असे का?

एकाही जुन्या प्रश्नाचे उत्तर न देता काही नवीन प्रश्न टाकून दीपोत्सव निघून गेला. लक्ष्मीरोडवर दुचाकीच्या पायात सुतळी बाँब फुटला आणि खाली पडतापडता वाचलो. सूतिकागृहात कान गच्च बांधूनही आवाजाने किंचाळणारी आणि थकून केविलवाणेपणाने पडून रहाणारी मुले आणि आधीच निद्रानाशाने छळलेले असताना रात्रीबेरात्रीच्या स्फोटाने अधिक भेदरलेले वृद्ध पाहिले. उडून गेलेल्या लडीत न उडालेले सुट्टे फटाके शोधणारी झोपडपट्टीतली मुले पाहिली, दिवाळीच्या दिवसांतला वाढलेला दारुचा (दोन्ही प्रकारची) खप पाहिला...
ते जाऊ द्या. या वर्षी खरे अस्वस्थ केले ते 'हॅपी दिवाली' ने. मला आलेल्या पन्नासेक दूरध्वनींपैकी फक्त एक मुलगी "सर,तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा.." असे म्हणाली. बाकीचे एकोणपन्नास 'हॅपी दिवाली' वाले. मी प्रतिसाद म्हणून 'तुम्हालाही दिवाळीच्या शुभेच्छा' असे म्हणालो तरी कुणाच्या काही लक्षात आलेसे वाटले नाही.  
पुढच्या दिवाळीत याची शिस्तशीर वर्गवारी करून 'हॅपी नरकचतुर्दशी, हॅपी बलिप्रतिपदा, हॅपी भाऊबीज, हॅपी भाकड दिवस' अशा शुभेच्छा स्वीकारण्याची तयारी ठेवली आहे.
आजकाल घरच्या घरी सकाळी उठल्याउठल्या आईबापांनी मुलांना, नवराबायकोने एकमेकाला 'गुडमॉर्निंग' असे म्हणायचे असते म्हणे. घरात कुणी आजारी असले की  घरच्याच लोकांनी 'गेट वेल सून' असे एक कार्ड हळूच आजारी माणसाच्या उशाशी आणून ठेवायचे असते म्हणे, मुलांनी आईला आई आणि बापाला बाबा म्हणणे हे तर केंव्हाच मागासलेपणाचे झाले आहे. (पहा: कोणत्याही वृत्तपत्रातील वाढदिवसाच्या शुभेच्छा - वीसातले अठरा पप्पा, मम्मी किंवा मम्मी डॅडी!), लग्नानंतर पोटुशी राहिलेल्या मुलीकडे 'नवे जुने' नव्हे, तर 'गुड न्यूज' आहे, असे म्हणायचे असते म्हणे!
बरे, एवढेच जर इंग्रजीचे प्रेम आहे, तर पुढे संभाषण इंग्रजीत वाढवून पहा. मंडळी धाडकन देशी भाषेवर येतात. आणि ही देशी भाषा आपलीच असल्याने ती शुद्ध वगैरे असली पाहिजे असे बंधन नाही. आतल्या चड्ड्या-गंजिफ्राक कळकट आणि भोके पडलेले चालतील, वरच्या शर्टची इस्त्री कडक पाहिजे!
मुद्दा इंग्रजी-मराठीचा नाही. संस्कृती-परंपरेचा तर नाहीच नाही. सवाल आहे तो गोंधळलेल्या मनस्थितीचा. प्रश्न आहे डोळ्यावर झापड ओढण्याचा.
आपले काही चुकते आहे, असे या लोकांना वाटत नाही का?
की खरेच यात चुकीचे असे काही नाही?


अवांतर: सदर विषय फक्त भारतात, विशेषतः महाराष्ट्रात रहाणाऱ्या मराठी मंडळींचा चालला आहे. परदेशस्थ लोकांची परिस्थिती वेगळी असते याची नम्र जाणीव ठेवून.