स्वातंत्र्यवीरांचे 'स्वातंत्र्यसमर'

आज दिनांक २८ मे २००७, आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची १२४ वी जयंती, म्हणजेच हे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्माचे शतकोत्तर रजतजयंती वर्ष.

स्वातंत्र्यवीर सावरकर हे स्वातंत्र्यदेवतेचे उपासक आणि त्यांनी तिला पुजली ती क्रांतीदेवतेच्या रूपात. ज्या वयात शिवरायांनी स्वराज्याचा ध्यास घेतला त्याच वयात त्याच महाराष्ट्रात जन्मलेल्या या स्वातंत्र्यवीराने भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व पणास लावण्याची प्रतिज्ञा केली व आपले जीवन राष्ट्रकार्यास समर्पित केले. रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले? या सिद्धान्तावर पूर्ण विश्वास असलेल्या या स्वातंत्र्यवीराने हिंदुस्थानातील क्रांतिपर्वाचा पाया रचिला. विद्यार्थी दशेत संघटनात्मक कार्य करणाऱ्या या महान क्रांतिकारकाने महान देशभक्त श्री. श्यामजी कृष्णवर्मा यांच्या शिष्यवृत्तीच्या साहाय्याने उच्च शिक्षणाचे निमित्त दर्शवित इंग्लंडच्या भूमीवर पाय ठेवले ते शस्त्रसाधनेच्या अंतस्थ हेतूने. जुलमी व साम्राज्यवादी इंग्रज राजवटीला केवळ शस्त्राचीच भाषा समजेल हे पूर्णपणे ओळखून त्यांनी क्रांतिपर्वास आरंभ केला.

इथे त्यांना लाभले ते शस्त्राहून संहारक असे लाला हरदयाळ, सेनापती बापट, मदनलाल धिंग्रा यांसारखे साथी. सशस्त्रतेचा पुरस्कार करणाऱ्या या द्रष्ट्याने शस्त्रांचे अध्ययन व संपादन यासाठी प्रयत्नशील असतानाच अचूक ओळखले की शस्त्रे ही आपणहून चालत नसतात तर ती चालवणारे सक्षम हात असावे लागतात. आणि ते हात शस्त्रावर चालण्यासाठी आवश्यक असते ती खंबीर मानसिकता. आणि ही मानसिकता निर्माण करण्यासाठी त्यांनी अर्ध शतक उलटून गेलेल्या १८५७ च्या स्वातंत्र्यसमराचा पुस्तक रूपाने उद्धार व प्रसार करायचा निर्णय घेतला. सैनिकांचे बंड अशी बदनामी झालेल्या त्या संग्रामाचा सन्मान करण्यासाठी त्यांनी त्या संग्रामाला नवे नाव दिले ’ १८५७ चे स्वातंत्र्यसमर’. अशी उदात्त कल्पना केवळ एखाद्या द्रष्ट्याच्या अलौकिक बुद्धिमत्तेतूनच निर्माण होऊ शकते. ह्या महान ग्रंथाने त्यांना तीन उद्दिष्टे साध्य करायची असावीत.

पहिले उद्दिष्ट म्हणजे या देशातील परमवीरांनी आपल्या मातृभूमीच्या दास्यमुक्तीसाठी पत्करलेले तेजस्वी हौतात्म्य या दास्यावस्थेतील देशात राहणाऱ्या जनतेच्या पुढे प्रकट करणे आणि १८५७ चा संग्राम हे शिपायांचे बंड होते हा अपप्रचार खोटा पाडत त्या तेजस्वी घटनेचे स्मरण देऊन क्रांतीचे स्फुल्लिंग चेतविणे. दुसरे उद्दिष्ट म्हणजे पारतंत्र्यात खितपत असलेल्या जनतेत आत्मविश्वास जागृत करून त्यांना हाती शस्त्र घेण्यास प्रवृत्त करणे ज्यायोगे साम्राज्यावर कोट्यावधी बाहूंचे शस्त्राघात होतील व अखेर ते साम्राज्य ढासळेल. तिसरा व मला अत्यंत महत्त्वाचा वाटलेला, त्या काळाची गरज असलेला हेतू म्हणजे हिंदू-मुस्लिम ऐक्य. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरापेक्षा हिंदू-मुस्लिम यांनी एकत्रित रित्या परकीय सत्तेविरुद्ध केलेल्या संग्रामाचे दुसरे उदाहरण कोणते? इंग्रज सातत्याने फोडा आणि झोडा या तंत्राचा वापर करून हिंदू व मुसलमान या दोन समाजांत हेतुपूर्वक फूट पाडून त्यांना सातत्याने तेच एकमेकाचे खरे शत्रू असे भासवीत त्यांना दुभंगत होते. कारण सरळ होते. १८५७ चा अनुभव लक्षात घेता हिंदू-मुसलमान संयुक्त लढा त्यांना परवडणारा नव्हता. एकीकडे दुहीची बीजे खोल रुजत असतानाच हिंदुस्थानातील जनतेला या कुटील कारस्थाना पासून सावध करून त्यांच्या एकत्रित प्रयत्नांचे स्मरण करून देऊन हिंदूंबरोबरच मुसलमान समाजालाही स्वातंत्र्यसंग्रामात सामावून घेण्यात १८५७ चे ’स्वातंत्र्यसमर’ हे निश्चितच प्रभावी ठरणार होते. आणि म्हणूनच ’१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ या ग्रंथाच्या निर्मितीला हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यसंग्रामात अनन्यसाधारण स्थान आहे.

प्रत्येक भारतीयाच्या हृदयात या ग्रंथाला धर्मग्रंथाहून मानाचे स्थान आहे. असा हा ग्रंथ तयार होत आहे याची कुणकुण लागताच स्वातंत्र्य, लोकशाही वगैरेच्या बाता मारणाऱ्या इंग्रज सरकारने ही आग भडकण्या आधीच विझवायचा आटोकाट प्रयत्न केला. झडत्या, जप्त्या, बंदी हे सगळे उपचार करूनही एक दिवस त्या दडपलेल्या ज्योतीने ज्वाळेचे रूप धारण केलेच. हीच ज्वाला हुतात्मा भगतसिंहाच्या रूपाने सरकारवर झेपावली व अंतिम पर्वात याच ज्वालेने आझाद हिंद सेनेच्या रूपाने साम्राज्याला भडाग्नी देण्यासाठी झेप घेतली. या ग्रंथावर कितीवेळा शोध-जप्त्या झाल्या, किती जणांना तो बाळगल्याबद्दल शिक्षा ठोठावल्या गेल्या याची गणतीच नाही. की तोडीला तरू फुटे आणखी भराने या न्यायाने हिंदुस्थानातील जनतेला दिवसेंदिवस या ग्रंथाने अधिकाधिक झपाटले.

ज्याची लेखणी अशी संहारक, त्या क्रांतिकारकाला सरकार वचकून नसले तरच नवल. डोळ्यात तेल घालून पहारा असतानाही हिंदुस्थानातल्या मुलांसाठी खाऊचा पेटारा या स्वातंत्र्यवीराने पाठवलाच! आणि सरकारला समजले ते त्यातला खाऊ मुलांनी सरकारी अधिकाऱ्यांना वाटल्या नंतर. हुतात्मा अनंत कान्हेरे, अण्णा कर्वे व देशपांडे यांनी जुलमी जॅक्सनला कंठस्नान घालण्यासाठी जी ब्राउनिंग बनावटीची पिस्तुले वापरली, ती स्वातंत्र्यवीरांनी १९०८ साली पाठविलेल्या पहिल्या वीस पिस्तुलांपैकीच होती. हा ज्वालामुखी बाहेर राहणे आपल्या हिताचे नाही हे जाणून इंग्रजांनी आपला जुलुमी पंजा त्यांच्या वर आवळत त्यांना दोन काळ्यापाण्यांची क्रूर शिक्षा दिली. मात्र अविचल असलेल्या या ध्येयबद्ध वीराने त्या सरकारलाच उपहासाने विचारले की खरोखरच त्यांचे जुलमी राज्य तोपर्यंत टिकेल काय? काळ्यापाण्यावर कडेकोट बंदोबस्तातही स्वातंत्र्यवीर सावरकरांना शृंखलाबद्ध ठेवण्याची गरज भासली  यातच सरकारला त्यांची किती भिती होती ते दिसून येते. तुरुंगातले अपमान, हाल, नैराश्य व बाहेर होणारी घरादाराची वाताहात यावर मात करून हा योद्धा हिंदुस्थानचे स्वातंत्र्य हे एकमेव ध्यास घेऊन जिवंत राहिला, अंदमानच्या तुरुंगातल्या सर्व बंद्यांचा नेताच नव्हे तर देव झाला. इथे तुरुंगातही जबरदस्तीने बाटवून मुसलमान झालेल्यांना आपुलकीने पुन्हा त्यांच्या इच्छेनुसार हिंदू धर्मात स्वीकारून त्यांनी आपले कार्य चालूच ठेवले. दगडाची भिंत आणि लोखंडी खिळे यांतून या असामान्य प्रतिभेच्या महाकवीने ’कमलाकाव्य’ साकार केले. अंदमानात पिचत पडण्यापेक्षा बाहेर आलो तर काहीतरी कार्यसिद्धीची आशा आहे हे ओळखून त्यांनी आपली सशर्त मुक्तता करून घेतली. मात्र सरकारच्या जागत्या पहाऱ्यात आणि आपलेच वैरी झालेल्या स्वकीयांच्या राजकारणात त्यांना पुन्हा प्रत्यक्ष देशकार्यात सक्रिय होता आले नाही. मात्र त्यांनी आपले हे आयुष्य समाजसेवा करण्यात कारणी लावले. आपले परखड विचार त्यांनी कुणाचीही पर्वा न करता निर्भीडपणे समाजापुढे मांडले.

स्वातंत्र्या नंतर या महापुरुषावर आपल्याच देशात खुनाच्या कटाचे आरोपपत्र ठेवले गेले. त्यांच्यावर संकुचित हिंदुत्वाचे आरोप झाले. त्यांची अवहेलना झाली. कुण्या एका सत्तांधाने अंदमानच्या शिलेतून त्यांचे शब्द आणि नावही पुसून टाकले. मात्र हिंदुस्थानातील कोट्यावधी जनतेच्या मनात या स्वातंत्र्यवीरा विषयीची असलेला नितांत आदर कुणीही कधीही नष्ट करू शकणार नाही. सुमारे ३६-३७ वर्षे झाली असतील, पण अजूनही दादरच्या सावरकर सदनात मला माझ्या बालपणी जायचे भाग्य लाभले तेव्हा भक्तिभावाने पाहिलेल्या त्यांच्या वस्तू - त्यांच्या वहाणा, त्याची काठी, त्यांची आराम खुर्ची, त्यांचा चष्मा, त्यांची टोपी हे सगळे आजही डोळ्यापुढे अंधुकपणे उभे आहे.

या महान स्वातंत्र्यवीरास त्यांच्या १२४ व्या जयंतीदिनी सादर प्रणाम.