वन्यजीवन

काल मातृभू संस्कार तर्फे आयोजित श्री. मारुती चितमपल्ली ह्यांचे व्याख्यान ऐकायला गेलो होतो.  खूप मजेशीर, चकित करणारी, गमतीदार, रोचक अशी त्यांनी प्राण्यांबद्दलची माहिती सांगितली.

१. लंगूर कॅंम्प फायर( शेकोटी )करतात अगदी माणसे जशी लाकडे रचून करतात तशी पण न जळवता शेक घेतात. आदिवासींच्या म्हणण्या प्रमाणे ते आपल्या डोळ्यांनी लाकडांमधलं अग्नीतत्व शोषून घेतात म्हणून ती लाकडं जाळायचा प्रयत्न केला तर ती जळत नाही. ह्यावर संशोधन सुरू आहे.

२. जवळपास सगळेच प्राणी (वाघ सोडून) झुंडी/कळपात राहतात. माकडांची टोळी असते व त्यांचे नंबर एक व नंबर दोन असे नेतेही असतात. नंबर दोनचा नेता आपण नंबर एक बनण्यासाठी डावपेच खेळत असतो.

३. हत्तीची पिल्लं मोठी झाली की वेगळे राहतात. पण खूप वर्षांनी  भेटल्यावर एकमेकांना ओळखतात.  बऱ्याच प्राण्यांच्या मुली माहेरपणाला येतात.

४. दुष्काळात माकडे  गळ्यात गळे घालून सामूहिक आत्महत्या करतात पण त्यापूर्वी ते आपल्या पिलांसाठी भूकलाडूची सोय करून ठेवतात.

५. सिंह स्वतः शिकार करत नाही. सिंहीण शिकार करते ती ओढत आणून आधी सिंहाला व पिलांना  देते मग स्वतः करिता शिकार करते.

६. प्राण्यांचा जन्म व मृत्यू बघायला मिळणे दुर्मिळ गोष्ट आहे. हत्ती मेल्यावर इतर हत्ती त्याला ओढत डोंगरावर घेऊन जातात तिथून खाईत ढकलून देतात किंवा नदीत सोडून देतात.

७. वाघ माकडाचं आधी सायकॉलॉजिकल किलींग करतो. दुपारी १ नंतर माकडं झाडावर विश्रांती घेत असतात त्यावेळेला वाघ त्या झाडाखाली येतो आणि माकडाच्या सावलीवर झडप घालतो, माकडाला वाटतं आपल्यालाच पकडलं आणि ते जीव वाचवण्याच्या धडपडीत खाली पडतं  अन वाघ त्याला खरं-खुरं पकडून ठार करतो.

८. गाढवांच्या बाबतीत असतं सायकॉलॉजिकल बाईंडिंग. नांदेड जिल्ह्यात गाढवांचा बाजार भरतो. रात्री गाढवांचा मालक गाढवं पळून जाऊ नये म्हणून सगळ्या गाढवांना गोलाकार उभे करतो, मध्यभागी एका गाढवाला दोरीने बांधतो व बाकीच्या गाढवांना खोटं-खोटं नुसती बांधण्याची क्रिया करतो. सकाळी सगळी गाढवं जिथल्या तिथे असतात. सोडण्याची क्रिया केल्याशिवाय ते जागचे हालत नाही.

९ चकोर पक्षी चांदणं टिपतो असं म्हणतात पण ते खरं नाही. दिमक (किडे) रात्र झाली की बाहेर पडतात आणि ते किडे,हे चकोर पक्षी टिपत असतात.

१०. चातक पक्षी जमिनीवरचं पाणी कधीही पीत नाही. पावसाळ्यात पानाच्या टोकाला चोच लावून पाणी पितात इतर वेळी कमळाच्या पानांवरचं दव पितात.

११. तसेच राजहंस पक्ष्याबद्दलही(दूध पाणी वेगळे करून पितो) गैरसमज आहे. राजहंस कमळाच्या देठात जो दुधासारखा पांढरा द्रव पदार्थ असतो,तो शोषून घेतो.

१२.रक्तचंदनाचे झाड अल्ट्रा व्हॉयलेट (मराठी?) किरणांना शोषून घेतात तर कुसुमांची झाडं उष्णता.

१३. वीज पडल्यामुळे चिंचेच्या व वडाच्या झाडांना इजा पोचत नाही.

१४. त्यांनी सागरी प्राण्यांवरही संशोधन केले आहे पण वेळेअभावी सांगू शकले नाही. ती माहितीही तितकीच अभ्यासपूर्ण व मनोरंजक असेल. बघू कधी ऐकायचा योग येतो ते!