तयारी उद्याच्या मराठीची

आजच्या काळात इंग्रजी भाषेला तिनं उभा केलेला 'विचारांचा देदीप्यमान डोलारा' पाहून समृद्ध भाषा मानले जाते. खरंतर इंग्रजी भाषा ही फक्त 'समृद्ध' नसून 'साधन समृद्ध' ही आहे. तिनं उभं केलेले हे 'वैचारिक साम्राज्य' हे इंग्रजी भाषिकांच्या 'सकारात्मक वारंवारिते' चा परिणाम आहे. तिच्याकडे असणारा 'साधन समृद्ध' हा गुण जरी इतर कुठल्याही भाषेने आपला 'बाज' सांभाळून  योग्य बदलासह स्वतः मध्ये अंगिकारला तरी ती  भाषा 'साधन समृद्ध' होऊ शकेल.
'साधन समृद्धता' म्हणजे काय?
'इतर सर्व गोष्टी एक समान आहेत'  असं गृहीत धरले तर, युद्धात ज्या योद्ध्याकडे अगदी प्रगत युद्धसाधने, अवजारे असतील, त्या योद्ध्याचा त्याच्या समोरील पारंपरिक युद्धसाधने, अप्रगत अवजारे असणार्‍या योद्ध्यावर विजय निश्चितच शक्य आहे हे ओळखता येईल.
आणि म्हणूनच सुखासीन आयुष्य जगण्यासाठी व  आपली 'साधन समृद्धता' टिकविण्यासाठी प्रत्येक मानवाला वा समजाला सतत प्रयत्नशील राहावे लागते.
जो सजगपणे 'प्रयत्नशील' असतो, तोच 'प्रगतिशील' असतो.
कृतिशीलतेच्या अशा सकारात्मक वारंवारतेलाच 'आधुनिकपणा' म्हटले पाहिजे.
सुखासीन आयुष्य जगण्यासाठी 'सकारात्मक वारंवारितेचे ' चक्र फिरणे पुढील दोन गोष्टींवर अवलंबून असतं -
१.  काम करण्याची पद्धत
२. आपले विचार दुसर्‍या व्यक्ती  पर्यंत पोहचविता येणं.
ह्या दोन गोष्टींमध्ये नैपुण्य मिळवायचे असेल तर, आजच्या काळाचे 'संगणक'रुपी महाहत्यार, हे स्वकर्तृत्वार हस्तगत करणं क्रमप्राप्त आहे. संगणकाला मराठी भाषेच्या 'प्रत्यक्ष' अमलाखाली आणायचे असेल तर खालील टप्पे पार करावे लागतील.-
पहिला टप्पा >
     सध्याच्या 'बाळबोध' लिपी मध्ये ('देवनागरी' मध्ये) सुधारणा करणे.
अस्तित्व टिकविण्यासाठी काळानुसार अनेक बदल आपलेसे करावे लागतात. इंग्रजी भाषेच्या रोमन लिपीचे वैशिष्ट्य हे आहे की त्यातील प्रत्येक 'अक्षर' /'अल्फाबेट' एकामागे एक, उजवीकडून डावीकडे ठेवता येतात. या एका वैशिष्ट्यामुळे इंग्रजी भाषेचा मुद्रण तंत्रातून, टंकन यंत्राकडे व तिथून संगणकापर्यंत वापर व विकास झपाट्याने व अचंबित करण्याजोगा झाला.  मी, प्रस्तुत लेखकाने मराठी साठी सध्याच्या 'बाळबोध' लिपीत याच भूमिकेतून काही बदल सुचवीत नव्या युगासाठी 'सुबोध लिपी' साकारलेली आहे. मनोगतींनी माझ्या  सुबोध लिपी संकेतस्थळाला भेट देऊन, ती जाणून घेण्याची व 'जरुरी' वाटल्यास सूचना करण्याची तसदी घ्यावी हि विनंती!
दुसरा टप्पा >
     'टंकन यंत्र' तसेच संगणकाच्या 'कळफलकाच्या स्वरूपाचे' प्रमाणीकरण करणे व त्याच्या सर्वत्रीकरणावर भर देणे.
कुठल्याही भाषिकाला एखादा विचार त्याच्या पद्धतीने उच्चारण्याची तसेच लिहिण्याची 'सहज प्रवृत्ती' असते.  तो भाषिक ज्या समाजात लहानाचा मोठा होतो त्या समाजालाच ह्या प्रवृत्तीला 'वळण' लावण्याचा अधिकार असतो.  अशा 'वळण' लावण्याच्या घरगुती प्रक्रियेला 'संस्कार' तर सामाजिक प्रक्रियेला (प्राथमिक)'शिक्षण' म्हणतात. अशा प्रकारेच एखाद्या समाजाची मानसिकता ‘एकजीव व एकमुखी’ होऊ शकते.
इंग्रजी भाषा व त्या भाषेला केंद्रस्थानी मानून तयार करण्यात आलेली प्रगत 'इलेक्ट्रॉनिक माध्यमे' वर उल्लेखित 'सहज प्रवृत्ती' ला तसेच त्या लगोलग एखाद्या समाजाच्या  'एकजीव व एकमुखी' मानसिकतेला अडसर बनू पाहत आहेत. 'युनिकोड' नावाचे तंत्र हे 'सुखसाधनांवरील मक्तेदारीच्या' अमेरिकी मानसिकतेची पताका आहे. 'आम्ही सार्‍या जगाचा विचार करतो' असं ठसवून, बिंबवून जगातील प्रत्येक भाषेच्या संगणकाच्या कळफलकाच्या स्वरूपाची मांडणी देखील तेच ठरवू पाहत आहेत. स्पष्टीकरणार्थ - ज्यांनी पद्धतशीरपणे टंकलेखनाचे सरकारमान्य प्रशिक्षण घेतले आहे त्यांना आज 'युनिकोड' तंत्रामुळे  संगणकावर टंकन करण्यासाठी खूप आटापिटा करावा लागतो. 'गमभन' किंवा 'बरहा' सारख्या सेवा उपलब्ध असूनही मराठी भाषिकाला 'm' म्हणजे 'म्' व  त्याचबरोबर 'maa' म्हणजे 'मा'  असं डोक्यात घोळवत राहावे लागते.  मुळात म्हणजे हि गोष्ट त्या व्यक्तीच्या स्वतः च्याच समाजाने शिकविलेल्या नव्हे वळण दिलेल्या 'म' ला काना 'मा'  या   मानसिकतेला  ला  विरोध करते. राज्यात ज्या सर्व-सामान्य जनतेने संगणक हाताळता यावा याकरिता सरकार मान्य 'टंकन प्रशिक्षण' केंद्रात टंकनाचे रीतसर प्रशिक्षण घेतले आहे, त्यांची संगणकाच्या समोर बसल्यावर काय भावना असते? हे कुणी जाणून घेण्याचा हि प्रयत्न करू नये. आज कुणी मराठी भाषेच्या कळफलकाचे प्रमाणीकरण झाले असे मानले तरी अनेक प्रश्न पडतात. अजूनही भिन्न वर्णाकारांचा (fonts चा) वापर करताना कळफलकांचे स्वरूप वेगवेगळे का असते?  इंग्रजी भाषेसाठी सर्व ठिकाणी एकच 'स्वरूप' असलेला कळफलकाचा वापर का अंगिकारला जातो? त्यात कोणी फेरबदल का करत नाही? ह्या सर्व प्रश्नांचे उत्तर एकच असू शकते ते म्हणजे तंत्रज्ञान व त्यावर आधारीत साधने विकसित करण्यामागचा 'हेतू' व 'दृष्टिकोन'.
अमेरिकेच्या सरकारचा खाजगी संस्थांकडून 'संगणक तंत्रविज्ञान' विकसित करून घेण्या मागचा हेतू, 'आपल्या देशाची सुरक्षितता जपणं' व त्यांचा त्यामागचा दृष्टिकोन, 'दुसर्‍या देशांवर कुरघोडी करणं' हा होता. या अगदी उलट भारताच्या सरकारचा 'संगणक तंत्रविज्ञान' विकसित करण्या मागचा हेतू, 'आम्ही भारतीय हे इतर पुढारलेल्या देशांपेक्षा अगदीच काही मागासलेलो नाहीत तसेच आम्हीही ते जे 'तंत्र' (त्यांच्या गरजांनुसार) विकसित करत जातील ते आम्हीही (प्रसंगी त्यानुसार आमच्या गरजा  बदलून) आत्मसात करू शकतो हे दाखवून देणं' हा होता/ अजून ही आहे.
संगणक तंत्र असो वा इतर कोणतेही विज्ञान त्याच्या अभ्यास, शोध व विकासामागचा हेतू ' ज्ञान हे नवनिर्मितीतून प्रकट होवून बहुतांशी समाजाच्या उपयोगी पडावयाला हवे' असा भारतीय परंपरेला साजेसा,  'राजमान्य' व्हावयास हवा.

तिसरा टप्पा >
     मराठी साठी 'कॅरेक्टर एनकोडींग प्रणाली' विकसित करणे.
जेवढं टंकन सोपं, तेवढं संगणकाला हाताळणं सोयीस्कर होणार. सध्याच्या 'बाळबोधलिपी' मुळे, विभिन्न पद्धतीची जोडाक्षरं असो वा ईकारान्त-ऊकारांत स्वरचिन्हे असो, संगणकाच्या कळपटावरील कमीत कमी कळांच्या साहाय्याने जलदगतीने व सहजासहजी टंकीत करणं कठीण जातं.
जर संगणकाला मराठीतून सूचना देण्याच्या ह्या पाहिल्या टप्प्यातच जर एवढा वेळ जात असेल तर त्या सूचना संगणकापर्यंत पोहचविणार्‍या विविध कार्यप्रणाली, मिळालेल्या संकेतांना समजून घेणारी ऑपरेटिंग सिस्टम मराठी भाषेतून बनवून घेणं कसं बरं शक्य होईल?
या अडचणी मागचे काही मुद्दे -
१. वर्णाकारांमधली (Font मधली ) वैविध्य हे सामान्य जनतेसाठीच्या सामान्य कामात तितके गरजेचे नाही.
२. संगणकाच्या वापरात मराठीचा 'सहज, सोपा, सर्वत्र' वापर होणं महत्त्वाचं त्यासाठी एकच मराठी धार्जिणी ''कॅरेक्टर एनकोडींग प्रणाली' असेल तर विविध कार्यप्रणाली,  ऑपरेटिंग सिस्टम मराठी भाषेतून बनवून घेणं शक्य होईल. संगणक वापराचे दोन स्तर विभागता येतील अनुक्रमे - 'स्थानिक' वा 'प्रांतिक' व दुसरा 'वैश्विक'.
३. संगणकावर मराठीचा वापर फक्त नेट सर्फिंग, ब्लॉग लिहिणं ह्या उच्चभ्रू हौसेपुरता मर्यादित राहता कामा नये.
४. गावागावात मराठीतून त्यांच्या गरजेनुसार 'संगणक आज्ञावली' लिहिता येणारे तज्ज्ञ युवक घडावेत अशी व्यवस्था निर्माण करणं.
कारण अशाप्रकारेच 'साधन' काबीज करण्यानेच  'सुखसमृद्धी - ऐश्वर्या' वर हक्क सांगणं व तो जपणं शक्य होणार आहे.
= सतीश रावले