स्पर्शुन तव अधरांनी - मम गीत अमर कर तू
होऊन सखी माझी - मम प्रीत अमर कर तू
न वयाची मर्यादा - ना जन्माचे बंधन१
जेव्हा कुणि प्रेम करी - पाहूदे केवळ मन१
पाळून२ नवी रीती - ती रीत अमर कर तू ।१।
स्पर्शुन तव अधरांनी - मम गीत अमर कर तू
जे जे मज प्रिय होते - ते जग हिसकुन घेई
हरलो मी दरवेळी - जो तो जिंकुन जाई
हारून हृदय अपुले - मम जीत अमर कर तू ।२।
स्पर्शुन तव अधरांनी - मम गीत अमर कर तू
जणु रिक्त गगन आहे - एकाकी मन माझे
पैंजणझंकारांनी - भर तू जीवन माझे
देऊनी श्वास तुझा - संगीत अमर कर तू ।३।
स्पर्शुन तव अधरांनी - मम गीत अमर कर तू
टीपा :
१. येथे बंधन् आणि मन् असे उच्चार करावे.
२. येथे 'पाडून नवी रीती ...' असेही म्हणता येईल. ... आवडेल तसे म्हणावे.
हे गाणे मला जसे ऐकू आले आणि उमजले आणि त्याचे शब्द जसे जालावर मिळाले (आणि ते उमजले ) त्याप्रमाणे मी भाषांतराचा प्रयत्न केलेला आहे.
चाल : मूळ गाण्याचीच! (गा गागागागा गा - गा गागागागा गा) (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल )
विनंती :
१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.
२. फक्त गाणे ओळखू नका. (किंवा नुसते अभिनंदन करूनका काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे
)
३. ध्रुवपदाचे भाषांतर सुचत असेल तर तेही सुचवा. यमक ... ईत लगागा असे जमवा बरका! यमकाची जागा ठळक केलेली आहे.