ह्या त्या दोघांच्या कथा आहेत. दोघांची कौटुंबिक पार्श्वभुमी मध्यमवर्गीय. तो एका छोट्या शहरातला तर ती मेट्रोसिटी बनू पाहणाऱ्या मोठ्या शहरातली.
--
तो शिकायला मेट्रोसिटी बनू पाहणाऱ्या मोठ्या शहरात आला. निळ्या डोळ्यांच्या मुलीशी त्याची ओळख लॅबमध्ये प्रॅक्टिकलच्या वेळेस झाली. बघता बघता चार वर्षे कशी संपली आणि दोघं एकमेकांत कशी गुंतली हे त्या दोघांनापण समजलं नाही. कॉलेजच्या शेवटच्या दिवशी इतक्या दिवसांचा बांध फुटला आणि प्रेमाचं प्रकटीकरण झालं, आणाभाका घेतल्या गेल्या. यथावकाश दोघही चांगल्या कंपन्यांमध्ये लठ्ठ पगारावर रुजू झाली. अनुभव, परदेशवारी हे टप्पे पण ओलांडले. कामानंतरच्या राहिलेल्या वेळेपैकी निम्म्यापेक्षा जास्त वेळ एकमेकाशी फोनवर, नेहमी भेटण्याच्या ठिकाणी गप्पा मारण्यातच जात होता. अशात एके दिवशी निळ्या डोळ्यांच्या मुलीचा त्याला एस. एम. एस. आला. "आपल्याला आज महत्त्वाचं बोलायचंय. सकाळी आई-बाबांनी लग्नाचा विषय काढला. आई वधूवर सूचक मध्ये नाव नोंदवून आली आहे. "
--
तिचं शिक्षण मुलींच्या शाळेत आणि मुलींच्याच कॉलेजमध्ये झाल्यामुळे मुलांशी फारसा संबंध आला नाही. नोकरीला लागली तेव्हा प्रोजेक्टच्या कामाच्या निमित्ताने त्या उंच धिप्पाड मुलाशी तिची ओळख झाली. तशी ऒफिसमध्ये बरीच मुलं होती पण तो तिला खूपच आवडला आणि मदतीच्या नावाखाली तोसुद्धा तिच्या डेस्कवर खूपवेळा रेंगाळायला लागला. अगदी मॅनेजरनेपण संकेत ओळखून दोघांना एकाच प्रोजेक्टवर टाकण्याचा शहाणपणा दाखवला. एकदा अशाच एका बिझी प्रोजेक्ट डिलिव्हरीनंतर ऒफिसमध्ये पिझ्झा खाताखाताच उंच धिप्पाड मुलानं एकांताची वेळ साधून तिला तू मला खूप आवडतेस असं सांगून टाकलं. तिने नापसंती दर्शवण्याचा प्रश्न नव्हताच. ऒफिसमधेपण सगळ्यांना कळलं आणि तिला नाइलाजाने कंपनी बदलावी लागली. पण दोघ ऒफिसबाहेर पूर्वीप्रमाणेच भेटत राहिली. एके दिवशी त्या उंच धिप्पाड मुलानं तिला सांगितलं, "माझ्या आईनं तुला या विकेण्डला घरी बोलावलंय. "
--
त्याने निळ्या डोळ्यांच्या मुलीला घरी आपल्या प्रेमाबद्दल सांगण्यास सुचवलं. त्याने स्वत: एका सणानिमित्त घरी चक्कर टाकली तेव्हा घरच्यांच्या कानावर हि गोष्ट घातली. सणासुदीचं वातावरण क्षणात पालटलं. निळ्या डोळ्यांच्या मुलीच्या घरीसुद्धा असाच काहीसा प्रतिसाद मिळाल्याचा एस. एम. एस. त्याला आला. त्याला हे जरा अनपेक्षितच होतं. त्याच्या मित्राच्या प्रेमविवाहाच्या वेळी मित्राला मानसिक आधार देणारे आपले बाबा एवढ्यात कसे काय बदलले हे त्याला काही कळेना. त्याने याबाबतीत बाबांना विचारले तेव्हा ते म्हणाले, "तुझ्या मित्राची गोष्ट वेगळी आहे. आपण आपल्या रीतिरिवाजानुसारच वागायचं. "
"आंतरजातीय विवाहामुळे नंतर खूप प्रॉब्लेम्स होतात. तुम्हाला मुलं होतील त्यांची लग्नं तुम्ही कशी करणार? त्या अमक्या शेजाऱ्यांच्या मुलीच लग्न फक्त त्या कारणामुळे कितीतरी वर्षं अडलेलं आपण बघतोच आहोत ना. " - इति त्याची आई.
निळ्या डोळ्यांच्या मुलीच्या घरी असाच संवाद घडून आला होता. "तुला त्यांच्या छोट्या शहराच्या वेगळ्या वातावरणात ऍडजस्ट करायला जमेल का? ". "त्यांची आणि आपली फॅमिली बॅकग्राउंड खूपच वेगळी आहे. " इत्यादी इत्यादी.
आता त्याच्या डोक्यात मोठा खड्डा पडला होता. त्याला वाटायचं पुढारलेल्या विचारांच्या आपल्या आईबाबांकडून प्रेमविवाहाला संमती नक्कीच मिळेल. शिवाय जग किती पुढं गेलं आहे. आपण एकविसाव्या शतकात आहोत वगैरे वगैरे.
--
तिलाही आपल्या घरी त्या उंच, धिप्पाड मुलाबद्दल सांगणं भाग होतं. त्याच्या घरच्यांची संमती होतीच. पण त्याचं नाव गाव कळल्यावर तिच्या घरचं वातावरणही तंग झालं. प्रेमविवाहाला तिच्या आईबाबांचा विरोध नव्हता. फक्त मुलाचं परप्रांतीय असणं खटकत होतं. आणि नुसतंच खटकत नव्हत तर ते पार अमान्य होत. विषय ताणत गेला तसा तिच्या बाबांनी अबोलाच धरला. आई तिला परावृत्त करायचा आटोकाट प्रयत्न करायला लागली. तिचं म्हणणं, "त्या दादाचं (तिच्या चुलतं-भावाचं) लग्न असंच परप्रांतीय मुलीशी झालं आहे. "
"मुलांचं वेगळं असतं, त्यांना चालत पण मुलींना नाही चालतं" - तिच्या आईचा तिला न झेपलेला युक्तिवाद.
"अग पण आपल्या समाजातल्या कितीतरी मुलींची अशी लग्न झाली आहेत" - तिचा वेगळा प्रयत्न.
"पण त्यातल्या निम्म्या नंतर घटस्फोट होऊन परत येतात, हे विसरू नकोस. " - या उत्तरावर तिची बोलती बंद.
--
त्याच्या खास मित्रांमध्ये एक परिसंवादच घडून आला. बाजूचे आणि विरुद्ध असे दोन तट आपोआपच पडले.
"तुम्ही एकमेकाला इतक्या दिवसांपासून ओळखताय, तेव्हा तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. "
"येतात, प्रॉब्लेम्स येतात. अरे मोठ्या शहरातल्या मुलींना आपल्यासारख्यांच्या घरी ऍडजस्ट करायला खूप प्रॉब्लेम्स येतात. माझ्या भावाच्या उदाहरणावरून सांगतो. "
"अरे पण लग्नानंतर सासरी ऍडजस्ट करायचा प्रॉब्लेम युनिव्हर्सली सगळ्याच मुलींना येतो. "
"तसं नसतं ते. त्यांच्या आणि आपल्या घरच्या संस्कृतीत आणि संस्कारांत खूपच फरक असतो. तो ओलांडणं खूप अवघड असतं मुलींसाठी. शिवाय मुलीच्या घरची आणि वातावरणाची सधनता व सुबत्ता आपल्यापेक्षा जेवढी जास्त तेवढा मोठा हा प्रॉब्लेम. "
"आता सगळ्या मध्यमवर्गियांच्या सुबत्तेत थोडाफार फरक असणारच. आपण सगळे मध्यमवर्गीय असणं पुरेसं नाही का? आणि तडजोड तर कुठेही करावी लागतेच. "
"आता नोकरीच्या ठिकाणी, जिथं आपण आपलं जवळपास एक तृतियांश आयुष्य घालवतो, तिथही कंपन्या बदलू तसं आपण आपल्या वरिष्ठांबरोबर ऍडजस्ट करायला शिकतोच की!"
"ऒफिस आणि लग्नाचं खूप वेगवेगळं असतं. अशी तुलना करताच येणार नाही. "
"अरे या मोठ्या शहरातल्या मुलींना आपली शहरं म्हणजे खेडीच वाटत असतात. माझी वहिनीपण आमच्या घरी आईबाबांकडे यायचं नावं काढलं की कटकट सुरू करते. "
"कोणतीही मुलगी लग्नानंतर वेगळी राहत असली की आपल्या सासरी जायचं म्हणजे कटकट करतेच. आता तुझी आईच तुझ्या बाबांच्या खेडेगावी आतापर्यंत किती वेळा जाऊन आली सांग ना. "
--
असाच परिसंवाद तिच्या मैत्रिणींच्यातपण झाला.
"पण नक्की कशासाठी विरोध करताहेत तुझे आईबाबा. त्यांना मुलीपेक्षा त्यांची प्रतिष्ठा जास्त मोठी वाटते का? "
"तसं ते काहीच म्हणत नाही. तुला जमणार नाही आणि आम्हाला आवडणार नाही एव्हढंच एकदोनदा म्हणाले. आजकाल विषय काढला की एकदम गप्पच बसतात आणि मग दोन दिवस आम्ही तिघ धर्मशाळेत राहत असल्यासारखे घरात वावरतो. मला ते फार असह्य होत. "
"तू आईबाबांना सांगून घरातून बाहेर का पडत नाहीस? "
"म्हणजे पळून जा असंच ना. पळून जाणं हा काही ऒप्शन नाहीये. शेवटी आपल्यावर पण काही संस्कार झाले आहेतच की. "
"तुला काय वाटलं 'दिलवाले दुल्हनिया' सारखं तुझे बाबा एक दिवस तुला त्याच्याबरोबर जा म्हणून सांगतील? थोडं डिप्लोमॅटीकली वागायला काय हरकत आहे. "
"पळून गेल्यावर चार महिने गप्प बसतील. नंतर आपोआपच सगळं सुरळीत होईल. "
"आमच्या घरातल्यांचं काही सांगता येत नाही. माझ्या एका आत्यानं आजोबांच्या मनाविरुद्ध लग्न केलं म्हणून ते आयुष्यभर तिच्याशी बोललेच नाहीत. "
"त्यांचं आणि आपलं कल्चर खूप वेगळं असत. "
"पण आपल्यासारख्या खूपश्या मुली शिकायला परदेशात गेल्यानंतर तिकडच्या मुलाशी लग्न करतातच ना. "
"ते वेगळं असतं. त्यांना तिकडचं सेटल व्हायचं असतं. इथं राहायचं म्हटल्यावर प्रॉब्लेम येतोच. "
"आपल्या संस्कृतीत आणि पाश्चात्य संस्कृतीत खूप फरक आहे. आपल्याकडे सगळ्यांचे सणवार, रीतिरिवाज खूप वेगवेगळे असतात. एक पद्धत सोडून दुसरी आत्मसात करायची म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त संसाराचा काळ त्यांतच जाणार. "
"आजकाल शहरात कोणी पाळतं का एवढे रीतिरिवाज, असतो का कुणाला वेळ सणवार साजरे करायला? "
"असं काही म्हणू नकोस. त्या टीव्ही सिरीयल्समुळं आता तर त्या गोष्टींना खूप उधाण आलंय. स्टेटस सिंबॉल झाल्यात त्या गोष्टी. आणि भरीस भर म्हणून सगळी सामग्री रेडीमेड पुरवणारं मार्केट असतंच. "
"शिवाय सध्या ’परप्रांतीय’ या मुद्द्यावरून सध्या सगळीकडे उडालेला गदारोळ तुला माहिती आहेच. "
--
त्याचा त्याच्या बाबांबरोबरचा हा कलगीतुरा.
"कॉलेजचे दिवस वेगळे असतात, मी समजू शकतो. पण लग्न हे पूर्णपणे वेगळे असते. त्यात बऱ्याच गोष्टी तपासून बघाव्या लागतात. "
"ताईच्या लग्नाच्या वेळी तर तुम्हीच येईल त्या पाहुण्यांना म्हणायचे ’मुलाला मुलगी आणि मुलीला मुलगा आवडणं महत्त्वाचं. ’"
"तसं म्हणायच्या आधी बाकी सर्व बाबींची चौकशी झालेली असायची. स्थळं सुचवणारी माणसं आणि मंडळं विश्वासातली होती. आपल्याकडे लग्न हे दोन कुटुंबाचं मिलन असत त्यात त्या कुटुंबांचे आचार विचार जुळणं हे महत्त्वाचं असतं. "
"पण आम्ही निर्णय घ्यायच्याआधी ह्या सगळ्याचा विचार केला नसेल असं वाटतं का तुम्हाला? "
"तुम्हाला या जगाचा काही अनुभव नाही. चार पैसे मिळायला लागले की तुम्हाला वाटतं तुम्ही फार शहाणे झालात. "
"पंचविशी उलटली आमची आता. अजूनही आम्हाला काहीच कळत नाही अस वाटतं का तुम्हाला. "
"कळत असतं तर असा अविचार केलाच नसता तुम्ही. आम्हाला एका शब्दानं तरी विचारलं का असा विचार करण्याआधी? "
"म्हणजे तुमचा विरोध नक्की कोणत्या कारणामुळं? त्यांच्याशी आपलं जुळणार नाही म्हणून की तुम्हाला आधी विचारलं नाही म्हणून? "
शेवटचं वाक्य त्याच्या मनातच राहिलं. कारण उलट न बोलण्याचे सुसंस्कार!
--
सलग पाचवा मुलगा काहीही कारण न देता तिनं नाकारल्यानंतर तिची आई वैतागली.
"आम्हाला कळत नाही का तू मुलं का नाकारतीयेस? "
"मग तुम्ही का सपोर्ट करत नाही आमच्या लग्नाला? "
"तुला वाटतं तेव्हढं सोपं नसतं ते मुली. तू अशी आपल्या घरच्या स्वतंत्र वातावरणात वाढली आहेस. तुला अजिबात जमणार नाही त्या तसल्या वातावरणात जुळवून घ्यायला. "
"न जमायला काय झालं. त्याच्या घरचेसुद्धा खूप मॉडर्न विचारांचे आहेत. त्याच्या घरच्यांना मान्य आहे. "
"त्यांना मान्य नसायला काय झालं. त्यांचा सगळा गोतावळा सोडून ते येथे येऊन राहिलेत. आपले सगळे पै-पाहुणे इथेच आहेत. त्यांच्यात तोंड दाखवायला जागा राहिलं का आपल्याला. शिवाय तू इतकी नातेवाईकांच्यात रमणारी, तुला जमणार आहे का त्यांच्यासारखं एकलकोंडं राहायला? "
--
तो नेहमीच्या ठिकाणी निळ्या डोळ्यांच्या मुलीला भेटायला आला होता.
"आपलं काही वर्क आऊट होईल असं वाटत नाही. कारण मला नक्की सांगता येणार नाही. आणि कधी सांगता येईल असं वाटत नाही. "
"फाईन. मी निघते मग. बेस्ट ऒफ लक. " - तिनं तिच्या उच्चशिक्षित, स्मार्ट पर्सनॅलिटीला साजेसं उत्तर देऊन विषय संपवला. त्याच्यासमोर अश्रुबिश्रू ढाळत बसण्याचा सवालचं नव्हता.
"सेम टू यू. टेक केअर. " - एवढंच तो इंग्रजीचा आधार घेत औपचारीकपणे म्हणू शकला.
--
तिचा ब्रेक अप जरा कठिण होता.
"मग काय ठरवलं आहेस तू" - त्या उंच धिप्पाड मुलानं बऱ्याच वेळ वाट बघून सुरुवात केली.
"मला नाही माहीत. "
"म्हणजे... वुई आर बॅक तू स्क्वेअर वन!! आपल्या आतापर्यंतच्या नात्याला काहीच अर्थ नाही का? "
"असं कसं. ते माझ्या आयुष्यातले सगळ्यात चांगले दिवस होते. "
"मग पुढे काय? आपण लग्न करायचंय की नाही? "
"मला खरंच नाही माहिती. आईबाबांच्या परवानगीशिवाय मी काहीच करू शकत नाही. "
"म्हणजे काय? "
"तुला माझ्यापेक्षा चांगली मुलगी मिळेल. तू माझी वाट नको बघू. "
"म्हणजे तुला माझ्याशी लग्न करायचं नाही असं तू स्पष्ट का म्हणत नाहीसं. "
"... "
"अशा शांत बसण्याचा अर्थ मी काय घ्यायचा? "
"आता आपण यापुढे एकमेकांना भेटायचं बंद करू. "
"हा तुझा पक्का निर्णय आहे. "
"हो. "
"ठीक आहे. बाय देन. "
--
तो रूममध्ये कॉटवर पंख्याला डोळे टांगून आपण निळ्या डोळ्यांच्या मुलीला का नकार दिला याचा विचार करत पडला होता. आपण या निर्णयापर्यंत कशामुळे येऊन पोचलो ते काही केल्या त्याला सुधारत नव्हतं. आपण समाजाला घाबरलो की आईबाबांच्या दडपणाला बळी पडलो की मित्रांनी वर्तवलेल्या भविष्याला परिणामांना घाबरलो. नकार दिला एवढंच त्याला स्पष्टपणे आठवत होतं.
--
आपल्या त्या उंच धिप्पाड मुलाबरोबरच्या शेवटच्या बोलण्याची संगती लावायचा प्रयत्न करून करून तिचंही डोकं दुखायला लागलं होतं. त्याला परत कॉंटॅक्ट करावा की करू नये, आईबाबांशी या विषयावर परत बोलावं की बोलू नये, कशाचाच निर्णय तिला घेता येत नव्हता. तिला आपल्याला नक्की काय हवंय तेच कळत नव्हतं. त्यामुळं ती तो विषय सोडून दुसऱ्याच गोष्टीत मन रमवण्याचा प्रयत्न करत होती.