ह्यासोबत
मी पोप्याचा हात खेचायचा प्रयत्न केला. पण पोप्याचा जोर वाढला होता. जितका जोर वाढला होता तितकाच त्याचा तोलही जात होता. "एवढंसं कार्टं... च्यामारी" पोप्याच्या बडबड चालुच होती. तिचा कशाशीच संदर्भ लागत नव्हता. पोप्याला कंट्रोल करणं तर भारी अवघड झालं होतं.
"ए, गप बस ए शिऱ्या!", "कुत्र्या..." पोप्याच्या अंगात कली नाही कदाचित क्रूर सैतान संचारला असावा असा त्याचा एकंदर आविर्भाव होता. पोप्या खुद्द त्याच्या किंबहुना आम्हा सगळ्यांच्याच जिवलग दोस्ताला अर्वाच्य शिव्या देतोय, हे कुणालाच खरं वाटलं नसतं. पण दुर्दैवानं प्रत्येकजण या घटनेला साक्षिदार बनला होता.
"पोप्या, कूल यार! एव्हरीथिंग इज ऑलराइट", शिऱ्यानं पुन्हा एकदा पोप्याला शांत करत त्याच्या खांद्यावर हात टाकला. "हप्प.." पोप्यानं शिऱ्याचा तोच हात शिऱ्याच्या पाठीमागे आवळत शिऱ्याला ढकललं. तो धक्का एवढा तीव्र होता कि शिऱ्या जिन्यावरुन गच्चीत कोसळला. "गर.र..र्ह." पोप्याच्या तोंडून अनपेक्षित अशी गुरगुर ऐकु आली.
"जाऊ दे यार त्याला काय करायचंय ते करु दे", स्वप्नील शिऱ्याकडे धावला. शिऱ्याला गुडघ्यावर चांगलाच मार बसला होता. "रक्त.." स्वप्नील. सगळेजण शिऱ्यापाशी पोचलो. मी तिरस्कारानं पोप्याकडं पाहिलं. तो जिन्यावर जिथल्या तिथं उभा होता. त्याची ती जळजळीत नजर आणि डोळ्यातली चमक पाहुन माझा ठोका चुकला.
"शिऱ्या, खुप जोरात लागलं का रे?" मी माझा मफ़लर शिऱ्याच्या गुडघ्याला बांधत विचारलं. "नाही रे. आय ऍम ओके. पण पोप्या..पोप्याला काय झालंय कळत नाही" शिऱ्या मला धीर देत म्हणाला. " दारुच्या अंमलाखाली माणूस म्हणजे हैवान असतो!" स्वप्नील म्हणाला. "पण हा सगळा दारुचा प्रकार वाटत नाही" शिऱ्या. "अरे..तो बघ. तो एकटाच चाललाय वरच्या खोलीत!" शिऱ्या ओरडला. "...त्याला कव्हर करायला हवं, काहीही झालं तरी आपण सगळे जिवलग मित्र आहोत आणि एकत्र इथं आलो आहोत". "कड.ड़" आम्ही वर बघतोय तोपर्यंत पोप्यानं दारावर लाथ मारुन कडी तोडलीही होती.
"पोप्या..S..S", मी हाक दिली. पण पोप्या तसाच आमच्याकडं न बघता खोलीत शिरला. आम्ही जिन्याकडं धावलो. शिऱ्याही पोहोचला. पुढे कोण व्हायचं असा विचार मनात यायच्या अगोदरच दिप्या शेकोटीतलं एक लाकुड मशालीसारखं धरत पुढं झाला. दिप्या पुढे; त्याच्या मागं मी, आणि पराग. आणि शेवटची फ़ळी शिऱ्या आणि स्वप्नील असे आम्ही सगळे तो काहीही सपोर्ट नसलेला आणि दोन्ही बाजुना मोकळा असलेला जिना चढु लागलो.
जिन्याच्या मध्यभागी पोचलो असु ..आणि एकदम गडगडाट झाला. अगदी आकाशात वीज चमकल्यावर होतो तसा! वर आकाशात नजर फ़िरवली. आकाश निरभ्र होतं. इतक्यात..त्या आवाजापाठोपाठ "खिळ्ळ..टं..ट..न.." एखादं भांडं जमिनीवर पडावं, तसा आवाज झाला. आवाजाची दिशा ती खोलीच होती. मला अंगात कापरं भरल्यासारखं झालं. दिप्याच्याही डोळ्यांत विलक्षण भिती दिसली. पराग मशाल घेऊन पुढं झाला. आम्ही एक एक पाऊल पुढं टाकत होतो. बाहेर आम्ही सगळे आणि आमचा पोप्या ..कुणालाही कधीही काहीही मदत करायला सदैव तयार असणारा पोप्या...आत..आत एकटाच होता. माझी एक भुवई उडु लागली. काहितरी संकट नक्कीच उभं ठाकलं आहे. आणि त्या संकटाला माझा जिवलग दोस्त एकटा, अगदी एकटा तोंड देतोय, तेही त्या बंद खोलीच्या आत! मला काही सुचेनासं झालं. खोलीच्या मोकळ्या छतावर दोन घारी भिरभिरताना दिसल्या. मी आवंढा गिळला.
"अरे, चला लवकर आत, काय झालंय बघुया" मागुन शिऱ्याचा आवाज आला. आम्ही पुढे पाऊल टाकणार एवढ्यात, गच्चीच्या बाजुला असलेली त्या खोलीची खिडकी खाडकन उघडली आणि "धप..""उम्म..उहह" काहितरी गाठोड्यासारखं खाली पडलं. तो "उम्म..उहह"आवाज गच्चीवर पडलेल्या त्या वस्तुतून येतोय की आतल्या खोलीतून येतोय, काहीच कळेना. परागनं मशाल वर करून खाली पडलेल्या त्या वस्तुवर रोखली. कसलंतरी गाठोडंच असावं ते. नीट कळत नव्हतं. आकारावरुन ते गाठोडंच असावं आणि तो विव्हळणारा आवाज त्या खोलीतूनच आला असावा असा आम्ही अंदाज बांधला. "उम्म..म.उ..ह" पुन्हा तोच विव्हळणारा आवाज. "पोप्याचा नसावा. म्हणजे नक्कीच पोप्याशिवाय आणि कोणितरी त्या खोलीत आहे?, की पोप्याचाच?" ," मगाशी काहीवेळापुर्वी शिऱ्याला ढकलून देणारा पोप्या आत्ता विव्हळतोय? काय झालं असेल? आत असं काय असेल, ज्यामुळं पोप्याची अशी दयनीय अवस्था झाली असेल? की, तो आवाज दुसऱ्याच कोणाचातरी?", " पोप्यानं त्या आतल्या व्यक्तीला बुकलुन काढलं असेल ज्यामुळं कदाचित ती व्यक्ती अशी विव्हळतीय?" "पण का?", "कदाचित ती आतली व्यक्ती म्हणजे...मगाशी पोप्या बरळला तसं ..महिपतीचं कार्टं..?.. सॉरी सॉरी..नसेल, नसेल, तसं काही नसेल.." असंख्य विचारांनी मला पुरतं भंडावून सोडलं. माझी चलबिचल पाहून दिप्याची अस्वस्थता आणखीनच वाढली. त्यानं शिऱ्याला पुढे यायला वाट मोकळी करून दिली. आता मी दिप्या आणि स्वप्नील अशी शेवटची फ़ळी होती. माघारी फ़िरावं म्हटलं तर इकडं आड तिकडं विहीर अशीमाझी गत झाली होती. "कोण जाणे, खाली पडलेल्या त्या गाठोड्यातुन काही धोका संभवेल" माझा मनावरचा कंट्रोल सुटला होता.
शिऱ्यानं परागच्या खांद्यावर थोपटलं आणि पुढं होऊन हळुहळु उरलेल्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. परागला त्यामुळं थोडा धीर आला. "उम्म..म.उ..ह" पुन्हा तोच विव्हळणारा आवाज ऐकु आला. पण मला तो त्या गच्चीवर पडलेल्या गाठोड्यासारख्या दिसणाऱ्या वस्तुतून आल्यासारखं वाटलं. शिऱ्यानं मागं पाहून डोळ्यांनंच तिकडं लक्ष न देण्यास सुचवलं.
आता शिऱ्या आणि पराग त्या दारासमोर उभे, आणि उरलेले आम्ही दोन पायऱ्या सोडून त्यांच्यामागे! "कड..कड्ड.ड़.., पोप्या..ए पोप्या..." शिऱ्यानं दारावरची कडी वाजवली. आतुन काहीच प्रतिसाद आला नाही. "पोप्या..ए..पोप्या .." शिऱ्यानं खुणावल्यावर परागनं एक हाक दिली. आतुन एक पंधरा-वीस दगड फ़ेकुन मारावेत असा त्या दारावर आवाज झाला. "म्हणजे आत कोणीतरी आहे. कदाचित... नव्हे, नक्की!.. पोप्याच!" मला जरा हायसं वाटलं. दिप्या त्या गाठोड्याकडं बघत होता. गाठोड्यावरच्या लालसर मोठ्या ठिपक्यांनी माझं आणि दिप्याचं लक्ष वेधून घेतलं.माझा आवाज संपायच्या आत पुन्हा काही छोटे दगड त्या दारावर आतुन आदळले आणि त्या दाराला आतुन असलेली कडी निघाली. "उम्म..म.उ..ह" तोच आवाज पुन्हा!
शिऱ्यानं हिम्मत करून दार ढकललं. पण ते काही उघडलं नाही. परागनं जोर लावला...आणि ते दार अगदी सहजगत्या उघडलं आणि पराग..पराग तोंडावर पडला. आत प्रचंड धुळ आणि दोन्ही भिंतींना दोन खिडक्या. एक गच्चीच्या बाजुला.सताड उघडी..आणि दुसरी तिच्या समोरच्या भिंतीवर विहीरीच्या बाजुला, पण बंद. खोलीतल्या काळ्याकुट्ट अंधारात उघड्या खिडकीतून आलेला किंचितसा कवडसा आणि मशालीचा अस्थिर प्रकाश. शांत आणि अतिशय भेसुर अशी ती लांबुडकी खोली. खोलीत कसल्याशा जुनाट पेट्या...आणि एक आरसा. शिऱ्यानं मशाल एका हातात धरुन परागला दुसरा हात पुढे केला. मशालीच्या प्रकाशात मी त्या आरशात स्वतःला निरखण्याचा प्रयत्न केला. मला मीच दिसलो नाही! मी पुन्हा निरखून पाहिलं. आरशात माझ्या शेजारी एक अस्पष्ट आकृती दिसली. न बघितल्यासारखे करुन मी खिडकीकडं नजर वळवली. बाहेर पाच-सहा जण एका गाडीजवळ उभे होते...साधारण आमच्याच वयाचे असावेत. आमच्या या वाड्यात येण्याचा त्यांचा विचार असावा.एकाकडं बॅटरी आणि दुसऱ्याच्या हातात हॉकी स्टिक. पोप्या? हो, पोप्याच! हॉकी स्टिक हातात घेतलेला तो तरुण पोप्याच होता."अरे, हा काय प्रकार आहे? पोप्या..ऽ" मी जोरात हाक दिली. तसा कुणीतरी हात माझ्या तोंडावर दाबला. "म्म.म्म..ऽइ..पोप्या.ऽ" मी तो हात काढायच्या प्रयत्नात घामाघुम झालो आणि...आणि पावसाचे तुषार तोंडावर आले.
" कशाला बोंबलायला लागलायस?" पराग माझ्या तोंडावर उपडी झालेली सोड्याची बाटली सरळ करत अंगावर खेकसला. "मी ही तुझ्याबरोबर दारातून पडलो?" मी परागला विचारलं. "कसलं दार? काय बडबडतोयस?" पराग मला त्याच्या हातातलं घड्याळ दाखवु लागला. "पाच?" मी दचकुन उभा राहिलो, तसा दिप्याही उठून बसला, "अरे? बाकीचे कुठायंत?"
मी दिप्या आणि परग्या सोडले तर त्या गच्चीत आणखी कुणीच नव्हतं. "स्वप्न्या..ऽ.. शिऱ्या.ऽ..पोप्या.ऽ.ऽ" आम्ही हाका मारायला सुरुवात केली. एक वाऱ्याच्या झुळुक चाटुन गेली. आणि वरच्या खोलीची ती खिडकी सताड उघडली. तशी माझी नजर वरच्या खोलीकडं जाणाऱ्या जिन्याकडं गेली. "शिऱ्या..!..ऽ.ऽ" शिऱ्या त्या जिन्याकडेला झोपला होता. आम्ही त्याला उठवुन पोप्या आणि स्वप्न्या गच्चीत नसल्याचं सांगितलं. तसा तो अडखळत उभा राहिला. "वर बघुया", वरच्या उघड्या खोलीकडं बघत शिऱ्या पुटपुटला. बॅटरी हातात घेऊन आम्ही वरच्या खोलीकडं पोचलो.
"उम्म..म.उ..ह"..मला कोणीतरी विव्हळतंय, असा भास झाला. आम्ही वरच्या खोलीत पोचलो. पोप्या त्या खोलीतल्या एका जुनाट पेटीवर पहुडला होता. शुद्धीवर नसावाच असा धुळीनं माखलेल्या त्याचा चेहरा विद्रुप दिसत होता. उठवल्यावर पोप्या पोप्या नाहीच आहे असा काहीसा भासला. मी त्याच्या तोंडावर बॅटरीचा झोत टाकला. प्रचंड लाल झालेले डोळे आणि लाथा-बुक्क्यांनी बदडुन काढलेल्या एखाद्या चोरासारखी झालेली पोप्याची हालाखीची अवस्था बघवत नव्हती. एका गुढ आश्चर्यातच आम्ही पोप्याला घेऊन खाली आलो. जिन्यावरुन माझी नजर थेट त्या गाठोड्याकडं गेली. रक्ताचे जुने डाग असलेलं ते गाठोडं शिऱ्यानं उघडलं. गाठोड्यात एखाद्या गडीमाणसाच्या १०-१२ वर्षाच्या पोराचे धुळीनं माखलेले कपडे आणि एक लाकडाचा तुकडा..कदाचित हॉकी स्टिकचा! बस्स एवढंच. ते गाठोडं तिथंच सोडुन आम्ही स्वप्नीलला शोधु लागलो...
"स्वप्नील...ए स्वप्न्या.ऽ..." आम्ही स्वप्नीलला गच्चीच्या चारी बाजुंना हुडकु लागलो.
"अऽ..ए..ब..बोक्या..."
"अरे, हा तर स्वप्नीलचा आवाज!" शिऱ्या वाड्याच्या आतल्या बाजुला बॅटरीचा झोत टाकत म्हणाला. सगळे जण आत मध्ये धावलो. शिऱ्या जरा सावकाश आला..त्याचं लंगडणं पाहुन माझं लक्ष त्याच्या गुडघ्याकडं गेलं. त्याच्या गुडघ्याला माझा मफ़लर बांधला होता.
बॅटरीच्या प्रकाशात एका पिंपाला टेकुन झोपलेला स्वप्नील अजुनही झोपेतच होता. पोप्यानं त्याच्या चेहऱ्यावर सोडा फ़वारला. तसा तो जरा फ़्रेश झाल्यासारखा वाटला.
स्वप्नीलला घेऊन आम्ही सगळे तो जिना उतरु लागलो. जिन्याच्या एका मोडक्या पायरीवर बॅटरी माझ्या हातातून सटकली. आणि..आणि तोच तो मला परिचित आणि इतरांना कदाचित अपरिचित असा विव्हळणारा आवाज आला - " उम्म.्हह..उह..आई गं.ऽ" हयावेळी तो आवाज अगदी मोठा, कदाचित त्या मागच्या विहीरीवरुन आला असावा", असं वाटलं. "पोप्या भाग..ऽ" शिऱ्या ओरडला. तसा पोप्या सगळी ताकद एकटवून पळाला. त्या मागोमाग स्वप्न्या..मी, दिप्या, परग्या आणि शिऱ्या. त्या वारुळावरुन उडी मारुन कधी गाडीपाशी पोचलो....ते मागं वळुन बघितल्यावर कळलं.
"खटर..र्ऱ..खट..र्र.." गाडी चालु झाली. शिऱ्यानं जोरात रिव्हर्स घेतला..यु टर्न घेऊन गाडी वळवली आणि माझ्या काचेसमोर तो वाडा आला. पहाटेच्या प्रकाशात वाड्याच्या वरच्या खोलीची खिडकी स्पष्ट दिसली. खिडकीतून १०-१२ वर्षांचा एक मुलगा मळक्या फ़ाटक्या कपड्यात आमच्याकडं बघुन डोळे चोळु लागला...आणि तोच तो परिचित विव्हळण्याचा आर्त आवाज ऐकु आला - "उम्म.्हह..उह..आई गं.ऽ वाचवा.ऽ.ऽ"