कळेना कोणत्या वैराण काळी मी कवी झालो !
कळेना पाप ऐसे काय केले? मी कवी झालो ... 
फुले - वारा - तरू - तारा समुद्री फेस तो खारा ,
दिसे दिवसा शशी, रात्रीस येतो सूर्य आधारा ,
फुटेना शब्द साधा एकही का? - मी कवी झालो !
प्रियेचे नाव मी काव्यात घेऊ पाहिले मागे ,
प्रियेने दोन ह्या तोंडात माझ्या ठेविल्या रागे ,
भुतागत एकटा शोधीत थारा , मी कवी झालो....
निजावे लागते घेऊन झोपेच्या सदा गोळ्या -
मला भलत्याच वेळी 'होत' गीते , काव्य , चारोळ्या! 
दिवाभीते मला पाहून पळती... मी कवी झालो !
अताशा येत नाही एकही काकू समाचारा ,
मला ना नोकरी , ना छोकरी चिंता घरादारा ,
पुरा वाळीत पडलो, गांजलो रे मी कवी झालो !
तशातच ऐकले मी - काढले फर्मान राजाने ,
" कवींना फोडुनी काढा रिकाम्या चिंचफोकाने "
बुडालो साफ मेलो, घात झाला, मी कवी झालो !!!
--अदिती
(२३ मार्च २००९,
फाल्गुन कृ. १२ शके १९३०)