सोडू नको

संपला रस्ता तरी चालायचे सोडू नको
पायवाटेने प्रसंगी जायचे सोडू नको

मी तुला नक्की कधी भेटेन हे सांगू कसे?
एवढे सांगेन की शोधायचे सोडू नको

कवडसे पडतील आपोआप माझ्या अंगणी
फक्त गच्चीवर सकाळी यायचे सोडू नको

काय झाले जर सभोती मोर दिसती शेकडो
तू तुला जमते तसे थिरकायचे सोडू नको

पाहिजे तर फेक गेलेल्या क्षणांची लक्तरे
पण नव्याने सूत तू जमवायचे सोडू नको

तू न माझा तू नभाचा; मान्य हे आहे मला
बरस थोडेसेच पण झिरपायचे सोडू नको

त. टी : ही गझल मराठीगझल. कॉम च्या इ-मुशायऱ्यात ऐकता येईल