पुन्हा बरोबर येतील असे दिसते.


साठ वर्षांनी सर्व ग्रहस्थितींची पुनरावृत्ती होणे मात्र तितकेसे बरोबर नाही. याचे कारण बुध, शुक्र, मंगळ, गुरु व शनि यांचे सूर्याभोवती भ्रमणाचा काळ अनुक्रमे ८८ दिवस, २२५ दिवस, ६८७ दिवस, ११.८६ वर्षे व २९.४६ वर्षे इतका आहे. पृथ्वी स्वतः गतिमान असल्यामुळे पृथ्वीवरून दिसणारा त्यांच्या राशीचक्रातून फिरण्याचा काळ आणखी वेगवेगळा आहे. यातील कोठल्याच आकड्याने साठ वर्षातील दिवसांच्या संख्येचे पूर्ण विभाजन होत नाही. त्यामुळे त्या कालावधीत त्यांची आवर्तने पूर्ण होत नाहीत व ते साठ वर्षापूर्वीच्या स्थितींच्या आगेमागे राहतात.


योगायोगाने एक प्रोग्रॅमही मिळाला तो वापरून भूतकाळातील एक काल्पनिक तारीख व वेळ घेऊन त्या दिवशी असलेल्या ग्रहांच्या जागा पाहिल्या व त्यानंतर १९, ३८, ५७ व ६० वर्षानंतर येणा-या दिवशी ते कोठे होते ते पाहिले. त्यावरून असे दिसले की दर १९ वर्षांनी सूर्य पहिल्या वेळेच्या राशीत व चंद्र पहिल्या वेळेच्या नक्षत्रांत एकाच वेळी येतात. याचा अर्थ त्याच तिथीला तीच तारीख येत असणार. इतर ग्रह मात्र इतस्ततः विखुरलेले दिसले. साठ वर्षानंतर येणा-या तिथीचे दिवशी सूर्य व चंद्राव्यतिरिक्त अपेक्षेप्रमाणे शनि ग्रह आपल्या पूर्वीच्या जागी आला आणि मंगळ, बुध व गुरु एक घर आजूबाजूला आले तर शुक्र, राहू, केतु दोन तीन घरे दूर राहिले. सगळ्या ग्रहांनी पुन्हा एकाच वेळी जन्मकुंडलीतील आपापल्या जागी येण्याचा योग कदाचित माणसाच्या आयुष्यात कधी येतच नसेल. 
वरील बरीचशी माहिती अवकाशवेध, नासा व इतर संकेतस्थळांवरून मिळाली.