मन बगळ्यांची माळ, निळ्या नभाच्या प्रांगणी..
मन प्रतिबिंब वेडे, वेड्या तळ्याच्या दर्पणी..
मन इवलेसे फूल, नटे प्राजक्ताची फांदी..
मन मातीचा तो गंध, चढे नभालाही धुंदी..
मन आंब्याचा मोहोर, सुवर्णाचे जणू दान..
मन बसंत बहार, मधुर कोकीळ गान..
मन मोत्याचा तो थेंब, उठे पाण्यात तरंग..
मन पावसाची धार, भिजवील अंग अंग..
मन भूपाळीचा सूर, पहाटेच्या समयीचा..
मन तेवता प्रकाश, गाभार्यातल्या समईचा...
मन विद्युल्ल्ता पात, धरेवर कोपणारा..
मन बरसता मेघ, जलांमृत सांडणारा..
मन कुंकवाची रेघ, भांगामध्ये रेखलेली..
मन मायेची ती काठी, कमरेत वाकलेली..
मन सवाष्ण शृंगार, सुवासिनिचं ते लेणं...
मन चांदणं ठिपूर, जणू नक्षत्रांचं देणं...
- प्राजु