काळ मरण-बी पिकवत आहे
वेग न कळण्या इतपत आहे
बाळग निष्ठा, जीवन बोले
शिकायचा तो शिकवत आहे
अधेमधे भेटुन जातो पण
श्वास शायरी टिकवत आहे
तिचे नि माझे रहस्य होते
जे सध्या ती मिरवत आहे
अत्यवस्थ नात्यामध्ये त्या
सांग धुगधुगी कितपत आहे?
कर्ज काढुनी सबुरीकडुनी
अपमानांना फिटवत आहे
उत्साहावर शिंपड आळस
उगाच पडला खितपत आहे
तिने दिलेला शब्द पाळला
शब्द आजही फिरवत आहे
खर्च सुखांना करते कोणी
पगार कोणी मिळवत आहे - ( सन्माननीय सोनाली जोशी यांच्या शेरावरून प्रेरित )
रंगपंचमी आठवणींची
पात्र मनाचे भिजवत आहे