तुम्हाला काय 'वाटत्ये', काय 'म्हणायच्ये'?

'नाहीये', 'होत्येय', 'झाल्येय' सारखी भाषा आजकाल लिखाणात जिथेतिथे दिसते. एका ठिकाणी वाचलेल्या हा 'निनावी' ओळी -


अजून कुठे रात्र पुरती हरल्ये
अजून कुठे तहान पुरती सरल्ये
अजून एकदा तुला डोळ्यांनी पिऊन घेऊ दे..
मग लिहीन की कविता..


ओळी मस्त आहेत. कविता सुंदर आहे आणि कवितेत अशी भाषा आल्यास काही नाही. कारण अखेर कवी शब्दांचे ईश्वर. पण 'नाहीये', 'होत्येय', 'झाल्येय' असे शब्दप्रयोग प्रमाण भाषेत करू नयेत, असे माझे मत आहे. 'दरवळतायत', 'चुरगळतायत',  किंवा  'लिहायचाय', 'करायचाय' सारखे शब्दप्रयोग 'नाहीये'पेक्षा वेगळे नाहीत. एकंदर लिखाण/प्रतिसाद प्रमाण भाषेत असताना मध्येच असे शब्दप्रयोग वाचून कुणाला ते 'नाटकी' वाटू शकतात आणि कुणाकुणाला हसू येऊ शकते.

तुम्हाला काय 'वाटत्ये', काय 'म्हणायच्ये'?

चित्तरंजन