आठवण म्हणुनी मिळाला एक छल्ला
आणि ’विसरावे’ असा जोडीस सल्ला
अर्थ ’नाही’चा अता ’नाही’च आहे
मारला आहेस तू भलताच पल्ला
माणसांना देव खपवावा जरासा
देवळामध्ये कसा निर्धास्त गल्ला
भेटला मद्यालयामध्ये मला यम
मी म्हणालो ’घे’... म्हणाला ’काय मल्ला! ’
शायरी हाडात लपते छानपैकी
मारते दुनिया मनावर फक्त डल्ला
मित्र परिवारासहित दिसतात हल्ली
काय त्या काळातला बेकार कल्ला......
काळजी केलीस तर माजेल जीवन
’बेफिकिर’ झालास की थांबेल हल्ला