आझाद हिंद सेना ११ - 'प्रभु आले मंदिरी'

n and aदिनांक २० एप्रिल १९४३, पनांग बंदरातुन एक पाणबुडी गपचुप आपला तळ सोडुन आफ्रिकेच्या रोखाने निघाली. २६ एप्रिलला ती आपल्या संकेतस्थळी वेळे अगोदर दहा तास पोचली व दबा धरुन राहीली. रात्रीच्या काळोखात तीला दुसऱ्या एका पाणबुडीची चाहुल लागली. दोन्ही पाणबुड्या सावधतेने एकमेकीचा अंदाज घेत राहील्या. अखेर रात्र ओळख पटण्यात गेली. सकाळी समुद्र खवळलेला होता, लाटा प्रचंड उसळत होत्या. दोन्ही पाणबुड्या समुद्र जरा शांत होण्याची वाट पाहत एकमेकीला समांतर सरकत होत्या. समुद्र दुपारनंतर जरा शांत झाला पण पाण्बुड्या एकमेकीच्या अगदी जवळ आणणे त्या परिस्थितीत शक्य नव्हते. अखेर जपानी पाणबुडीतुन दोरखंडाने बांधलेली रबरी होडी जर्मन पाणबुडीच्या दिशेने सोडली गेली. असलेला धोका पत्करून दोन व्यक्ती आपले सामान घेउन जीवावर उदार होत, लाटांचा मारा खात त्या होडीत बसल्या. नेताजी व अबिद हसन! जपानी पाणबुडीवर कमांडर इझ्यु यांनी ओल्याचिंब नेताजींचे हार्दिक स्वागत केले. निरोप देउन जर्मन पाणबुडी परतली व जपानी पाणबुडी पूर्वेकडे निघाली. मात्र ती पनांगला न येता सबान येथे गेली व अखेर तीन महिन्य़ांच्या पाण्याखालील वास्तव्यानंतर नेतजींचे पाय प्रथमच जमिनीला लागले. p agmn

नेताजी जर्मनीतुन निघाले ही बातमी अद्याप गुप्त होती, जपानमध्येही नेताजी आपली खरी ओळख प्रकट न करता 'मॅस्युदा' या नावाने उतरले.jpn

प्रारंभिक नौदल तळावरील मुक्कामानंतर नेताजींनी ११ मे रोजी सबाना सोडले व ते १६ मे रोजी टोकियोमध्ये दाखल झाले. आता सर्वात महत्त्वाचे जर काही असेल तर राशबिहारींची भेट! अखेर टोकियोच्या नेताजी राहात असलेल्या इंपिरियल हॉटेलमध्ये ही ऐतिहासिक भेट झाली. दोन तळमळीचे देशभक्त एकमेकांना भेटले. दि. १२ व १३ जून ला झालेल्या ऐतिहासिक भेटीत रासहबिहारी व नेताजी यांची प्रदिर्घ चर्चा झाली. बहुधा राशबाबूंनी आतापर्यंतचे प्रयत्न, संघटन, विघटन, पुनर्गठन, उभे असलेले पेचप्रसंग या बद्दल या सर्वा घटनांची ईत्यंभूत माहिती नेताजींना दिली असावी. याच भेटीत राशबाबूंनी आपले वय व प्रकृती (आणि त्यांनी सांगितले नाही तरी मोहनसिंगांनी गैरसमजाने का असेना पण केलेले जपानी हस्तक असल्याचे आरोप) यामुळे आता आपली सर्व सूत्रे नेताजींच्या हाती देउन आपण स्वत: फक्त सल्लागार म्हणून काम पाहण्याची इच्छाही बोलुन दाखविली असावी. गुरूसमान असलेल्या या महान क्रांतिकारकाचा प्रत्येक शब्द नेताजींना शिरसावंद्य होता. आपल्या वंदनिय क्रांतिकारकाला वंदन करून नेतजींनी आझाद हिंद सेना व आझाद हिंद संघटना यांची जबाबदारी स्विकारली. भेटीहून परतताना राशबाबूंनी जपानी अधिकाऱ्यांना असे सांगितले की आता त्यांना खूप मोकळे झाल्यासारखे वाटत आहे, आता नेताजीच भारतीय स्वातंत्र्ययुद्धास निर्णायक रूप देतील व हा संग्राम आपल्या सक्षम, कणखर व कुशल नेतृत्त्वाने पूर्णत्त्वास नेतील. त्यांनी नेताजींना नेताजींची इच्छा असेपर्यंत जपानमध्ये राहण्यास परवानगी देण्याचा आग्रह सरकारला केला व अर्थातच जपानने त्यांना शाही पाहुणे मानले. मित्सुरु टोयमा हे राशबिहारींचे गुरु, उद्धारकर्ते व मार्गदर्शक ब्लॅक ड्रॅगन या क्रांइतिकारकांच्या संघटनेचे प्रमुख होते व आता ते वयोवृद्ध झालेले असले तरी सरकारवर त्यांची चांगलीच छाप होती.

Toyama_Mitsuru_honors_Rash_Behari_Bose[1]राशबाबूंचे आशीर्वाद आणि त्यांचे अमूल्य व तळमळीचे मार्गदर्शन यामुळे नेताजींना हुरूप आला, आपण हिंदिस्थानी स्वातंत्र्यसंग्राम अंतिम ध्येयाप्रत नेउ असा त्यांचा दुर्दम्य आत्मविश्वास द्विगुणीत झाला. या भेटीपाठेपाठ नेताजींना आता महत्त्वाच्या व उच्चपदस्थ जपानी लष्करी भेटी घेणे अत्यावश्यक होते. ते हिंदुस्थानवर स्वारी करून पूर्वसीमेवर हल्ला चढविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे होते.मग त्या पाठोपाठ सत्ताधिश टोजोमहाशयांची भेट. अधिकाऱ्यांच्या गाठीभेटी झाल्या खऱ्या पण टोजो महाशयांची भेट काही सहजपणे होइना. या विषयी इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. काहींच्या मते टोजो भेट टाळत होते - कारण बॅंकॉक ठरावाची कलमे, जपानच्या काही अधिकाऱ्यांचा अलिप्तपणा व स्वारीसाठी अनुकूलता नसणे तसेच मोहनसिंग प्रकरण वगैरे. मात्र काही इतिहासकारांच्या मते नेतजी स्वत:च भेट तातडीने घेण्याच्या मागे नव्हते कारण त्यांना प्रत्यक्ष जपानमध्ये काही काळ राहुन, जनमनाचा कानोसा घेउन, अधिकारी, आपले क्रांतिकारक व संघटना यांच्या मताचा व परिस्थितीचा अभ्यास करयचा होता. अखेर दि. १० जून १९४३ रोजी टोजो - नेताजी भेट झाली. n and t या पहिल्याच भेटीत टोजोमहाशयांवर विलक्षण छाप पाडत नेताजींनी त्यांना पूर्ण जिंकून घेतले. या भेटीने विलक्षण प्रभावीत झालेल्या टोजोंनी नेताजींना जपानतर्फे सर्वतोपरी सहाय्याचे वचन दिले. टोजोंनी स्वत: नेताजींना पुन्हा एकदा म्हणजे १४ जून रोजी भेटीचे निमंत्रण दिले. या भेटीच्या वेळी परराष्ट्रमंत्री सिग्येमिट्सु आणि इतर प्रमुख लष्करी व सरकारी अधिकारी उपस्थित होते. या भेटीत पुढील कार्यक्रमाची रुपरेषा परस्पर संमतीनुसार ठरविली गेली.

दिनांक १६ जून रोजी सुरू होणाऱ्या जपानी डाएट्साठी नेताजींना सन्माननिय उपस्थित म्हणून आमंत्रित केले गेले. या प्रसंगी केलेल्या ऐतिहासिक भाषणात टोजोंनी आशियाच्या उत्कर्षाचा परामर्श घेताना त्यासाठी भारताचे स्वातंत्र्य किती महत्त्वाचे आहे हे सांगितले. याच भाषणात ते असे म्हणाले की 'हिंदुस्थान स्वतंत्र होण्याची वेळ आता दूर नाही. एकदा स्वतंत्र झाला की हिंदुस्थान स्वत:चा विकास निश्चितच स्वत: करून घेईल. मात्र त्यासाठी विशाल पूर्व आशियातील रणसंग्राम अटळ आहे आणि या संग्रामात जपान सर्व शक्तिनिशी उभा राहील'. आता सावट दूर होऊ लागले होते. जपानने आपली या युद्धातली बांधिलकी प्रकट केली होती. टोजोंच्या डाएट मधील जपानच्या मदतीविषयक पुनरुच्चाराने आधी निर्माण झालेली गुंतागुंत आता सुटत चालली होती. नेताजींना त्यांचे ध्येय आता दृष्टीपथात आलेले दिसले असावे. डाएट पाठोपाठ १९ जून रोजी खास नेताजींसाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. आपल्या हिंदुस्थानचा स्वातंत्र्यसंग्राम - त्याचे स्वरूप, कारण व सत्य परिस्थिती हे जगापुढे मांडायची जणु ही सुवर्णसंधी होती. या पत्रकार परिषेदेसाठी जपानी व परदेशी मिळुन साठ पत्रकार उपस्थित होते. या परिषदेनंतर साऱ्या जगात जाहिर झाले की नेताजी आता टोकियो मध्ये आले आहेत व ते भारतिय स्वातंत्र्य संघट्नेची धुरा सांभाळणार आहेत तसेच 'शस्त्राघाता शस्त्रच उत्तर' या उक्तिनुसार ते पूर्व आशियातुन भारतातील इंग्रजी सत्तेविरुद्ध युद्ध पुकारणार आहेत. अनेक वृत्तपत्रांनी त्यांचे गुणवर्णन केले होते व साऱ्या हिंदुस्थानी जनतेला आशेचा किरण वाटणारा लोकप्रिय व तडफदार असा वज्रनिश्चयी नेता असे त्यांचे वर्णन केले होते.

आता जपानच्या वर्तमनपत्रांमध्ये नेताजींना अग्रस्थान लाभले होते. दि. २० तसेच २१ रोजीसुद्धा नेताजींनी अनेक पत्रकार व वृत्तसंस्थांच्या भेटी घेतल्या व मुलाखती दिल्या. पाठोपाठ नभोवाणीवरून भाषणेही सुरू होती. त्यांची ही भाषणे अत्यंत परिणामकारक होती व यापूर्वी त्यांनी बर्लिन नभोवाणीवरून केलेल्या भाषणांपेक्षा ती अधिक आवेशपूर्ण व अधिक परिणामकारक होती. या सर्व भाषणांमधून त्यांनी असे आवाहन केले होते की आता प्रत्यक्ष लढायची वेळ आलेली आहे; आम्ही बाहेरून लढू व त्याचवेळी भारतीयांनी आतून लढावे. २२ जूनच्या लंडन टाईम्समध्ये असे वृत्त प्रसिद्ध झाले की ' सुभाषचंद्र हे जपानमध्ये पोहोचले असून अक्षराष्ट्रांमधील वृत्तपत्रे त्यांना मोठे यश प्राप्त होइल असे भाकित वर्तवित आहेत. टोकियोमधील त्यांची चळवळ ही आता त्यांची वैयक्तिक चळवळ नसून आता त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे केंद्र बर्लिनमधून टोकियो येथे स्थानांतरीत केले आहे असे म्हणावे लागेल. आतापर्यंत जर्मनी व इटाली हे भौगोलिक व अन्य कारणामुळे हिंदुस्थानी स्वातंत्र्यलढ्यास सहाय्य करण्यास असमर्थ ठरले असून यापुढे बोस आपला लढा व त्याचा प्रचार जपानच्या मदतीने सुरू ठेवतील.' दुसऱ्या एका वर्तमानपत्राने असे म्हटले होते की 'बोस टोकियोत आल्याचे वृत्ताने ब्रह्मदेशस्थ भारतीयांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला आहे.' दिनांक २१ जून रोजी नेताजींना डॉ. बा. मॉव यांची तार आली. तीत असे लिहिले होते की "आपण जर्मनीतून पूर्वेस आल्याबद्दल आपले अभिनंदन! आपण टोकियो येथुन जे निवेदन प्रसिद्ध केले आहेत त्यामुळे येथील भारतीयांच्या मनात आशा व धैर्य निर्माण झाले आहे.भारतीय आणि ब्रह्मदेशी जनता या दिवसाची फार आतुरतेने वाट पाहत होती, आता आम्हीही सिद्ध होण्याची वेळ येऊन ठेपली आहे. स्वातंत्र्या करीता आण राष्ट्रिय सन्माना करीता ब्रह्मदेश आपल्या बाजूने व आपल्या बरोबरीने लढण्याची प्रतिज्ञा या क्षणी करीत आहे." एकुण नेताजींच्या पूर्वेतील आगमनाने संपूर्ण पूर्व आशिया खंडात नवचैतन्य निर्माण झाले होते व संपूर्ण जनतेने त्यांना आपला व आपल्या स्वातंत्र्य संग्रामाचा भाग्यविधाता म्हणुन मनोमन स्विकारले होते. आपले ४३ दिवसांचे जपानमधील वास्तव्य संपवून नेताजी राशबाबूंसमवेत दि. २७ जून १९४३ रोजी शोनान (सिंगापूर)येथे जाण्यास निघाले. s agman

जाताना त्यांनी २८ तारखेस जपान नभोवाणीवरून प्रक्षेपित करण्यासाठी एक भाषण लिहुन ठेवले होते ज्यांत त्यांनी असे म्हटले होते की ते शालेय विद्यार्थी असताना त्यांनी जपानच्या रशियावरील विजयाविषयी वाचले होते व तेव्हापासून त्यांना जपानविषयी आदर निर्माण झाला होता. आज जपान सरकार व जपानी जनतेने मी कुणीही राजकिय नेता वा राजकिय पद भुषविणारी व्यक्ती नसतानाही मला अत्यंत आदराने व सन्मानाने वागविले आहे, मी राजाही नाही वा दरबारी मानकरीही नाही, मी तर जपानला वंद्य असलेल्या बुद्धाच्या देशातला एक सामान्य नागरीक आहे. आमचे महाशत्रू असलेल्या ब्रिटन विरुद्ध जपानने युद्ध पुकारून ब्रिटनचे अपरिमित नुकसान केले आहे. ही जणु भारत हा केवळ भारतीयांचाच आहे हे आमचे ध्येय सिद्ध करण्याची परमेश्वराने दिलेली संधीच आहे असे मी मानतो. ही सुवर्णसंधी जर आता आम्ही वाया दवडली तर ती पुन्हा कधी मिळेल वा मिळणारही नाही हे सांगणे कठीण आहे आणि म्हणुनच आम्ही या संधीचा फायदा घेत शत्रूविरुद्ध लढणार आहोत आणि विजय मिळविणार आहोत. रशिया व चीन या देशांविषयी नेताजी असे बोलले की 'रशिया हा देश साम्यवादी असूनही ब्रिटिशांविरूद्ध लढण्याऐवजी त्यांच्या बाजुने लढत असल्याने तो आमच्या मनातुन उतरला आहे. चीनचा नेता मार्शल चॅंग कै शेक हा देखिल ब्रिटिशांच्या हातचे बाहुले बनला आहे आणि आमचा आदर गमावुन बसला आहे.

s swagat२७ जूनला जपान सोडलेले नेताजी व राशबाबू टप्प्या टप्प्याने विमान प्रवास करीत अखेर २ जुलै १९४३ रोजी सिंगापूरात दाखल झाले. विमानतळावर सर्वप्रथम त्यांना आझाद हिंद सेनेच्या सैनिकांनी मानवंदना दिली. प्रचंड संख्येने उत्सुक जनसमुदाय त्यांचा जयजयकार करीत होता. ४ जुलै रोजी कॅथे चित्रपटगृह निमंत्रीतांनी खच्च्चुन भरले होते व जागा न मिळालेले लोक रस्त्यावर दुतर्फा उभे होते. त्यांना सतत पडणाऱ्या पावसाची तमा नवती. त्यांच्या हातात तिरंगे होते. नेताजी व राशबाबू मोटारीतुन उतरताच लक्षावधी लोक टाळ्यांच्या गजरात त्यांचा जयजयकार करीत होते. लोकांचे अभिवादन स्विकारीत ते दोघे व्यासपीठावर स्थानापन्न झाले. स्वागत गीतानंतर पंतप्रधान टोजो यांचा संदेश वाचुन दाखविण्यात आला. राशाबाबू मग बोलायला उभे राहिले. ते म्हणाले की त्यांनी सिंगापूरच्या जनतेला असे वचन दिले होते की ते सहा आठवड्यात परर्त येतील, व त्याप्रमाणे ते आले आहेत. जर कुणी विचारेल की त्यांनी आपल्या ध्येयाप्रत जाण्यासाणी काय केले आहे? तर ते उत्तर देतिल की (नेताजींकडे बोटा दाखवित) त्यांनी ही अमोल भेट आणली आहे. राशबाबू भावनाविवश होत उद्गारले की आजचा दिवस हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुखाचा दिवस आहे; आज ते भारतीय स्वतंत्र्य संघटनेच्या अध्यक्षपदाचे त्यागपत्र देत असून यापुढे अध्यक्ष तसेच आझाद हिंदचे सेनाप्रमुख हे नेताजी असतील. यापुढे स्वतंत्र्य संग्राम हा नेताजींच्या नेतृत्त्वाखाली लढला जाईल व नेताजी यशस्वी होऊन देशाला स्वातंत्र्य मिलवुन देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आता पर्यंत सुभाष, बोस, चंद्राबोस या नावाने परिचित असलेल्या नेताजींना राशबाबूंनी सिंगापूरात नेताजी ही पदवी दिली व ती सर्वतोमुखी झाली. जो जनमानसाच्या पसंतीचा, जो संग्रामाचा नेता, जो धडाडीचा सेनापती, जो सर्वांना आदरणीय तो महान लोकनायक म्हणजेच 'नेताजी'. भाषणाचा समारोप करताना राशबाबूंनी 'इन्किलाब झिंदाबाद, आझाद हिंद झिंदाबाद' असा जयघोष केला व त्याला लोकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. उत्तरादाखल नेताजींनी सर्वप्रथम राशबाबूंचे आभार मानले, नवी जबाबदारी स्विकारल्यचे घोषीत केले व राशबाबू हे यापुढे आझाद हिंदचे प्रमुख सल्लागार असल्याची घोषणा केली. मग नेताजींनी सद्यपरिस्थितीचा आढावा घेतला आणि आपण लवकरच हिंदुस्थानचे हंगामी सरकार स्थापन करणार असल्याचे घोषीत केले.हिंदुस्थानची कोट्यावधी जनता आणि पूर्वेकडील लक्षावधी जनता तसेच आझाद हिंद सेना ज्यांची डोळ्यात प्राण आणून वाट पाहत होती ते स्वातंत्र्यय्द्धाचे महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस सिंगापूरात येउन थडकले होते. आता आझाद हिंद व पूर्वेतील भारतीय जनतेला नवा हुरूप आला. जणु हिंदुस्थानची पूर्व सीमा त्यांना दिसु लागली होती.