आमच्यातला राष्ट्रीय सद्गुणांचा अभाव -३

श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या 'सध्यःस्थितिप्रेरित दोन नाटके' या टिकालेखातून घेतलेला उतारा काही भागांत देण्याचा विचार आहे.


यानंतर हिंदुस्थानचा ज्या लोकांशी योग जुळून आला, ते सर्व जगात स्वातंत्र्य प्रिय म्हणून नावाजलेले होते. गुलामगिरीपासून जो पोचटपणा उत्पन्न होतो तो त्यांची अंगी नसून, उलट स्वातंत्र्याबरोबर वास्तव्य करणारा करारीपणा त्यांचे अंगी बाणला होता. हे लोक अन्यायाचे व जुलुमाचे पूर्ण द्वेष्टे होते; व त्यांच्या स्वातंत्र्य प्राप्तीस स्वराष्ट्र पुरेसे न वाटून तिने इतर देशांतही आपले ध्वज उभारिले होते. सुयंत्र राज्यव्यवस्था व लोकस्वातंत्र्य यांचे जितके योग्य मिश्रण शक्य असते, तितके यांच्या राज्यपद्धतीत असून त्या पद्धतीचे अनुकरण इतर राष्ट्रेही करू लागली होती. फ्रान्स व अमेरिका या देशांस प्रजासत्ताक राज्ये स्थापण्याचे कामी हेच लोक पर्यायाने गुरू झाले होते; व ग्रीस, रोम इत्यादी एकदा अत्युच्च शिखरास पोहोचून नंतर अवनतीच्या डोहात बुडालेली राष्ट्रे पुढे पुन्हा डोकी वर काढू लागणार होती, तीही याच लोकांचा कित्ता डोळ्यासमोर ठेवून. या लोकांनी पुढे ऑस्ट्रेलिया, कानडा वगैरे देशांस आपण होऊन स्वराज्य अर्पण केले. या लोकांचे करारीपणाचे तेज या प्रकारचे असल्यामुळे यांना हिंदुस्थानासारख्या तेजोहीन देशावर सहज विजय मिळवता आला.


आपल्या देशातील लोक इंग्रजांच्या मानाने असत्यनिष्ठ व बेकरारी आहेत, हे विधान वाचून पुष्कळांस राग येईल. अलीकडे, अनेक वक्त्यांचा व लेखकांचा आपल्या जुन्या ग्रंथातून आपल्या नीतिमत्तेबद्दलचे दाखले काढून, आपण हल्ली तितकेच नीतिमान आहोत, असे अप्रत्यक्षतः सिद्ध करण्याचा प्रघात पडला आहे. परंतु हा प्रकार सर्वथा आत्मघातकीपणाचा आहे, असे आम्हास स्पष्ट म्हटले पाहिजे. आपले पूर्वज एकदा अत्यंत नीतिमान व सत्यनिष्ठ असल्याबद्दल भारतादी ग्रंथ साक्ष देत आहेत, व त्याबद्दल मतभेद होण्याचा मुळीच संभव नाही. यास मुख्य प्रमाण हेच की, आपला देश एकदा फार भरभराटीस आला होता. परंतु तीच नीतिमत्ता व सत्यनिष्ठा त्यांच्या सांप्रत वंशजात आहे असे म्हणणे, म्हणजे गेल्या हजार वर्षांच्या गुलामगिरीचा व दारिद्र्याचा आपणावर काही परिणाम झाला नाही असे म्हणण्यासारखेच आहे. लॉर्ड कर्झनसारख्याने सबंध देशास असत्यनिष्ठ म्हटल्यास आपणास त्वेष येणे हे ठीक आहे. परंतु आत्मनिरीक्षणप्रसंगी आपणास खरा प्रकार लपविता कामा नये.


इंग्रज लोकांतील सत्यनिष्ठेस दिवसेदिवस ओहोटी लागत आहे, मोर्लेसाहेबांसारख्या सत्यनिष्ठ म्हणून मिरवणाऱ्या मुत्सुद्याच्या लपंडावावरून उघड होत आहे. परंतु असे असतानाही त्यांचा हल्लीचा करारीपणा आपले अंगी येण्यास आपणास आणखी काही वर्षे घालविली पाहिजेत. ज्याप्रमाणे फ्रेंच लोकांची रंगेलपणाबद्दल. इटालियन लोकांची दीर्घद्वेशाबद्दल, त्याचप्रमाणे इंग्रजांची युरोपियन राष्ट्रात सरळपणाबद्दल प्रसिद्धी आहे. एक इंग्रज नोकर कोणत्याही युरोपियन नोकरापेक्षा अधिक सचोटीने व कसोशीने काम करतो, ही गोष्ट अर्थशास्त्रविषयक ग्रंथात नमूद केलेली तज्ज्ञांस विदित आहेच; 'खोटा' ही शिवी एका इंग्रजाने दुसऱ्यास दिली असता त्याबद्दल खून पडलेले आपण प्रत्यही वाचतो; इंग्लंडातील न्यायसभांत फार थोड्या साक्षीदारांच्या जबान्यांवर मोठमोठ्या खटल्यांचे निकाल झालेले आपल्या ऐकण्यात येतात. या गोष्टीवरून इंग्रजांची सत्यनिष्ठेबद्दलची प्रसिद्धी विनाकारण नसावी, असे अनुमान निघते. आता हे खरे की, मनुष्याने काढलेल्या चित्रांवर विश्वास ठेवताना सिंहास जसा विचारच करावा लागतो, त्याप्रमाणे इंग्रजी किंवा अमेरिकन पुस्तकांतील माहितीचा आपणास बेतानेच उपयोग केला पाहिजे. तथापि, त्यावरूनही इंग्रज लोक कोणत्या सद्गुणांबद्दल विशेष आदर बाळगतात, एवढे स्पष्ट दिसून येते.


(क्रमशः)
(२० व्या शतकाच्या पूर्वाधाच्या सुमारास लिहिलेला हा लेख बौद्धिक संपदा अधिकाराच्या कचाट्यातून बाहेर आहे असे तो मानतो.)