वाटती दारे तिथे निघतात खिडक्या
जीवनाची मयसभा घेतेय फिरक्या
भेटली नाही तुला स्वप्नात सुद्धा!
काय तू स्वप्नातही घेतोस डुलक्या?
वळण माझे पाहिले तर सरळ होते
घेत होती वाट पण पायात गिरक्या
कातडी सोलून काढा पाहिजे तर
पण नका चघळू मला मारीत मिटक्या
न्याय मागायास का गेलास वेड्या?
कायदा देईल आता रोज धमक्या
सोडता उश्वास तू... उध्वस्त झालो
कोण सावरणार जर भिंतीच पडक्या?
अंगणी माझ्या कुणी रुजलेच नाही
जाउदे! त्यांच्या बिया असणार किडक्या
कोण वाजवणार आता टाळ चिपळ्या?
बडवितो जो तो इथे अपुल्याच टिमक्या
माणसे सारी वळूगत माजलेली
वाटतो त्यांच्यापुढे तर शांत ’डुरक्या’