ह्यासोबत
- १. अध्यात्म : पूर्वभूमिका
- २. निराकाराला जाणण्यात एकमेव अडथळा : व्यक्तिमत्त्व
- ३. चमत्कार आणि रहस्य व ध्यान
- ४. वेळ, अंतर आणि काम
- ५. संसार / संन्यास / भक्तियोग / कर्मयोग
- ६. मन
- ७. पुन्हा एकदा : मन
- ८. भावनेचा गोंधळ आणि पैशाची मजा
- ९. निराकाराचे सर्व पैलू
- १०. काही आध्यात्मिक प्रश्नोत्तरे
- ११. आत्मस्पर्श
- १२. अस्तित्वाशी संवाद
- १३. स्त्री आणि पुरुष
- १४. न्यूनगंड
- १५. गेस्टाल्ट
- १६. (एक) साऱ्या कलहाचं एकमेव कारण : द्वैत
- १६. (दोन) साऱ्या कलहाचं एकमेव कारण : द्वैत
- १७. प्रेम
- १८. मित्र हो!
- १९. सजगता
- २०. हा क्षण
- २१. संगीत
- २२. काल, अवकाश आणि सर्वज्ञता!
- २३. सहल
- २४. या निशा सर्व भूतानां
- २५. (एक) कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन!
- २५. (दोन) कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन!
- २६. देव, दैव आणि श्रद्धा
- २७. स्वधर्म, साक्षात्कार आणि समाधी
- २८. पैसा
- २९. शरीर
- ३०. भोग
- ३१. (एक) स्मृती
मी आजपर्यंत हे दोन्ही लेख उघडले देखील नव्हते कारण माझ्या लेखांवर आलेल्या (आणि गीतेवर झालेल्या चर्चेच्या) प्रतिसादांवरून कुणाला कितपत आकलन होईल हे माझ्या लक्षात आलं आहे पण माझ्या लेखांवर चर्चा आणि माझं उत्तर नाही असं नको म्हणून हा लेख. एकूण सर्व प्रतिसाद वाचल्यावर माझ्या हे देखील लक्षात आलं की ज्यांनी वरील दोन्ही ठिकाणी प्रतिसाद दिलेले नाहीत त्यांनाही या लेखाचा उपयोग होऊ शकेल म्हणून हा लेख. आता दोन्ही लेख आणि सर्व प्रतिसाद मिळून एकच उत्तर देतो:
१)... "आपण कोण आहोत या प्रश्नाच सरळ साध सोप्प उत्तर : मेंदू नावाचा एकमेव अवयव विकसीत झालेली अन त्या योगे स्वतःच अस्तित्व ( सरळ साध्या एक्झिस्टन्स या अर्थाने ) टिकवण्याचा प्रयत्न करणारी प्राण्यांची प्रजाती! "
मेंदू आहे हे ज्याला कळतंय तो कोण आहे? माणसाची सर्वात मोठी हीच तर चूक होतेय, मेंदूला कळत नाही, मेंदू मार्फत तुम्हाला कळतंय.
डोळ्यांना दिसत नाही, डोळ्यांतून तुम्ही बघताय! नाहीतर डोळे नसणाऱ्याला दिसत नाही हे कसं कळलं असतं? हा कळणारा जो आहे तो इंद्रियांपेक्षा वेगळा आहे. तो बुद्धीच्याही पेक्षा वेगळा आहे कारण सारे आकलन मेंदूत आहे, आणि त्याला आपण सर्वजण मी म्हणतो, हा मी आपल्या सर्वांचा एक आहे, हे अध्यात्म आहे
२)... "असो तर येथेच, पहील्यांदाच मी स्पष्ट करतो की येथे फक्त ५ ज्ञानेंद्रीये यांना अनुभवता येणारे अनुभव प्रमाण मानले जातील! मन हे ज्ञानेद्रिय नाही , ( ज्याला आहे असे वाटते त्यने ते दाखवावे अथवा ऐकवावे अथवा त्याचा अस्तित्वाचा ( सरळ साध्या एक्झिस्टन्स या अर्थाने ) पुरावा द्यावा! ) मन म्हणजे दुसरे तिसरे काही नसून मेंदुच्या कोणत्या तरी कोपऱ्यात चालू असलेल्या रासायनिक प्रक्रियांची प्रतिक्रिया".
मन हे इंद्रिय नाही, अगदी बरोबर. विचार (म्हणजे मेंदूत सदैव चाललेला दृकश्राव्य चलतपट) , भावना आणि मनोदशा (म्हणजे औदासीन्य, अपराध, न्यूनत्व, आनंद वगैरे) ह्या सर्व प्रक्रियेला मन म्हणतात. तुम्ही मनाचं अस्तित्व नाकारू शकत नाही. कारण मुळात भाषा हा मनाचाच आविष्कार आहे, प्रकट झालेला विचार म्हणजे शब्द!
आता पुन्हा ही सर्व प्रक्रिया जरी मेंदूत घडते तरी ती ज्याला कळतेय तो कोण? त्याचा शोध म्हणजे अध्यात्म!
३)... " आता निराकार : या विषयी : इथे मी जास्त बोलणार नाही, फक्त, पंच ज्ञानेंद्रियांनी अनुभव सिद्ध केलेल्या विज्ञानाचे एक आव्हान देत आहे :
बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल
हा मी , ज्याला सगळं कळतंय, तो नक्की कुठे आहे ते दाखवता येत नाही याची दोन फार महत्त्वाची कारणं आहेत : एक: तो इतका सर्वत्र आहे की त्याला स्थानबद्ध कसं करणार, नक्की निर्देश कुठे करणार? दोन : तो इतका प्रकट आणि सर्व आकारांच्या आत बाहेर आहे की आणखी प्रकट काय होणार?
आता आपल्या प्रत्येकाला जे मी आहे असं वाटतंय ते त्याचंच असणं आहे. त्याला नाकारणं म्हणजे स्वतःलाच नाकारणं आहे. तुम्ही मी नाही असं म्हणूच शकत नाही हाच पुरावा आहे. मी आहे हाच अनुभव बाप आणि श्राद्ध एकाच वेळी आहेत. तुम्ही स्वतःलाच मला सिद्ध करून दाखव असं आव्हान देताय
४)... "मुक्ती : जिथे मुळात आत्मा परमात्मा यांचे अस्तित्व अनुभवाने सिद्ध करता येत नाही तिथे मुक्ती या शब्दाला अर्थच राहत नाही, फार फार तर मरण या शब्दाला काव्यात्मक समानार्थी शब्द म्हणता येईल. "
मी अस्तित्व हाच परमात्मा मानतो. इतके सुरेख ग्रह, तारे, सूर्य, चंद्र, नद्या, समुद्र, पक्षी, संगीत, हे सर्वव्यापी आकाश, हा आपला कधीही थांबू शकेल पण ज्याची आपल्याला दखल ही नाही तो अनाकलनीय श्वास, आणि कुणीही चालवत नसताना चाललेलं हे पराकोटीचं गूढ विश्व हा परमात्मा आहे. आता यात सिद्ध करण्या सारखं काय आहे? आत्मा म्हणजे तुम्ही आणि परमात्मा म्हणजे अस्तित्व, या दोन्हीत रेषेचंही अंतर नाही म्हणून अद्वैत! आणि हे न समजणं म्हणजे द्वैत आणि तेच साऱ्या कलहाचं कारण आहे.
मुक्ती याचा अर्थ व्यक्तित्वापासून मुक्तता. मी व्यक्ती आहे आणि अस्तित्वापासून वेगळा आहे या भ्रमाचं निरसन!
मुक्ती म्हणजे मरण नाही, मुक्ती म्हणजे शरीर विलीन होईल पण मी असीन हा बोध!
५)... " तुम्ही फक्त "आहात"
बस्स बाकी काही नाही.
आणि आता सगळ्याच गोष्टी सोप्प्या होतात. तुम्हाला फक्त हे " आहात " टिकवायचय
(म्हणजेच त्याच "होतो" होवू द्यायच नाहीये.! )
समोर आहे ते सगळ साकार, स्पष्ट, अनुभाव्य आहे!
कुठेही उगाच गहनता, अनाकलनीयता, " मनाने अनुभवायच " अस काही नाहीये"
मी आहे, मीच सर्वत्र आहे आणि काहीही झालं तरी मी असीन हा अनुभव ही अध्यात्माची फलश्रुती आहे .
एकदा मी म्हणजे मेंदूभोवती विकसित झालेला प्राणी, एकदा मी म्हणजे नुसता असणं आणि मग हे असणं टिकवणं अशा कोलांट्या उड्या अज्ञानामुळे होतात. कारण तुम्ही म्हणजे प्राणी असाल तर मृत्यू निश्चित आहे. तुम्ही म्हणजे नुसता असणं असाल तर तुम्हीच बाप दाखवला आहे. आता हे असणं कुठे आहे? ह्या असण्यालाच तर मी निराकार म्हणतोय. आणि हे असणं टिकवण्याची गरज नाही कारण त्याला मृत्यू नाही.
६)... "सरळ स्पष्ट " परफोर्म ओर पेरिश " " सर्व्हायव्हल ओफ फिट्टेस्ट " . स्वर्ग बिर्ग असल काही नाहीये त्यामुळे " हतो वा प्राप्यसी स्वर्गं "असल काही नाही, "जगलास तर ऐश करशील" येवढ खर! "
हां आता खरी गाडी रुळावर आली! ऐश करण्यासाठीच तर टिकायचंय आणि दुसऱ्यावर विजय मिळवायचा आहे पण मृत्युची भीती आहे हेच तर कलहाचं कारण आहे. पण खरी ऐश मी निराकार आहे या बोधात आहे कारण मग मृत्युचं भयच नाही.
७)... "सगळा गोंधळ या " अध्यात्मा"ने केलाय, ही एक संकल्पना मनातून काढून टाका, सगळी भीती मरून जाइल, बघा तुम्हाला पंख फुटल्याचा , फील येईल, मेंदू पुर्ण क्षमतेने काम करायला लागेल, मोठी स्वप्न दिसायला लागतिल, ती पुर्ण करण्याची इच्छा शक्ती बाहुंमध्ये येईल!!
( अध्यात्माचा स्विकार केल्यावर येते तशी स्मशान शांतता, अथवा कर्मदरिद्रीपणा येणार नाही ). "
अध्यात्माचा स्विकार म्हणजे मीच अमृत आहे हा अनुभव त्यानी भीती जाते, पंख फुटतात, मेंदू तल्लख होतो, कार्यक्षमता वृद्धींगत होते, स्वप्न बघण्याची गरज संपते, सगळं स्वप्नवत आणि सुंदर दिसायला लागतं.
मी व्यक्ती आहे, माझा मेंदूच सर्व काही आहे ही अस्तित्वाशी फारकतच जीवनाचे रणांगण बनवते आणि माणूस साऱ्या अस्तित्वाशी एकरुप असताना दिनवाणा आणि दरिद्री होतो.
८)... "असो. स्पष्ट आणि डोळस विज्ञान निष्ठा असणाऱ्या कोणत्याही प्राण्याला हे मत पटेल. बाकी बरच आहे बोलण्या सारख बरच आहे, पण त्या साठी आधी बेसीक्स कळाल पाहीजे !
लक्षात ठेवा अध्यात्म निराकार मुक्ती ब्लाहब्लाहब्लाह चे किती ही पत्त्याचे बंगले बांधले तरी " भस्मी भुतेच देहेच पुनरागमनं कुताः?! " हे सत्य नाकारता येत नाही. "
तुम्ही देह आहात आणि भस्म व्हाल असं वाटतंय हीच तर तुमची खरी व्यथा आहे.
माझं म्हणणं तुमच्यापेक्षाही सोपं आहे, आत्ता डोळे मिटा आणि शांतपणे अनुभवा की हे शरीर बसलयं ते कोणाला कळतयं? हा विदेह कोण आहे? तोच तर निराकार आहे!
अरे! दुसरा लेखही यातच कव्हर झालाय. अस्तित्व एक आहे म्हंटल्यावर युद्ध कशाला? तुम्हाला सत्याचा खरंच बोध व्हावा म्हणून तर मी लिहीतोय, अगदी पूर्वग्रह सोडून पहिल्यापासून वाचा, माझेही खूप चाहते आहेत.
असो, क्वांटम फिजीक्स किंवा जगातला कोणताही विषय तुम्ही घ्या मी उत्तर द्यायला तयार आहे.
बाय द वे, मंदारचा अप्रोच अगदी योग्य आहे. ज्याला तो सूक्ष्म म्हणतोय त्यालाच मी निराकार म्हणतोय आणि सगळे आकार हे मुळात निराकार आहेत कारण ते निराकारातूनच निर्माण होतायत आणि निराकारातच विलीन होतायत म्हणून तर अस्तित्व एक आहे आणि द्वैत हे कलहाचं आणि उद्वेग्नतेचं मूळ कारण आहे
संजय