शहाण्या आणि वेड्यांच्यातलं अंतर (लोकल गोष्टी-१९)

जर कधी तुमच्या समोर एखादी पिंजारल्या केसांची, कळकट चेहऱ्याची, मळकट कपडे घातलेली.. तिरसट म्हातारी आली तर तुम्ही काय विचार कराल..? आणि ही अशी म्हातारी जर तुम्हाला एखाद्या थेटरामध्ये किंवा उंची हॉटेलात किंवा फर्स्टक्लासच्या डब्यात तुमच्या समोर आली तर.. आणि जर तिच्या हातात टाईम्सचा अंक असेल.. तर..? त्या दिवशी त्या अवतारात तिला बघणाऱ्या डब्यातल्या प्रत्येकीनेच तिला जसं वेडसर ठरवलं होतं तसंच तुम्हीही नक्कीच तिला वेडं ठरवून मोकळे झाला असता. त्यांच्याच प्रमाणे तुम्हीही तिला डब्यातून घालवून द्यायचा प्रयत्न केला असता.. किंवा निदान तिच्यापासून चार हात लांब राहिला असतात.. तिच्या शेजारी बसायला तरी नक्की गेला नसतात. हो ना..?

त्या दिवशी डब्यात भरपूर गर्दी असूनही एका बाजूच्या दोन्ही सीटस रिकाम्या होत्या. ती एकटीच एकदम कोपऱ्यात खिडकीपाशी बसली होती. डब्यात नव्यानं चढणारी प्रत्येक बाई आधी रिकाम्या जागे कडे धाव घ्यायची.. मग इतक्या बायका उभ्या असल्याच बधून संशयानं दोन्ही सीटच्या खाली वाकून वाकून बघायची.. आणि मग तिथे काहीही नसूनही बाहेरच्या बाजूला येऊन उभी रहायची. असं एकदा दोनदा नाही तब्बल आठ-दहा वेळा झालं त्या म्हातारीला सगळ्यांनी वाळीत टाकलेलं तिच्या लक्षात येत गेलं आणि दुखावलेली म्हातारी खवळली.

त्यानंतर रीकाम्या जागेकडे धाव घेणाऱ्या मुलीला तिने उभं-आडवं फैलावर घेतलं.. एक एक शब्द एवढा स्पष्ट, एक एक वाक्य एवढं मुद्देशीर की तिला वेड ठरवणाऱ्यांनी शरमेने वाकून जावं. तिने तिच्याकडे असलेला फर्स्टक्लासचा पास ही काढून दाखवला.. तेव्हा तर तिच्यावर आरोप करण्यासारखं काहीच उरलं नाही.. तरी तिच ते गबाळेपण मात्र तिला गर्दीतून वेगळं करतच गेलं.

गर्दी वाढत गेली तशा तिच्या समोरची एक सीट रिकामी सोडून उरलेल्या दोन सीट भरल्या गेल्या.. त्या नंतर शेजारची एक जागा सोडून तिच्या बाजूच्या बाकड्यावरही काही जणी बसल्या.. त्या प्रत्येक वेळी मघाचची तिच्या उद्रेकाला बळी पडलेली मुलगी तिथे बसू नका म्हणून आपल्या डोक्याजवळ बोट फिरवून ती बाई वेडी असल्याचं प्रत्येकीला सुचवत होती.. पण उभं राहण्यासाठी जागाच न उरल्यानं किंवा मघाच्या त्या आजींच्या बोलण्या मुळे कोणी एकीने पुढाकार घेतल्यावर बाकीच्या बायका तिच्या पाठोपाठ तिथे स्थानापन्न होत गेल्या.

तरी शहाण्या आणि वेड्यांच्यातलं अंतर सांगणाऱ्या रिकाम्या जागा राहिल्याच.
.
.
=================================
स्वाती फडणीस........................................... १८-०२-२०१०