तो माझा जाल मित्र आहे.(हा तो म्हणजे आपला विकीवाला तो नव्हे.. आपला तोही माझा मित्रच आहे पण प्रस्तुत प्रसंगाचा नायक तो नाही...). "दोन ओंडक्यांची होते सागरात भेट" या उक्तीप्रमाणे या जालसागरात तरंगत असताना एका लाटेवर आमची भेट झाली. जालावर तुमच्या मनातल्या खोल तळाशी दडलेलं सगळं दुःख सहजपणे बाहेर येऊ शकतं या न्यायाला अनुसरून आणि जालामुळे मिळणाऱ्या नामानिराळेपणाचा फायदा घेत आम्ही बरेचदा सुखदुःखाची देवाणघेवाण करत असतो. नियमितपणे बोलतोच असं नाही. एकाच ठिकाणी बोलतोच असंही नाही. जाल-मुशाफिरीचे आम्ही भक्त असल्यामुळे खऱ्या - खोट्या नावांनी, मुखवट्यांसहित किंवा विरहित निरनिराळ्या ठिकाणांवर आम्ही एकमेकांशी संवाद साधत असतो.
तर हा 'तो' सध्या भारतात नाही म्हणे. त्याचं पल्याड जाण्याचं कारण तसं सर्वसाधारणाच असावं. त्या तपशिलात तो कधी शिरला नाही.मीही विचारलं नाही. प्रत्यक्ष बोलताना किंवा चिठ्ठ्याचपाट्या लिहिताना समोरचा माणूस कुठे आहे किंवा खरा कोण आहे याने तसा काहीच फरक पडत नाही. माणसांच्या जगात त्याला वाटणारा एकटेपणा तो तुमच्याशी बोलून जरा कमी करत असतो एवढंच. आणि एखाद्याला सौजन्याचे दोन बोल देऊन तुमचंही काही जात नाही. मन मोकळं करायला एक खिडकी मिळते. कन्फेशन देताना ते ऐकणारा माणूस लाकडी पेटीत का बसत असावा हे निरोपकांवर बोलल्यावर लक्षात येतं. त्याला प्रत्यक्ष डोळ्याला डोळा देऊन बोलायचं नसल्यामुळे सगळं कधीकधी किती सुसह्य होऊन जातं....
तर, पल्याड कुठेतरी बसून मला त्याचं दुःख सांगत असतो..." मी ना आईच्या हातचा चहा मिस करतोय." किंवा" मी ना मराठी बोलणं - लिहिणं मिस करतोय" किंवा "आंबे आले असतील नाही का गं... मी आंबे मिस करतोय..." किंवा "आज एक इटुकलं बाळ पाहिलं शाळेत जाणारं.. ते कित्ती प्रेमानं एबीसीडी म्हणत होतं.. मी शुभंकरोति,पाढे, परवचा मिस करतोय." असं बरंच काही. एकदा म्हणाला "इथले भारतीय लोकही आपले नाही वाटत आहेत आज. मी आपला देश मिस करतोय...."
त्याचं हे मिस पुराण मी नेहेमी निमूटपणे ऐकून घेते कारण त्यावर काय बोलावं हे मला कळत नाही.(नाही म्हणायला कधीकधी तू एक्खाद्या 'मिस' ला कधी मिस करणार वगैरे कोट्या करायचा मोह अनावर होतो नाही असं नाही.... मग बऱ्याच हास्यमुद्रा वगैरे यांना पूर येतो) मग ही मिस यादी कशीही वाढते. आषाढी एकादशी, दिवाळी, फटाक्यांचा वास, चकल्या, तव्यावरची ताजी पोळी, चिमण्यांची चिवचिव, रेल्वेची शिट्टी , फोटोफास्ट चं दुकान, साबुदाण्याची खिचडी, शिवाजी पार्क, चतुर्थीचा उपास, कांदाभजी, तांदुळच्या पिठाची घावनं, वाटली डाळ, कैरीचं ताजं लोणचं, कागदी होड्या- बाण- विमानं- पतंग अशा वाट्टेल त्या सटरफटर गोष्टी त्याच्या मिस करून होतात. आणि मग "तुझी मजा आहे तुला हे सगळं फुकट(!) बिनबोभाट(!!) मनसोक्त(हे मात्र खरं ःड) उपभोगायला मिळतं अशी सांगताही होते.
स्वारी आईचा पदर सोडून नुकतीच दूरदेशी गेली आहे तरी येईल हळूहळू ठिकाणावर असं म्हणून मी हे सगळं ऐकत असते. त्यामानाने मी एकदम साधी भोळी... ऑफिसमधले ताण, इतरांना मिळणारी(मला डावलून) पदोन्नती आणि सगळ्यात साधी गोष्ट म्हणजे कोडिंगमधे मला रामदासांच्या बेडकीच्या दगडासारखा अडून बसलेला अणि न फुटणारा खडक यांनी मी बरेचदा रडकुंडीला येते. मग ती रडकी कुंडी एकदाची फोडून टाकली की माझा प्रश्नही सुटलेला असतो. पण या परिघातून बाहेर पडायला फारशी मुभा नमिळाल्यमुळे मी सहज मिळणाऱ्या साध्या साध्या गोष्टींकडे लक्ष देऊ शकत नाही. थोडक्यात संतुष्ट असलेल्या मला तो कूपमंडूक म्हणतो. मग मी त्याला नर्मदेतला गोटा म्हणते. शेलक्या विशेषणांचे आदानप्रदान झाल्यावर कुठेतरी हलकं वाटतं. आमच्या गप्पा बरेचदा याच विषयावर येऊन थांबतात.
परवा अचानक त्याने मला विचारलं..." ...तू काय मिस करतेयस?" नेहेमीप्रमाणे त्याचं भरपूर रडून झालं होतं. कधीही न विचारलेला हा प्रश्न ध्यानीमनी नसताना त्याने मला विचारला आणि मी नकळत बोलून गेले "मी ना... मी आयुष्य मिस करतेय."
आयुष्य या शब्दाला आमच्यात बरेच संदर्भ होते. काय चाललंय किंवा "हाऊ आर यू डूईंग" या लाडक्या प्रश्नासाठी "कसं चाललंय आयुष्य " हा प्रश्न आणि "आयुष्याला आयुष्य फक्त संदीपच(खऱ्यांचा!) म्हणू जाणे" हे ठरलेलं उत्तर ही जोडी अमर होती. उर्दूमधे ज्याला जिंदगी म्हणतात तो शब्द आयुष्यापेक्षा किती साधा आणि सुंदर आहे वगैरे चर्चाही झाली होती. "लाईफ सक्स"," छे या जगण्याला काही अर्थ नाही", "आपण वेठबिगारी कामगारच आहोत जती एसी मधे बसलो तरीही" इथपासून "ते तुम जियो हजारो साल साल के दिन हो पचास हजार" इथपर्यंत आयुष्यावर विविध प्रकारांनी टिप्पण्या करून झाल्या होत्या. त्या क्षणी या सगळ्या गोष्टी त्याच्या डोळ्यांसमोर तरळून गेल्या असणार. बोललेले न बोललेले सगळे संदर्भ त्याला लागले असणार. खात्री आहे मला तशी.
पण यापेक्षा निराळं असं काहीतरी तिथे उभं ठाकलं होतं. क्षणभरच.. जास्त नाही... पुढच्या क्षणी तो क्षण भूतकाळात गेला होता. पण तो एक क्षण पूर्ण क्षण ठरला होता.
माझ्या एकाच वाक्यात मी आजपर्यंत त्याने मला ऐकवलेलं सगळं त्याला परत केलं होतं.... तो क्षण निघून गेला तरी अजूनही माझ्यासमोर तसाच आहे. आणि शेवटपर्यंत तो तसाच राहणार आहे.त्या क्षणी नक्की काय घडून गेलं माहीत नाही पण आम्हा दोघांनाही एकदम काहीतरी जाणवलं. ते काय होतं हे जाणून घ्यायचा प्रयत्न मी करणार नाही. पण आयुष्याचे श्वास भरलेल्या वाळूच्या घड्याळातल्या खाली पडून गेलेल्या क्षणांपैकी एक कायमचा लक्षात राहणारा तो एक क्षण होता एवढं मात्र नक्की.
--अदिती