ओठी कळीकळीच्या वार्ता तुझ्या रुपाची

ओठी कळीकळीच्या वार्ता तुझ्या रुपाची
फुलवीत बाग माझी किमया तुझ्या स्मिताची ।ध्रु।

उडतात मोकळेसे हे केस मेघ की हे?
झुकते कटाक्ष हे की आघात बिजलिचे हे?
तव नर्तमान चरणी लयलूट हो सुखाची
ओठी कळीकळीच्या वार्ता तुझ्या रुपाची ।१।

बदलीत दृष्टि वळसी हिंदोळसी कशी तू
हृदयात हाय धडके सांभाळुनी लचक तू
निर्दय! गती अशाने थांबायची जगाची!
ओठी कळीकळीच्या वार्ता तुझ्या रुपाची ।२।

टीपाः

१ पाठभेद : तव नर्तमान चरणी लयलूट वैभवाची

२ पाठभेद : दुष्टे, गती अशाने थांबायची जगाची


चाल : मूळ गाण्याचीच!  (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल  ) गागालगालगागा गागालगालगागा ( वृत्त = आनंदकंद? )

(भाषांतर करताना चालीत बसेल इतपत केलेले आहे.)

विनंती :


१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.

२. उत्तरे व्यनि तून पाठवू नयेत.

३. प्रशासक, प्लीज, बरेच जमेपर्यंत प्रतिसाद थोपवून धरा. (नाहीतर एकमेकांची बघून उत्तरे लिहतील  )

४. फक्त गाणे ओळखू नका. (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा.)... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )