गुरुजींनी टेबलावर ५ टोप्या ठेवल्या होत्या. दोन निळ्या आणि तीन लाल.
मग गुरुजींनी ३ मुलांना पुढे बोलावले. विजय, विलास आणि विनय. त्या तिघांना एका रांगेत एकामागे एक उभे रहायला सांगितले. विजय सर्वात मागे, त्याच्याकडे पाठ करून विलास, आणि विलासकडे पाठ करून विनय. विजयला विनय आणि विलास दिसत होते, विलासला विनय दिसत होता, आणि विनयला कोणीच दिसत नव्हते. मग गुरुजींनी तिघांना डोळे मिटायला सांगितले आणि प्रत्येकाच्या डोक्यावर एक टोपी ठेवली. उरलेल्या दोन टोप्या गुरुजींनी लपवून ठेवल्या. गुरुजींना तिघांना डोळे उघडायला सांगितले. मग गुरुजींनी विचारले: "विजय, तुला ओळखता येईल का तुझ्या डोक्यावर कोणती टोपी आहे?". विजय म्हणाला, "नाही". मग गुरुजींनी विलासला विचारले, "विलास तुला ओळखता येइल का तुझ्या डोक्यावर कोणती टोपी आहे ते?". विलासही "नाही" म्हणाला. पण त्याबरोबर गुरुजींनी विचारायच्या आधीच विनयने त्याच्या डोक्यावर कोणत्या रंगाची टोपी आहे ते बरोबर सांगितले. हे कसे?
तुम्हाला ओळखता येईल का विनयच्या डोक्यावर कोणत्या रंगाची टोपी होती ते?