हस्तिदंती

अनेकदा असे लक्षात येते की माणसे एकाच क्षेत्रातील यश हे सर्वव्यापी समजून उठसूठ इतरांना अनाहूत सल्ले देणे , शहाणपणा शिकवणे अशा गोष्टी करताना दिसतात. मी किती मोठा, माझे यश पहा, या दिखाऊपणामुळे आणि इतरांबद्दल दिसून येणाऱ्या अनाकलनीय तुच्छभावाबद्दल कीव येते. पण 'हस्तिदंती' मनोऱ्यात रहाणाऱ्यांना त्याचे फारसे गमक नसते. दांभिकता हा आताशी स्थायीभावच झाला आहे.


हस्तिदंती-


एकदा उतरुन ये ना खाली


हस्तिदंती हा मनोरा


एकदा सोडून पहा तरी


हा तुझा नसता तोरा



मान्य आहे, कौतुक आहे


तुझे आकाशाला हात टेकले


अरे त्यांना खिजवू नको


दैवाने ज्यांना दरीत फेकले


मी , मी करणाऱ्यांनो


थोडेसे स्वतःला आवरा


कधी कधी कळत नाही


काळप्रवाहातील भोवरा



माकडाचा झालेला माणूस


हा प्राणि उत्क्रांत आहे


संवेदनशील मनाची मात्र


अजून बरीच भ्रांत आहे


मनोऱ्याच्या पायथ्याशी


आहे रे तुझीच माती


खोलवर रुजली होती


कधीकाळी मानलेली नाती



कसे दिसतात सांगशील का


मनोऱ्यातून तुझ्या तारे ?


पायथ्यापासच्या माणसांची


आठवण तरी येते का रे ? 


खायचे वेगळे, दाखवायचे वेगळे


हेच सत्य उरले अंती


म्हणूनच तुझ्या मनोऱ्याला


म्हणतात का रे हस्तिदंती ?


                                -(साध्या घरातला ) अभिजित पापळकर