असोसिएशन्स!

परीक्षा संपली एकदाची." हे कुणाचेतरी बोल कानावर पडले मात्र आणि मी हे वाक्य शेवटचं कधी बोलले होते ते आठवायला लागले. बापरे! म्हणता म्हणता मध्ये ५-६ वर्ष गेली की! कधी गेली..कशी गेली..मला कळलं कसं नाही? मलाच खूप आश्चर्य वाटलं. परीक्षा आणि त्याबरोबरचे इतर अनेक घटक बरेच मागे राहिलेत..... टेन्शन येणे, रात्री जागणे, डोकं दुखणे, आयत्या वेळेस परीक्षेचं साहित्य हरवणे या 'नॉर्मल' गोष्टी हातून घडण्याव्यतिरिक्त अजून एक गोष्ट कायम घडायची. पण त्याचा कर्ता करविता होता निसर्ग. आमच्या घरातून दिसणारं चाफ्याचं झाड भरभरुन फुलायचं. बरोब्बर परीक्षेच्या हंगामात! फ़ेब्रुवारी पासून कळ्या दिसू लागायच्या आणि ऐन परीक्षेच्या वेळेस झाड पूर्ण डवरलेलं असायचं. बरं चाफ्याचा रंगही कसा? लाल-गुलाबी! त्याचा एकप्रकारचा किनरा हवाहवासा गंध हवेत असायचा. पण परीक्षा असल्याने पाठांतरासाठी फेर्‍या मारत असताना दिसू शकणार्‍या त्या नजार्‍यावरच समाधान मानावं लागायचं. चाफा आणि परीक्षा ही 'असोसिएशन' एव्हढी घट्ट झाली की बस! चाफ्याच्या कळ्या दिसू लागल्या की जाणवायचं की परीक्षा जवळ येत चाललीय....आणि परीक्षेची तारीख कळली की चाफा फुललेला असणारच ही खात्री!

आता विचार केला की वाटतं अश्या अनेक 'असोसिएशन्स' किंवा 'जोड्या' आपल्या मनात तयार झालेल्या असतात! आपोआप. नकळत. माझ्यातरी पुष्कळ आहेत. एखादा विशिष्ट गंध आजही नाकाशी भिडला किंवा एखादं विशेष गाणं कानावर पडलं की मन पोचतंच त्या काळात... शाळेत आठवतं 'जोड्या लावा' म्हणून एक प्रकार असायचा.. तश्याच याही जोड्याच पण त्या मुद्दाम लावलेल्या नाहीत. आपसूकच जमलेल्या अशा...

'कशी चिकमोत्याची माळ' हे गणपतीचं गाणं ऐकलं की गणपती आल्याचा भास अजूनही होतो. वर्षानुवर्ष ते गाणं मी केवळ 'गणपती टू गणपती'च ऐकल्याने असं झालंय. बरं काही काही सिनेमातली गाणी तर अगदी त्या त्या कालखंडाशी हातात हात मिळवूनच आठवतात. उदाहरणार्थ प्रभुदेवाचं 'मुकाबला मुकाबला' हे गाणं जेव्हा प्रचंड पॉप्युलर होतं त्या काळात 'सुपरहीट मुकाबला' नावाचा टॉप टेन गाण्यांचा कार्यक्रम डीडी मेट्रो वर लागायचा. महिनोन्महिने ते गाणं त्या काऊंटडाऊनमध्ये आपलं स्थान टिकवून होतं. त्यामुळे ते गाणं आणि सुपरहीट मुकाबला ही जोडी मनात अजूनही घट्ट रुतून आहे. सुपरहीटच्या त्या काळात ते गाणं खूप एन्जॉय केलं पण का कुणास ठाऊक, आता तेच गाणं युट्युबवर कितीही वेळा पाहिलं तरी तितकी मजा येत नाही...
फटाक्यांचा वास! तो आला नाही तर दिवाळी ही दिवाळी वाटणारच नाही. पहाटेच्या काळोखात, उटण्या्ने आंघोळ करुन जे फटाके उडवलेत आणि त्या वेळेस हवेत भरुन राहिलेला लक्ष्मीबारपासून ते टिकल्या/टेपांचा जो वास असतो तो केवळ अवर्णनीय आहे.

१३ जून. शाळा सुरु होण्याची तारीख. वर्षानुवर्ष याच तारखेला शाळा सुरु झालीय. या काळाशी अनेक गंधांची भेळ निगडीत आहे. खासकरुन पहिल्या पावसाचा मृद्‍गंध! हवाहव्याश्या वाटणार्‍या गारव्यातून पसरणारा तो मातीचा सुवास, नवीन कोर्‍या वह्यांचा वास आणि त्यांना कव्हरं घालायच्या सामूहिक गृहोद्योगाने दरवळणारा गोंदाचा वासही. ('जोकर' छाप गोंदाची ती लाल डबी. हाताच्या बोटांना तो वास चिकटलेलाच असायचा कारण उठून सारखे हात धुणार कोण? गोंदाच्या पापड्या सुटतातच आपोआप. जरा बोटं एकमेकांवर घासली की झालं.) ...ती लेबलं...ती 'हिरो' ची सोनेरी टोपणाची फाऊंटन पेन्स...हट्टाने आणायला लावलेली 'पायलट' पेन्स....नवीन वही आणि पेन पाहून सुंदर अक्षर काढायची आलेली सुरसुरी आणि वही शेवटपर्य़ंत 'नेटकी' ठेवण्याचा केलेला तो निश्चय.......छ्या: किती किती आठवणी आहेत.पहिल्या पावसाचा तो वास हवेत मुरुन विरुन गेल्यावर श्रावणात पडलेला तो प्राजक्ताच्या नाजूक फुलांचा खच! प्राजक्ताच्या खरखरीत पानांना घासत गोळा केलेले ते प्राजक्ताचे 'पैसे', तळहातावर प्राजक्ताची कोवळी लहान पानं लटकवून एकमेकांना दाखवले्ली 'पोपटाची पिल्लं' आणि या सगळयांत अजून एक गोष्ट नजरेत भरलेली असायची... ती म्हणजे पावसाचं पाणी साठून भरलेले छोटे खळगे, खड्डे! सगळे 'चहाच्या रंगाचे' दिसायचे! आणि या सर्वांशी एकरुप झालाय एक खमंग वास. आई करत असलेली कांदाभजी!! पावसाच्या या माहौलमध्ये कांदाभज्यांचा वास एव्हढा एकरुप झालाय की आजही कांदाभजी मी केली काय किंवा दुसरं कोणी करत असलं तरी चट्कन नजर बाहेर जाते...पाऊस पडतोय का पहायला!       परदेशात राहिल्यापासून हापूस आब्यांशी गाठभेट कमी कमी होत आता जवळपास नाहिशीच झाली आहे. तसे अल्फान्सो या वर्षी अमेरिकन बाजारात दाखल झाले खरे, पण ते 'आपले' नाही वाटले. फळ हातात घेऊन वास घेऊन पाहिला, थोडाफार गंध जाणवला पण तो तितपतच. पण केवळ तेव्ह्ढी झलकही पुरेशी झाली मला आणि पिकलेल्या हापूसच्या गंधात मिसळलेल्या पेटीतल्या सुक्या गवताचा गंधही नाकाशी (गंधांचे हे मिश्रण मला फार प्रिय आहे!) रुंजी घालू लागला. वाटलं, हा 'मे' च चालू आहे. दुसरा कुठला महिना असूच शकत नाही! माझ्यासाठी आंबे आणि मे ही एक अजोड आणि अवीट जोडी आहे, त्यामुळे ग्रोसरी शॉपमध्ये ठेवलेल्या त्या आंब्यांवर फिरवलेल्या एका नजरेने सुद्धा मला क्षणभर काळ विसरायला झाला..
तशीच ती सनई. आपल्याकडे सर्व मंगलप्रसंगी सनई वाजवतात. लग्नं तर आहेच पण इतर सण-समारंभ, उद्‍घाटने, महाराष्ट्र दिन, शिवजयंती सारखे दिनविशेष, दसर्‍याच्या मिरवणुका वगैरे प्रसंगीही सनई असतेच. पण सनई आणि लग्नं ही जोडी एव्हढी अतूट की महाराष्ट्र दिनी कानावर पडणार्‍या सनईचे सूर ऐकून क्षणभर लग्नाच्या हॉलमध्ये आहोत की काय असंच नेहेमी वाटतं.
मॉल्स आणि मल्टिप्लेक्स येण्याआधीची सिनेमा थिएटर्स. जुनाट धूळभरली बिल्डिंग..आणि लहान असल्याने जास्तच वाटणारा काळोख..त्यात भरुन राहिलेला पॉपकॉर्न आणि सिगरेटचा संमिश्र वास! हा वास कित्येक वर्षे मी सिनेमागृहापासून अलग करु शकले नाहीये. आताच्या ऍडलॅब्जमध्ये इव्हिनिंग इन पॅरिसचा वास दरवळत असतो पण त्यामुळे पिक्चर पहायला आलोय असं वाटतच नाही.
अश्या अनेक गोष्टींची सांगड जुळलेली असते..काही भल्या काही बुर्‍या. काही निरर्थक वाटतात तर काही अर्थपूर्ण. आणि ही प्रक्रिया अव्याहत चालूच असते...आयुष्यभर. या ठिकाणी पु.लं.नी अपूर्वाई मध्ये सांगितलेली आठवण प्रकर्षाने आठवतेय. नाताळच्या वेळेस ते एका पाश्चात्य कुटुंबात होते. तेव्हा तिथे टेबलवर ख्रिसमस केक ठेवला होता. त्यावर ब्रॅडी ओतून दिलेल्या फोडणीमुळे निर्माण झालेल्या धुरावर हात शेकत तिथली तरुणी म्हणते "लहानपणापासून हा वास घेतल्याशिवाय ख्रिसमस आलाय असं मला वाटतंच नाही!"
पण यामुळेच खरी मजा येते नाही? अशा असोसिएअशन्सचं बोट धरुन भूतकाळात मनमुराद भटकून यावं. मग वर्तमान अजून रंगीत भासू लागतो.