........................................
सांजवेळ ...
...........................................
सांज येई; न येई परी एकटी...
सावटांनाच घेऊन येई सवे !
दाटती कोणत्या खिन्न या सावल्या ?
कोणते दुःख आता पुन्हा हे नवे ?
सांजवेळीच अंधारती का दिवे ?
मालवे सांजवेळीच मनही कसे ?
कालवे सांजवेळीच प्राणात का ?
आठवांनी कुणाच्या कुणाच्या असे ?
सांज काळोखकाळी जणू भूल ही...
सांज तिथल्या तिथे गूढ चकवा जणू...
सांज सरकेचना ही जराही पुढे...
आसमंतात साऱ्याच थकवा जणू...!!
सांजवेळी कुणाशी न बोले कुणी...
भोवतालास केले कुणी या मुके ?
ओळखू येत नाही कुणाला कुणी...
सांजवेळीच डोळ्यांत दाटे धुके !
सांजवेळीच हुरहूर दाटे उरी...
सांजवेळीच काहूर हृदयी उठे...
जीव कोंदाटतो सांजवेळीच का ?
दाट अंधार बाहेर ! जावे कुठे ??
सांजवेळीच जो तो इथे एकटा !
सांजवेळी कुणाचेच नाही कुणी!
सांज जाईल केव्हा असे वाटते...
सांज काही क्षणांची जरी पाहुणी !
- प्रदीप कुलकर्णी
...........................................
रचनाकाल ः २१ जुलै २००५
...........................................