रुपये-पैसे

दुसऱ्या महायुद्धाच्या आधीची गोष्ट.

आपले सगळे पैसे बँकेमध्ये ठेवायची प्रभाकरपंतांना खोड होती. मालतीबाई त्याबद्दल करवादत, पण ते त्यावर "पैसे कधी व किती लागतील ते आधी कळलेच पाहिजे. आणि गरजेप्रमाणेच पैसे काढले पाहिजेत. घरात डबोले बांधून ठेवण्यापेक्षा त्या पैशांवर व्याज मिळवून मुद्दल वाढवले तर ते अंतिमतः आपल्या आणि आपल्या मुलांच्याच हिताचे आहे. शिस्त बाळगली की सगळे जमते" असे सडेतोड उत्तर देत.

प्रत्येक वेळेला पैसे काढताना प्रभाकरपंत अगदी हिशेब करून जितके लागताहेत तितकेच काढीत, आणि काढल्यावर तीनतीनदा मोजून पाहत हे सांगणे नलगे.

पण एकदा, पैसे देण्याऱ्या रोखपालाची हिशेबात काहीतरी चूक झाली. प्रभाकरपंतही कुठल्यातरी तंद्रीत होते, ते पैसे घेऊन न मोजताच चालू पडले. कोपऱ्यावरच्या परटाला वीस पैसे दिल्यावर त्यांना अचानक पैसे मोजून पहायची लहर आली. बघतात तो काय? ते जितकी रक्कम काढायला गेले होते, त्याच्या बरोबर दुप्पट रक्कम त्यांच्याकडे होती!

प्रभाकरपंत किती रक्कम काढायला गेले होते?

बँकेत जाताना प्रभाकरपंतांकडे काहीही रक्कम नव्हती.

बँकेखेरीज प्रभाकरपंतांना कुठूनही एकही पैसा मिळाला नाही.

त्याकाळी बँकेतून पाहिजे तितके रुपये आणि पैसे काढता येत असत (दहाच्या पटीतच नव्हे!)