नावात काय नाही?

काही कामानिमित्त परवा एका स्नेह्यांच्या घरी फोन केला. त्यांच्या कन्येनं - ओजसनं - फोन घेतला.

'मोडक बोलतोय. आई आहे?'

'थांबा हं. देते.' असं म्हणत तिनं आईकडं फोन दिला.

त्यांनी फोन घेतला तेव्हा पहिलंच वाक्य होतं, 'ओजस म्हणतेय की, यांचं नाव इतकं सुंदर असून हे मोडक असं का सांगतात?'

'बऱ्याच वर्षांपासून ती एक सवय बसली आहे. काही केल्या जात नाही...'

मी उत्तर देऊन मोकळा झालो. हा अनुभव काही पहिलाच नव्हता. याआधीही एकदा असा अनुभव आला होता. त्यावेळी मी एका लोकसंघटनेसोबत जोडून घेतलं होतं. तिथं एका कार्यकर्तीनं 'यांना तुम्ही मोडक असं का म्हणता, श्रावण का नाही?' असा प्रश्न थेट मला उद्देशून नाही, पण तिथल्या साथींना उद्देशून केला होता. त्यांच्यापैकी एकीनं, 'बघ ना. पण ते कधीच त्यांचं नाव श्रावण असं सांगत नाहीत,' असं उत्तर देऊन माझ्याकडं कटाक्ष टाकला होता. त्याहीवेळी मी दिलेलं उत्तर आत्ताच्या उत्तरापेक्षा काही वेगळं नव्हतं. तेव्हा त्याविषयी फार विचार करण्यास वेळही मिळालेला नव्हता. आत्ता मात्र तसं नव्हतं. आत्ता विचारात पडलो आणि मागं मागं जात राहिलो. त्या सवयीच्या मुळाच्या शोधात. हाती फारसं काही गवसलं नाही.

खरं तर, हाती काहीही गवसत नाही म्हंटल्यावर तिथंच थांबायला हवं होतं. पण मनोव्यापार इतके सरळ नसतात. एखाद्या गोष्टीवरून सुरू झालेला तो व्यापार कुठं जाईल हे सांगता येत नसतं. तसंच इथंही झालं आणि दुसरा रस्ता फुटला. मी स्वतःची ओळख करून देताना फक्त नावाचा उच्चार करत नसेनही पण इतरांना संबोधताना काय करतो, हा भुंगा सुरू झाला आणि एकेक पैलू समोर येत गेला.

पाहता-पाहता एकेक व्यक्ती डोळ्यांसमोर येत गेली. त्यांची नावं येत गेली. त्यांना मी कोणत्या नावानं केव्हा संबोधतो, त्यामागील भावना काय असतात हे सगळं स्वच्छ डोळ्यांसमोर येत गेलं. त्या-त्यावेळी आपल्या व्यक्तिमत्त्वातील एकेक पैलू त्यासंबोधनातही कसे दडलेले असतात हे अगदी स्वच्छ होत गेलं तसं नावात काय आहे या प्रश्नाचं एक वेगळंच उत्तर समोर आलं.

हाक मारण्याचं नाव आणि खरं नाव वेगळं असू शकतात. माझीही अशी दोन नावं आहेत. त्यापैकी एक नाव पूर्णपणे कौटुंबीक. तेही इतकं रुजलेलं आहे की, श्रावण म्हटलं की अनेकांना माझी ओळखही लागत नाही. मग पुन्हा घरचं नाव घेऊन सांगावं लागतं तेव्हा कुठं ओळख पटते. हा अर्थात झाला स्वतंत्र विषय. पण त्याहीपलीकडं नावाची मोडतोड आपण करत नसतोच का?

नावांच्या मोडतोडीमागं नेमकं काय-काय दडलेलं असतं हे त्या मनोप्रवासात ध्यानी येत गेलं. माणसाच्या मनात निर्माण होणारी जवळपास प्रत्येक भावना (अगदी वैषयिकसुद्धा) त्यामागं असतेच. आणि त्या-त्या भावनेतून त्या नावांची वेगवेगळी रुपं आविष्कृत होत जातात बहुदा.

माझ्या एका अगदी जवळच्या मित्राचं नाव राहूल आहे. त्याचा उल्लेख मी केव्हाही राहूल असाच करेन. पण काही विशिष्ट वेळी आपण त्याला रावल्या असंही म्हणतो, हे माझ्या लक्षात आलं. एक तर त्याचा उल्लेख आमच्या काही सामायीक मित्रांमध्ये करताना किंवा मग मोठेपणाच्या अधिकारात त्याला काही सांगायचं असेल किंवा सुनावायचं असेल तर त्या रावल्याला एक वेगळीच छटा प्राप्त होत असते, हे काही दाखल्यांवरून माझ्या लक्षात आलं. परदेशी शिक्षणाला जाण्याचा ओढा असलेला हा मुलगा पक्का बेशिस्तीचा. दिलेल्या वेळेवर कुठं हजर झाला तर शप्पथ. असं काही त्यानं केलं की, मग मोबाईलवर बोलताना किंचित रागानं त्याचा रावल्या व्हायचा. लिहिताना त्याच्या हातून काही अगदी भोंगळ चुका झालेल्या दिसल्या की, मी रावल्याच म्हणायचो; पण त्यात संताप खचाखच भरलेला असायचा.

आणखी एक वेगळं उदाहरण आहे. या मित्राचं नाव महत्त्वाचं नाही. कारण नावाबाबत नेहमीचीची गोष्ट आहे. अगदी नेहमीच्या परिस्थितीत मी त्याला नावानंच हाक मारतो. तो माझा वरिष्ठ सहकारी आहे. पण हा वरिष्ठपणा कार्यालयाच्या संदर्भात. तसे आम्ही खूप जुने मित्र. आडनाव जोशी. जोशी म्हटलं की येणारे गुण त्याला अगदी चिकटलेले आहेत, असं मी नेहमी त्याला खिजवत असतो, पण तोही भाग वेगळा. या मित्राशी एरवी केव्हाही बोलताना त्याचं नाव घेणारा मी मध्येच केव्हा तरी, 'जोशीबुवा...' अशी सुरवात करतो. मग असे एकेक प्रसंग आठवू लागलो तेव्हा लक्षात आलं की, या संबोधनानंतर मी त्याच्याशी जे काही बोलतो ते हमखास उपरोधीक असतं. उपरोधाचं ते वाक्य संपलं की मी लगेचच पुन्हा त्याच्या नावावरच येतो. जोशीबुवाच्या मागं दडलेली दुसरी भावना असते ती त्याला काही तरी शिकवण्याची. हे शिकवणंही उपरोधाचंच. एकदा त्याच्यासमोर प्रश्न पडला, मिठी हा शब्द वापरू की आलिंगन हा! अंगभूत खवटपणातून त्यामागील हेतू माझ्या लक्षात आला. म्हणालो, 'जोशीबुवा, मिठीत रस आहेच, आलिंगनात तर लिंगच आहे.' हेतू पक्का समजून घेऊन मी दिलेल्या त्या उत्तरातील उपरोधही कुठल्याकुठं मावळून जात तो खळाळून हसला.

मघा मी म्हटलं तसं, माणसाच्या मनात निर्माण होणारी प्रत्येक भावना संबोधनातून व्यक्त होतेच. हे एक वेगळं उदाहरण आहे. अगदी वैयक्तिक. ही माझी प्रेयसी. प्रेम अव्यक्त असलेला तो काळ होता. त्यावेळी केव्हा तरी एकदा तिला इमेल लिहिताना मी तिच्या नावाचं पहिलं अक्षर कंसात टाकून बाहेर मिता असा उल्लेख केला. तिनं मेल उघडली तेव्हा आजूबाजूला तिचे मित्र-मैत्रिण होते. तिनं नंतर सांगितलं, 'माझ्या नावाचं ते रूप पाहूनच तिथं इतका विशिष्ट हशा उसळला की, लाजून चूर व्हायची वेळ आली.' तिनं हे सांगितलं तेव्हा माझ्या डोक्यातही प्रकाश पडला.

मी तो शब्द-अक्षराचा खेळ सहजच केला होता अशी माझी तोवर समजूत होती. तिनं हे सांगितलं तेव्हा आमचं प्रेम व्यक्त झालं होतं आणि त्यावेळी मागं वळून पाहताना माझ्या लक्षात आलं की, अरे आपण तो सहजच केलेला खेळ नव्हता. माझ्या प्रेमाच्या विश्वातलं तिचं नाव मिताच तर त्यावेळीही होतं (आजही आहेच). ती लाजून चूर झाल्यानंतर तिच्या मित्र-मैत्रिणींना तिच्या माझ्याविषयीच्या भावनाही समजून गेल्या होत्या. शिवाय, ती मेल चार-चौघात उघडलेली असल्यानं माझं मनही तसंच उघडं झालं होतं हे समजलं तसं लाजण्याची वेळ माझ्यावर आली. कारण मधल्या काळात त्या मंडळींचा माझ्याबरोबरचा संवाद-व्यवहार अगदी सूक्ष्मपणे बदललेला होता. पुढं एकदा केव्हा तरी तिला काही समजून सांगताना तिला मी 'राणी' असं म्हटलं तेव्हा तिच्या अंगावर उठलेले रोमांच आजही आठवतात.

एखाद्याविषयीचं प्रेम व्यक्त करण्यासाठी नावांचा किती सुरेख आविष्कार माणूस करत असतो. मीना किंवा मिनलचं मीनू असं जेव्हा होतं तेव्हा त्या मीनूतून मनीमाऊ समोर आलीच पाहिजे. त्या मनीमाऊचे जसे लाड करावेसे वाटतात तसेच या मीनूचेही होत असावेत. हे फक्त स्त्रीच्याचसंदर्भात नाही. अगदी पुरषांच्याही संदर्भात होत असतंच. एखाद्या विनयचं जेव्हा विनोबा होतं तेव्हा हाक मारणारा त्याला बोका ठरवतोय की काय, अशी शंका येऊन जाते. पण त्याही हाकेमध्ये प्रामाणिकपणा भरलेला असेल तर असंही कदाचित ध्यानी यावं की, वयानं मोठी असूनही त्या व्यक्तीला त्या विनयकडून काही मार्गदर्शन, सल्ला हवा असावा.  

हे सगळं माझ्या अगदी घनिष्ट वर्तुळातील मंडळींचं. बाहेर काय? तिथंही भावभावनांचा खेळ या संबोधनातून सुरूच असतो. कार्यालयात मी बहुतेकांचा उल्लेख आडनावानंच करतो. अपवादात्मक काहींचा नावानं. त्या नावांची केव्हाही मोडतोड न करता. ही मंडळी डोळ्यांसमोर आली तशी ती दोन स्वतंत्र रांगांमध्येच उभी राहिली. आडनावानं उल्लेख करतो त्यांच्याशी असलेलं नातं केवळ व्यावसायिक असतं. नावानं उल्लेख करतो तिथं निश्चितपण थोडा वैयक्तिक ओलावा असतो. हा भेद करणार कसा? मग लक्षात येतं की, निखळ व्यावसायिक नात्यामध्ये कामापुरतंच सारं काही असतं. नावानं संबोधतो त्यांच्याबाबत मात्र कामाच्याहीपुढं थोडा व्यवहार होत असतो. मग तो त्यांच्या कारकिर्दीविषयीच्या मार्गदर्शनाचा असो किंवा एखाद्या वैयक्तिक बाबीमधलं शेअरिंग असो. याच संदर्भात दुसरीही एक गोष्ट अशीच लक्षात येते. सहसा साहेब किंवा सर या उपाध्या नावाना लागत नाहीतच माझ्याकडून. तिथं आडनावच येतं. तिथं दुरावाही तसाच असतो.

माझे एक वयानं मोठे असणारे स्नेही आहेत. त्यांना मी नेहमी रमेशभाई म्हणतो. एरवी सारेच त्यांना अण्णा म्हणतात. पण माझ्या तोंडून कधीही अण्णा हा शब्द गेला नाही. कधी वाटलंच नाही तसं. या माणसानं मला आमच्या दैनंदिन संपर्काच्या पाचेक वर्षांच्या स्नेहामध्ये मला अशी साथ दिली की, हा माणूस माझ्यासाठी भाईच (नव्या अर्थानं नव्हे; तसल्या भाईंनी हा शब्द बदनाम करून टाकला आहे) राहिला. एरवीही घरगुती नात्यांव्यतिरिक्त अण्णा, दादा ही संबोधनं मला तरी थोडं अंतर राखून ठेवणारीच वाटत आली आहेत.

व्यवहारात माणसं नावाना भाऊ, भाई असंही काही तरी जोडत असतात. मला मोडकभाऊ म्हणणारे बरेच आहेत. मोडकसर तर असतंच. श्रावणभाऊही काही जण म्हणतात. श्रावणसर म्हणणाराही एक मित्र आहे. पण त्याच्या त्या सरमध्ये इंग्रजी सर नसतो. श्रावणातली पावसाची सर ही भावनाच त्यात असते, असा तो उच्चार असतो. त्यात असतं ते माझ्याविषयीचं प्रेम. एरवी माझा साहेब किंवा सर होतो तो फक्त मोडक या आडनावाला जोडूनच. हे आडनाव माझ्यासाठी इतकं सरळ झालं आहे. 

आरंभी एका राहूलचं उदाहरण दिलं होतं. त्याच्या नावाचं जे तेच निखिलचं, तेच अभयचंही. आपण ज्यांच्यावर फारसं चिडू शकत नाही, अशा व्यक्तिमत्त्वाची काही मंडळी असतात, त्यापैकीच ही तिघंही. पण यातही राहूल, किंवा निखिलच्या नावाची मोडतोड जशी भावनेनुरूप होईल, तशी अभयची होत नाही. त्याला मी कधी अभ्या म्हटलेलं मला आठवत नाही. पण त्याचं कारण त्याच्या व्यक्तिमत्त्वात दडलेलं आहे. वयानं माझ्यापेक्षा लहान असलेल्या या मुलाच्या बुद्धिमत्तेविषयी, त्याच्याकडं असलेल्या ज्ञानाविषयी मला प्रचंड आदर. त्यातूनच कदाचित त्याचा कधीही अभ्या झाला नसावा. बहुदा हे खरंही असावं. त्याचंही एक कारण आहे. या अभयची माझ्या एका मित्राशी - समीरशी - ओळख करून दिली तेव्हा हा समीरही त्याला काही वेळात अभ्या म्हणू लागला होता. आम्ही तिघंही बऱ्याच लांबच्या प्रवासाला निघालो होतो. प्रवासाच्या अखेरीच्या सुमारास केव्हातरी समीरच्याही लेखी तो पुन्हा अभय झाला होता.

आणि आत्ता ही आठवण झाली तेव्हा माझ्या लक्षात आलं, आदर परिपूर्ण असला की नावाची मोडतोड होत नसावी बहुदा. आणि हे ध्यानी आलं त्याचक्षणी मी माझा उल्लेख नावानं न करण्याचं कारणही डोळ्यांसमोर आलं. मला माझ्या नावानं वयाच्या सतरा-अठरा वर्षांपासून व्यावहारिक आयुष्यात फारसं कोणी संबोधलेलंच नाहीये. खऱ्या नावाच्या संदर्भात हे मी बोलतोय. घरगुती नाव तर वेगळंच आहे. मग हेही लक्षात आलं की, अरे आपण तर व्यावहारिक जगात एका व्यवसायाचं प्रतिनिधीत्त्व करतोय, ज्याच्याकडं पाहिलं तर नावानिशी कोणी उल्लेख करणं शक्यच नाही. त्यातच त्याच काळात कितीही नाही म्हटलं तरी साहेबी चिकटलेली होतीच. कारण हाताखाली काम करणाऱ्या तीन विभागांतील माणसांची संख्या मोठी. आणि मग हेही लक्षात आलं की, आपली ती प्रतिमाच आपल्याला कोणीही नावानं संबोधित न करण्याचं कारण आहे. पु. लं. नी लेखकाचा लेखकराव होणं याविषयी लिहिलं होतं, त्याची आठवण झाली. आपण अकारणच राव झालो हे समजलं आणि नावानिशी संबोधन न होण्यातून काय-काय गमावलं असावं याचं एक नवं चित्र डोळ्यांसमोर उभं राहू लागलं...!