आझाद हिंद सेना ८ - पूर्वेकडे प्रस्थान

नेताजींच्या आपल्या सेनेविषयी, आपल्या भावी स्वतंत्र राष्ट्राविषयी काही दृढ कल्पना होत्या. त्यांना स्वातंत्र्यप्राप्तीसाठी प्रसंगी असंगाशी संग करायचा कठोर निर्णय घ्यावा लागला तरीही त्यांनी आपली तत्त्वे सोडली नाहीत. आम्हाला तुमची मदत हवी आहे, आधिपत्य नको असे म्हणूनच ते हिटलरसारख्या सत्तांध हुकूमशहाला देखिल ठणकावून सांगू शकले. पुढे जपानच्या बरोबर उघडलेल्या संयुक्त मोहिमेतसुद्धा त्यांचा हा करारी बाणा आणि ताठ पवित्रा ठाम होता. आणि म्हणूनच त्यांनी अक्ष राष्ट्रांकडे आपल्या हंगामी सरकारला मदत करण्याची मागणी केली होती. आपल्या सैन्याला कुणी शत्रूच्या हातातील बाहुले बनलेली देशद्रोह्यांची फौज म्हणू नये यासाठीच त्यांनी आपले अस्तित्व वेगळे ठेवायची मुत्सद्देगिरी व ती तडीस नेण्याची हिंमत दाखवली. स्वतंत्र कचेरी, सेनेचा स्वतंत्र ध्वज, स्वतंत्र देशाचे राष्ट्रगीत, स्वतंत्र मानचिन्हे, इतकेच काय तर टपाल तिकिटे देखिल तयार करून घेतली. कर्ज म्हणून जर्मन चलनाच्या स्वरूपात अर्थसाहाय्य स्वीकारायचे व ते भारतीय चलनात परावर्तित करायचे आणि हिंदुस्थानातील कामगिरीसाठी वापरायचे अशी त्यांची योजना होती. हे कर्ज अर्थातच स्वातंत्र्य मिळाल्यावर परतफेडीच्या करारावर मागितले होते, मदत वा अनुदान म्हणून नव्हे. हिंदुस्थानी चलनानुसार दहा रुपयांच्या चलनी नोटा जर्मनीत छापून इकडे हिंदुस्थानात आणायचा प्रस्ताव त्यांनी मांडला होता. A H Insignia

म्हणजेच महाभयंकर अशा राष्ट्रांच्या दरबारात जाऊन त्यांनी त्या ताकदींना आव्हान दिले होते की जर तुमचा आणि आमचा समाईक शत्रू असलेल्या इंग्रजी सत्तेचा पाडाव करायची गरज आपल्या दोघांनाही आहे, तेव्हा आज तुम्ही आम्हाला मदत कराल तर ते तुमच्याच हिताचे आहे. तेव्हा आपल्या हिताखातर तुम्ही हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य संग्रामाला हिंदुस्थान आपल्या बरोबरीचा समजून एक स्वायत्त देश म्हणून मदत करा, त्यात तुमचाही फायदा आहे, ती आमच्या देशावर मेहेरबानी नाही. आणि जेव्हा त्या तेजस्वी वीराने ताठ मानेने आपल्या शर्तींवर मदत मागितली म्हणूनच अक्ष राष्ट्रे साहाय्य करण्यास तयार झाली. जर नेताजी मांडलिकत्वाची भाषा करत, हीन-दीन होऊन लाचारीने मदत मागायला गेले असते तर एक तर त्या दोन हुकूमशहांनी त्यांना तुरुंगात डांबले असते वा साफ धुडकावून लावले असते. मात्र जो मदत मागायला येतो व तरीही आपल्यालाच शर्ती घालतो, त्यात पाणी असले पाहिजे हे ओळखून त्या राष्ट्रप्रमुखांनी त्यांना एका राष्ट्रप्रमुखाचा मान व राजशिष्टाचार देऊ केला, स्वतंत्र कचेरी दिली, स्वतंत्र नभोवाणी केंद्र उघडून दिले, अर्थसाहाय्य दिले, लष्करी मदत दिली. A H Stamps

१९४३ मध्ये राइश मुद्रणालयात नेताजींच्या आझाद हिंद साठी टपाल तिकिटे छापण्यात आली. या तिकिटांमधून नेताजींच्या आपल्या भावी स्वतंत्र देशाविषयीच्या कल्पना स्पष्ट दिसून येत होत्या. चरखा चालविणारी स्त्री, रुग्णाची सुश्रुशा करणारी परिचारिका, नांगर चालवणारा शेतकरी, हातात आधुनिक शस्त्र घेऊन देशाच्या रक्षणासाठी सज्ज असलेला जवान व अखंड हिंदुस्थानचा नकाशा, त्याला नंग्या तरवारींची महिरप अशी ही तिकिटे प्रत्यक्ष प्रत्यक्षात वितरणात आली नसली तरी टपाल तिकिट संग्राहकांच्या दुनियेत ती दुर्मिळ म्हणून आवर्जून जपलेली आहेत.

शिवरायांचा राज्याभिषेक आणि नेताजींचा स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता मिळवण्याचा प्रयत्न यात कमालीचे साम्य नीट पाहता दिसून येते. राजांना राज्य, छत्र-चामर, सिंहासन या कशाचीच आसक्ती नव्हती पण तरीही त्यांनी राज्याभिषेक करवून घेतला कारण एकदा हिंदवी स्वराज्याला सिंहासन प्राप्त झाले, राजधानी आली आणि राजा आला की स्वातंत्र्य संग्रामाला स्वराज्यस्थापनेला कुणी पुंडावा म्हणणार नाही, रयतेला आपले राज्य आल्याचे जाणवेल आणि परकीयांना घरचे शत्रू निर्माण करणे जड जाईल. नेमका हाच उद्देश नेताजींचा होता. एकदा का स्वतंत्र हिंदुस्थानचे सरकार स्थापन झाले; भले ते हंगामी असेल, प्रतिकात्मक असेल, पण ते स्थापन झाले, जगातल्या चार देशांनी का होईना पण त्याला मान्यता दिली की मग कुणी आझाद हिंद सेनेला देशद्रोही वा फितुरांची फौज म्हणू शकणार नाही, जनतेत पसरलेले गैरसमज दूर होतील आणि आझाद हिंद सेनेची खरी ओळख हिंदुस्थानी जनतेला पटेल, त्यांतून प्रेरित होऊन आझाद हिंद सेनेत अनेक हिंदुस्थानी सामील होतील व आता या देशाला आपल्या बंधनात ठेवणे आपल्याला सोपे नाही हे ब्रिटिशांना समजुन चुकेल. याच बरोबर जरी तुमच्या साहाय्याने लढत असलो तरी आम्ही स्वतंत्र देशाचे शिपाई असून आम्ही आमच्या ध्वजाखाली लढू, तुमच्या आधिपत्याखाली नाही हे मदतगार राष्ट्रांनाही समजून चुकेल व मग जे तरीही मदत करतील ते खरे असे समजत येईल. या सरकार स्थापने मुळे जेव्हा आझाद हिंद फौजा हिंदुस्थानच्या सीमेवर जेव्हा अक्ष राष्ट्रसैन्याच्या मदतीने हल्ला करेल तेव्हा इंग्रजांना 'परचक्र' आले अशी हाकाटी करण्याचा मार्ग बंद झाला होता. आणि म्हणूनच जर्मनी तसेच पूर्वेत हंगामी सरकार स्थापन करण्याच्या नेताजींच्या दूरदृष्टीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

नेताजी आपली जर्मनीत स्थापन झालेली तुकडी केवळ हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठीच लढेल, ती जर्मनीच्या दावणीला बांधली जाणार नाहीत याविषयी सातत्याने जागरूक होते. जेव्हा इराकवरील हल्ल्याची योजना बारगळली तेव्हा इराकवरील आक्रमणाचा नायक एअर फोर्स जनरल फेल्मी व त्याचे सैन्य 'सॉंडर्स्टॅब एफ' सुन्यन येथे म्हणजे अट्टिका च्या अंतिम दक्षिण टोकाला होते. हे सैन्य इराकमधून ग्रीस मध्ये हालविण्याची व त्याचा रोख कॉकेशस वर हल्ला करण्याची योजना आखली गेली. तडकाफडकीने आझाद हिंदच्या तुकडीला त्यांच्या बरोबर जाण्याचे फर्मान दिले गेले. मात्र नेताजींनी थेट वरपर्यंत याचा विरोध नोंदवून व पाठपुरावा करून हा हुकूम मागे घेण्यास जर्मन सेनानींना भाग पाडले. पुढे जर्मन सैनिकीतज्ज्ञांनीच असे नमूद केले आहे की हे नेताजींचे पाऊल अत्यंत महत्त्वाचे होते कारण नापेक्षा ही हिंदुस्थानी तुकडी हिंदुस्थानी सीमा गाठायच्या आतच कॉकेशसच्या घनघोर संग्रामात बळी गेली असती. खरेतर नेताजी पूर्वनियोजित 'ऑपरेशन टायगर'ची उत्सुकतेने वाट पाहत होते. ऑपरेशन टायगर म्हणजे आधीपासूनच अफगाणीस्थानात कार्यरत असलेले जर्मन / इटालियन हस्तकांच्या मदतीने स्थानिक उठावाचा प्रयत्न करायचा, स्थानिक बंडखोरांच्या मदतीने अफगाण सत्ता ताब्यात घ्यायची व तिथून ब्रिटनविरुद्ध नवी आघाडी उघडायची असा बेत होता. या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न व नियोजनही सुरू होते. नेताजींच्या दृष्टीने हे सर्वात महत्त्वाचे होते कारण ते या मार्गाने थेट हिंदुस्थानच्या सीमेला गवसणी घालणार होते. सैनिकी हल्ल्याबरोबरच जबरदस्त प्रचारयंत्रणा वापरून हिंदुस्थानातील जनतेत जागृती निर्माण करायची ज्यायोगे साऱ्या हिंदुस्थानला सत्य समजेल व हिंदुस्थानी जनता धैर्य एकवटून आतून उठाव करेल व दुहेरी पात्यात इंग्रजांना लढणे दुरापास्त होईल व आपले ईप्सित साध्य होईल असे नेताजींना वाटत होते. आणि म्हणूनच नेताजी परराष्ट्रमंत्री रिबेनट्रॉप व फ्युरर च्या भेटीचा तगादा परराष्ट्र मंत्रालयाच्या मागे सतत लावीत होते. प्रत्यक्षात रिबेनट्रॉप व नेताजी भेट २९ नोव्हेंबर १९४१ रोजी साकारली. आपल्या राष्ट्राला हिटलरने तातडीने मान्यता द्यावी व त्या चर्चेसाठी आपली व हिटलरची गाठभेट तातडीने आयोजित केली जावी असा आग्रह नेताजींनी धरला. आपण इथे स्वाथ्यासाठी वा हवापालटासाठी आलो नसुन आपले ध्येय जर इथे साध्य होते नसेल तर आपण इथून निघून जाऊ असे नेताजींनी ठणकावून सांगितले.

अखेर नेताजी जर्मनीत दाखल होऊन तब्बल वर्ष उलटून गेल्यानंतर म्हणजे २७ मे १९४२ रोजी हिटलर व नेताजी यांची ऐतिहासिक भेट झाली. hitlerया भेटीत नेताजींनी आपल्या सरकारला अधिकृत सरकार म्हणून पाठिंबा देण्याची घोषणा करण्याची मागणी केली व त्याचबरोबर हिटलर च्या माईन काम्फ मधील हिंदुस्थानी नेते व आंदोलनाविषयी काढलेले अनुद्गार दुरुस्त करण्याविषयी सुचवले. हे उद्गार बरोबर तर नाहीतच शिवाय याचा फायदा घेऊन इंग्रज सरकार हे जर्मनी भारताचा शत्रू असल्याचा अपप्रचार करीत असल्याचे सांगितले. घोषणेबाबत हिटलरने अनुकूलतेसाठी थांबणे इष्ट असल्याचे सांगितले. भारतीय आंदोलन व नेत्यांविषयीच्या उद्गारा बद्दल नेताजींना हिटलरने असा खुलासा केला की त्याला केवळ असे म्हणायचे होते की सामर्थ्य व शस्त्र यांच्या सहित सुनियोजित संग्रामाखेरीज आंदोलन व्यर्थ आहे' तसेच जर्मनीतील तरुणांना असल्या आंदोलनांचा तिरस्कार निर्माण होऊन त्यांनी हाती शस्त्र घेण्यास सज्ज व्हावे हाही हेतू होता असे सांगितले. मात्र एव्हाना परिस्थिती बदलली होती. जर्मनीने रशियावर आक्रमण केले होते, तसेच आफ्रिकेत रोमेलची परिस्थिती बिकट झाली होती व त्यामुळेच यापुढील हालचाली नेताजींना पूर्वेतून कराव्यात असे सुचविले. एकतर अनेक कारणास्तव ऑपरेशन टायगर बारगळले होते, दुसरीकडे रशियन आघाडीवरील सेनेचे भवितव्य अद्याप अधांतरी असल्याने या क्षणी हिटलर नेताजींना सक्रिय मदत करू इच्छित नव्हता व शकतही नव्हता. हिटलरने असे सुचविले की जर्मनी, व हिटलर जातीने नेताजींना पूर्वेत सुखरूप नेऊन पोचविण्याची व्यवस्था करेल. हवाई मार्गाने जाणे अती-धोक्याचे असल्याने नेताजींनी मार्ग खडतर व वेळखाऊ असला तरी पाणबुडीने प्रवास करून पूर्वेत जावे असे सांगण्यात आले. A H East West

दरम्यान नेताजींनी जपानशी संधान बांधले होते. जपानचा जर्मनीतील राजदूत कर्नल सातोशी यामामोटो याने पूर्वीच म्हणजे जानेवारी १९४२ मध्येच नेताजींना आपल्या वकिलातीत आमंत्रीत केले होते व इंग्रजांचा पहारा चुकवून आल्याबद्दल अभिनंदन करीत बर्लिनमध्ये त्यांचे स्वागत केले होते. इकडे पूर्वेतील परिस्थितीही झपाट्याने बदलत होती. ७ डिसेंबर १९४१ ला जपानने पर्ल हार्बरवर जबरदस्त हल्ला चढवून दोस्त राष्ट्रांना खुले आव्हान दिले होते. तातडीने हालचाली करीत जपानी सैन्याने ११ फेब्रुवारी १९४२ रोजी सिंगापूर काबीज केले होते व ४५ हजार सैन्य इंग्रजांनी जपानच्या स्वाधीन केले होते. पैकी १५ हजार हिंदी सैनिकांनी राशबिहारी, प्रितमसिंह व मोहनसिंह यांच्या प्रतिसादाला उत्तर म्हणून आझाद हिंद सेनेत प्रवेश केला होता. आता पूर्वेला प्रतीक्षा होती ती नेताजींच्या आगमनाची. अखेर ८ फेब्रुवारी १९४३ रोजी नेताजी आपला विश्वासू सहकारी अबिद हसन याच्यासह कील बंदरातून खोल समुद्रात उभ्या असलेल्या यू १८० पाणबुडीकडे छोट्या यांत्रिक बोटीतून निघाले.