कानडा हो विठ्ठलु

'कानडा हो विठ्ठलु कर्नाटकू ' या सुप्रसिद्ध ओळीमुळे विठ्ठल हे दैवत कर्नाटकातून महाराष्ट्रात आले की काय असे कदाचित वाटेल.
'कानडा' हा शब्द श्रीकृष्णाच्या 'कान्हा' या नांवावरून आला असावा असेही मी ऐकले आहे.
'कानडा' याची 'का नडा' अशी फोड करून 'त्रास न देणारा' असा अर्थसुद्धा कोणी लावला आहे.
या अभंगाला अत्यंत मधुर अशी चाल पं.हृदयनाथ मंगेशकरांनी लावली आहे. त्यांच्याच 'भावसरगम' या कार्यक्रमात त्यांनी हा अभंग गातांना त्याविषयी थोडी माहिती सांगितलेली मी ऐकली आहे. त्यानुसार 'कानडा' या शब्दाचा 'आपल्याला न समजण्यासारखा, अगम्य, अद्भुत' असा अर्थ या अभंगात आहे. तो नाना तऱ्हेची नाटके रचत असतो, त्याची लीला दाखवीत असतो. ती पाहून मन थक्क होऊन जाते. या अभंगामधील इतर ओळी वाचून मला हा अर्थ योग्य वाटतो.
१.यावर आपले काय मत आहे?
२.या अभंगातील 'खोळ बुंथी घेऊनी खुणेची पालवी। आळविल्या नेदी सादु।।'या ओळीचा अर्थ काय आहे?
३.एक प्राथमिक शंकाः  'विठ्ठल' या नांवाची उपपत्ती काय आहे?