एका लग्नाची गोष्ट!

लग्न! दाराशी केळीचे खुंट,आंब्याचे टहाळे आणि झेंडूच्या फुलांची तोरणं,पैठण्यांची सळसळ, अत्तराचा दरवळ, करवल्यांचे मिरवणे,भटजींची बोहल्यावरची लगबग, "आता मुलीला आणा... मुलीचा मामा कुठे आहे? " अक्षता, मंगलाष्टका आणि 'तदेव लग्नं..' झालं की 'वाजवा रे वाजवा..' चा इशारा! होमाचा धूर,सप्तपदी, ते ४,५ दा साड्या बदलणे,विहिणींच्या ओट्या,मानपान,रुसवेफुगवे,व्याही भेटी, पंगतीतला आग्रह,जिलेब्यांची ताटे आणि संध्याकाळचे आईसक्रीम!
असं किवा यातलं कोणतंच दृश्य जरी मानहाईमच्या चर्च च्या दाराशी अपेक्षित नव्हतं तरी इतकी सामसूम सुद्धा अपेक्षित नव्हती.३ चा मुहुर्त आणि आम्ही २.३० ला तिथे पोहोचलो म्हणजे वेळेतच होतो. नक्की आजच आहे ना लग्न? अशी शंका येऊन मी हळूच पत्रिका पाहिली. एकात एक गुंतलेली बदाम हृदयं आणि आतल्या पानावर
"आम्ही लग्न करीत आहोत,तरी अगत्य येण्याचे करावे.." अशा अर्थाचा मजकूर! " आमचे येथे श्रीकृपेकरून..." असा मजकूर लग्नपत्रिकेवर वाचायची सवय असलेल्या डोळ्यांना चि. सौ.का. सुझान आणि चि. ख्रिस ने पाठवलेली आपल्या स्वतःच्याच लग्नाची पत्रिका आहे हे मान्य करायला खूप वेळ लागला होता.चर्चच्या आत डोकावून पाहिले,तर तिथेही शांतता!थोडे तिथेच रेंगाळून बाहेर आलो तर समोरच मोनिका!

करवलीबाई आणि त्यांचा नूतन नवरा फिलिप्स (यांचे १५ दिवसांपूर्वीच लगीन झालं होतं) आजचे विशेष फोटोग्राफर होते. हळूहळू वऱ्हाडी जमायला लागले.एवढ्यात एका गाडीतून ख्रिस आणि सुझानला घेऊन मटियाझ आला.मोतिया रंगाचा सॅटिनचा वेडिंग गाऊन घातलेली सुझन सोनेरी परीच दिसत होती.ख्रिसही रुबाबदार वेडिंग सूट मध्ये, "कोण तू? कुठला राजकुमार?" असे विचारावेसे वाटणारा दिसत होता.सर्वांना त्या दोघांनी अभिवादन केले आणि आम्ही सर्वजण चर्च मध्ये शिरलो.मानाच्या खुर्च्या सोडून जरा मागेच बसावे असा विचार करून तिथल्या जरा मागच्या बाकावर टेकलो तर मोनिकाताईंनी आम्हाला हाताला धरून पुढे नेले.                                                                             
ऑर्गनच्या प्रसन्न सुरांबरोबरच हातात हात गुंफून ख्रिस आणि सुझान मंद पावले टाकीत आत प्रवेशते झाले आणि येशुसमोरील जागेत ठेवलेल्या स्टुलांवर जाऊन बसले.पाद्रीबाबांनी वधूवरांना शुभाशीर्वाद दिले आणि ऑर्गनचे सूर चर्चमध्ये पसरू लागले,प्रत्येकाच्या समोर मंगलाष्टकांचे कागद ठेवले होते‌‌. सारेजण ती लग्नगाणी गाऊ लागले.मंगलाष्टका संपल्यावर त्यांनी एकमेकांना अंगठ्या घालून सुखदुःखात साथ देण्यासाठी पतीपत्नी म्हणून आजन्म स्वीकार केले.नंतर फादरनी लग्नोपदेश केला.गुलाबपाकळ्यांच्या वर्षावात नूतन दांपत्य चर्चबाहेर आले.त्यांच्या डोक्यावर तेथील लोकांनी तांदूळ टाकलेले पाहून जरा आश्चर्यच वाटले..आपल्या अक्षतांशी साम्यच की हे! फक्त आपल्या अक्षता कुंकुमाचे बोट लावून रंगीत करतात एवढाच काय तो फरक!दोघांचे आईवडिल, भावंडे यांनी गळाभेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले आणि मग इतर सर्वांनी!

आपल्याला लग्नाच्या दिवशी सकाळी हॉलवर जाऊन उपमा खाऊन, अक्षता टाकून जिलेबी नाहीतर श्रीखंडाचे जेऊन ऑफिसला पळायची सवय! आणि सुट्टीचा वार असेल तर तिथे जरा जास्त वेळ रेंगाळून घरी येऊन 'ताणून द्यायची'... असा किरकोळ बदल! इथे तर कार्यालयच नव्हते.लग्न मानहाईमच्या चर्च मध्ये, आमची राहण्याची हॉटेले मुटरस्टाट मध्ये तर लग्नाचा बाकी सोहळा डायडेसहाईम मधील एका निसर्गरम्य, रोमँटिक ठिकाणी!सगळ्या गाड्या आता डायडेसहाईमच्या दिशेने धावू लागल्या.आमची वर्णी वधूपित्याच्या गाडीत लागली‌.श्री. ष्मिट गाडी चालवत होते आणि सौ. ष्मिट नकाशात पाहून कसे जायचे ते सांगत होत्या.आणि मध्येच मागे वळून आमच्याशी गप्पाही चालू होत्या," आम्ही पण आत्ता पहिल्यांदाच जातो आहोत ना तिथे,त्यामुळे नकाशा पहावा लागतोय!" आम्ही गाऽरच झालो.मानहाईम ते डायडेसहाईम गाडीने पोहोचायला आम्हाला साधारण १/२ तास लागला.दुतर्फा द्राक्षाचे मळे,सफरचंदाची झाडे,अजूनही असलेली गवतफुलं आणि रंग पालटू लागले मेपल्स होते‌. सुझनचे आईबाबा बेन्सहाईमचे, म्हणजे याच भागातले,ते उत्साहाने आम्हाला माहिती सांगत होते

डायडेशाईमच्या केटशाऊर होफ मध्ये पोहोचलो.सन १८२२ मध्ये बांधलेला तो कुण्या उमरावाचा वाडा किवा गढीच होती ती!त्याचेच आता रेस्टॉरंट+ हॉटेल केले आहे.कार्यालय,जेवणावळी असं काही नव्हतंच.त्या वाड्याच्या चौकात लहानसं फरसबंद अंगण आहे, चहूबाजूंनी अंजिराची झाडं बाळअंजिरं लेवून डोलत होती.मेपल्स आणि मयूरपंखी चवऱ्या ढाळत येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करत होते.अंगणातच एका मेजावर झेक्ट( जर्मन शँपेन),फळांचे रस आणि जोडीला चीजचे प्रकार आणि ब्रेत्स्झेल दिले जात होते( ब्रेत्स्झेल-एक विशिष्ठ प्रकारचा हृदयाच्या आकाराचा पाव,जी बायरिश भागाची खासियत आहे!)मागील बाजूला असलेल्या प्रशस्त हिरवळीवर एकत्रित फोटोचा कार्यक्रम झाला.हृदयाच्या आकाराचे ,प्रेमाच्या रंगाचे लाल गुलाबी फुगे ख्रिस आणि सुझन च्या हातून हवेत सोडण्यात आले.प्रत्येक फुग्यावर प्रेमवचने लिहिली होती,जणू प्रेमाचा संदेशच हवेत लहरत दूर दूर जात होता.
आतील दालनात एका मेजावर आकर्षक रीतीने सर्वांनी आपापल्या भेटवस्तू ठेवल्या होत्या.आम्हीही आमची भेटवस्तू तिथे ठेवून आलो. चटकन आठवले ती नवरानवरीला भेटण्यासाठी स्टेजजवळ लागलेली रांग,त्यांच्या हातात भेटवस्तू/पाकिटे दिल्यावर ती झटकन आपल्या हातात घेऊन त्याची नोंद करणारा नवऱ्याचा/नवरीचा काका,भाऊ किंवा तत्सम कोणीतरी! " अहेर आणू नये.." असे लिहिले असतानाही वरवधूच्या हातात पाकिटे कोंबणारे नातेवाईक आणि आता 'याचं' काय करायचं?ते न कळून गोंधळलेले वरवधू! त्या टेबलाच्या जवळच एका फळ्यावर 'कोणी कोठे बसायचे' ते लिहिलेले होते.८ मेजे,प्रत्येक मेजावर ८ जण! गुलाबफुलांनी आणि ऑर्किडच्या सुंदर पुष्परचनांनी टेबले सजवली होती.प्रत्येकाचे नाव कलात्मक रीतीने मेणबत्त्यांवर लिहिलेले होते‌. ६० च्या आसपास निमंत्रित! एकच पंगत!सगळे एकाच वेळी जेवायला बसले,नवरानवरी इतकेच काय तर मुलीच्या आईवडिलांसकट!पंगतीत जागा पटकावण्यासाठी करावी लागणारी धडपड,पहिली पंगत उठायच्या आधीच खुर्च्यांच्या मागे उभे राहणारे लोक,मठठा,मठठा ... करत आपण वाढा म्हणायच्या आधीच धावत पुढे जाणारे वाढपी,आणि"वाढ रे यांना ४ जिलब्या अजून..काही होत नाही हो!" असे पंगतीतले आग्रह, आपल्या कडील कार्यालयातील दृश्य तरळून गेले एकदम डोळ्यांसमोर!

                  

जेवण कोर्सेस मध्ये वाढले जाणार होते आणि प्रत्येक कोर्स च्या मध्ये काही गमतीदार कार्यक्रम होते. सांद्र की कायशा त्या संगीताने वातावरण जादूभरले झाले होते.सुझान च्या वडिलांनी सर्वप्रथम सर्व आमंत्रितांना भोजनाचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेण्याची विनंती केली आणि नवीन जोडप्याला आशीर्वाद देऊन आपला चषक उंचावला,पाठोपाठ साऱ्यांनी चषक उंचावून 'प्रोस्ट' म्हणजे 'चिअर्स' केले.ख्रिसचे बाबा उठले,सुझन सारखी 'बहू' मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करीत तिला 'मुहदिखाई'  म्हणून 'केझस्पेस्झट्लं' बनवण्याचे मशिन दिले.बेक मंडळी आइनस्टईनच्या आल्प्सच्या कुशीतल्या  गावाची,उल्मची! आणि केझस्पेस्झटलं ही तिथली खासियत!

डायडेसहाईम हे 'वाईन लँड' म्हणून ओळखले जाते.इथे येतानाच बहरलेल्या द्राक्षांच्या मळ्यांनी ते सांगितले होतेच, त्यामुळे श्वेतवारुणी आणि रक्तवारुणीचे चषकच्या चषक भरले जात होते,रिकामे होता न होताच परत परत भरले जात होते‌. रुकोला सॅलड आणि सुतरफेणीसारख्या शेवया आंब्याच्या टक्कू सारख्या एका पदार्थाबरोबर आल्या. ते खाऊन होत असतानाच पेल्यांचा किणकिणाट झाला,संगीतही थांबले.ख्रिस आणि सुझानला अँगेला,सुझानच्या बहिणीने एका कॅनव्हास पाशी नेले,तिथे तैलरंग,कपडे खराब होऊ नयेत म्हणून लॅबकोट ठेवलेले होते. कॅनवास वर तिने चौकोन,गोल,त्रिकोण अशा आकृती आखून ठेवल्या होत्या,त्यात एक चौकोन या दोघांनी भरून इतर सर्व पाहुण्यांनी ते चित्र जमेल तसे पूर्ण करायचे होते.प्रेमाचे प्रतिक असलेल्या बदाम हृदयाने सुझन ने सुरूवात केली आणि नंतर इतरांनी मधल्या 'ब्रेक्स' मध्ये ते चित्र पूर्ण केले.

                                                         

एकीकडे पुढचा कोर्स आला,टोमॅटो पोखरून त्यात झुचिनी,वांगं इ. भरले होते आणि परत टोमॅटोच्याच टोपीने ते बंद करून उकडले होते.प्रोजेक्टरवर ख्रिस आणि सुझन चे बालपणापासूनचे आतापर्यंतचे फोटो दिसू लागले आणि त्या निवडक फोटोंची खासियत वेचक शब्दांत वर्णन करत होत्या, वधूमाय आणि वरमाय!

बटाट्याचे ग्राटिन म्हणजे बटाट्याचे भज्यांना करतो तसे काप करून मेयॉनिजमध्ये बुडवून परत एकावर एक ठेवून पूर्ण बटाटा करून तो अवन मध्ये भाजला होता,सोबत गाजर,काकडी,कांद्याची पात इ. भाज्या चीजसॉस मध्ये घालून आणल्या होत्या, पावाचे विविध प्रकार ही त्याच्या बरोबर होते. हा प्रकार फारच चविष्ठ होता.आग्रह करकरून वाढपी वाढत होते.रिकामे चषक  न सांगताच भरले जात होते.केटररला सांगायला लागत नव्हते की वाढप्यांकडे लक्ष द्यायला लागत नव्हते.वधू वर मात्यापित्यांसकट सारे जण एकाच वेळी निश्चिंतपणे भोजनाचा आस्वाद घेत होते.ख्रिस आणि सुझन ला दोन टोकांना उभे करून त्यांच्या बहिणींनी एकमेकांबद्दल प्रश्न विचारले, बरोबर उत्तर आले की एक पाउल पुढे टाकायचे, असे करत करत दोघे मध्यावर आले आणि मग ख्रिसने सुझन ला आलिंगन दिले.आता ख्रिस आणि सुझनने सर्व आमंत्रितांची ओळख करून देताना प्रत्येकाची काही खासियत एखाद्या वाक्यात सांगितली.आपल्याकडे लग्नात आलेले पाहुणे कोण? हे नवरानवरीला कितीतरीदा माहितच नसते, इथे प्रत्येक आमंत्रिताची इतर सर्वांना ओळख खुद्द नवरानवरीच करून देत होते.

आतील दालनात 'डेझर्ट बुफे' लावला होता, वेगवेगळ्या प्रकारची पुडिंग्ज,चीज,फळे आणि कॉफीचे वेगवेगळे प्रकार, दुसऱ्या एका मेजावर कॉकटेल्स चे प्रकार आणि बिअर! प्रत्येकाला खास उल्म हून आणलेली चॉकलेटस दिली गेली.आता प्रोजेक्टरवर वेनिसचे गोंडोला दिसायला लागले,नवरानवरीला सहलीचे कपडे देण्यात आले आणि ख्रिसच्या हातात एक गाण्याचा कागद कोंबला, सुझन गोंडोलात बसली आहे आणि ख्रिस प्रणयगीत म्हणतो आहे अशी 'सिच्युएशन' देण्यात आली. ख्रिस आमचा चांगलाच बेसुरा तर सुझन ओपेरात गाणे म्हणणारी,त्यामुळे 'रोल्स' ची आलटापालट करून सुझनने गाणे म्हणून मधुर सुरांनी वातावरण भारून टाकले. एकीकडे डीजे चालू होतेच.नवदांपत्याने आता 'वेडींग केक' कापला, प्रेमाचा गुलाबी रंग स्ट्रॉबेरी केक मध्येही उतरला होता.

                                                      
'ब्रायडल डान्स' सुरू झाला, नवे जोडपे प्रथम पारंपारिक पद्धतीने नाचले,पाठोपाठ दोघांचे आईवडिल,भावंडे आणि मग साऱ्यांचेच पाय थिरकायला लागले, एकीकडे कॉफी,केक,पुडींग इ. चालूच होते.रात्र चढत होती, वातावरण नशिलं होते.ही आठवण मनात जपत सर्वांचा निरोप घेऊन एकेक जण परतू लागले होते.